पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रोत्याला तिच्या बुडाशी असलेल्या वास्तवाच्या खरेपणाचा प्रत्यय येत जातो. त्यामुळे या कवितेचा कथनकर्ता आपल्या संभाषणातून या जीवनावर जे भाष्य करतो, या जीवनावर तो जे उपाय सुचवतो त्याचा श्रोत्यांकडून सहजपणे स्वीकार होऊ लागतो, 'बोलगाण्या'तील 'म्हाताच्या जगाची जागा काही कवितांत माणसाच्या वाट्याला येणाऱ्या नियतीने घेतलेली असते. ज्यावर माणसाचे नियंत्रण नाही, अशा अनेक गोष्टी त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्यात अडथळा आणत असतात. कधी ते स्वीकारून तर कधी त्यांवर मात करून माणसाला जगावे लागत असते. माणसाच्या जगण्याच्या मार्गात अडथळे आणणारी नियती ही माणसाला दुःखदायक वाटत असते. मग माणूस हताश होतो, अनेकदा तो जगणेच नाकारतो. या कवितेत तरुणांचे नवे जग हा एक घटक आणि त्याच्या विरोधी असलेले एक तर 'म्हातारे' जग किंवा त्याची जागा घेणारे मानवाच्या नियतीने घडवलेले वास्तव हा दुसरा घटक आणि त्यातून नाट्यपूर्ण तणाव, या सर्वांचेच दर्शन या बोलगाण्यांतून घडवले गेले आहे. तरुण पिढीने जगावे कसे, जगताना कशाला महत्त्व द्यावे, जगताना विरोधी परिस्थितीला कसे सामोरे जावे, जगण्यातील मूल्यवान गोष्टी कोणत्या आणि त्यांची राखण कशी करावी, या संबंधीचे मार्गदर्शन ही कविता करत असल्यामुळे ती जगण्याला आवश्यक असणारे शहाणपण शिकवणारी कविता आहे. व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या सातत्याने उभ्या राहत असतात. जीवनपोषक मूल्ये धूसर होत असतात. अशावेळी त्याला मार्गदर्शनपर विचारांची गरज असते. तसेच व्यक्तिजीवनात जेव्हा अनेक दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा त्याला सांत्वन करणाऱ्या विचारांची गरज असते. अशा परिस्थितीत त्याच्या भाषिक संस्कृतीतील शहाणपणाचा वाड्मयीन ठेवा त्याच्या मदतीला येत असतो. जगण्याच्या प्रक्रियेत साह्यभूत ठरू शकतील अशी सुभाषिते, म्हणी, वाक्प्रयोग, कथा आणि काव्य, असे वाङ्मय भाषेत निर्माण झालेले असते. हे वाङ्मय व्यक्तीला शहाणपण शिकवत असते. यातले शहाणपण त्याला जगण्याच्या प्रक्रियेत आधारभूत होत असते. जात्यावरच्या ओव्यांमध्ये शहाणपण शिकवणाऱ्या कितीतरी ओव्या पाहावयास मिळतात. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात असे शहाणपणाचे वाड्मय विपुल प्रमाणात निर्माण केले आहे. म्हणून माणसावर जेव्हा काही विशिष्ट प्रकारच्या दुःखाचे, सुखाचे प्रसंग येतात तेव्हा तुकाराम महाराजांच्या अभंगातील अनेक चरण म्हणींसारखे वापरून अशा अनुभवांना अर्थ दिला जात असतो. रामदासांच्या दासबोधातील अनेक ओव्या असे शहाणपण शिकवणाऱ्या आहेत. अनंतफंदींचा 'बिकट वाट वहिवाट नसावी, धोपटमार्गा सोडू नको' हा शहाणपण शिकवणारा फटका प्रसिद्ध आहे. आधुनिक काळात काव्यनिर्मिती करणाऱ्या बहिणाबाई चौधरींच्या अनेक ओव्यांना शहाणपणाच्या वाड्मयाचे रूप प्राप्त झाले आहे. जेव्हा जेव्हा जीवनात मूलभूत परिवर्तन होत असते तेव्हा तेव्हा मानवी जीवनात अनेक पेचप्रसंग निर्माण होत असतात. कारण जीवनाचे उद्दिष्ट व्यक्तीच्या गरजा, त्यांच्या प्रेरणांचे ३१४ निवडक अंतर्नाद असणाऱ्या अग्रक्रम या सर्वांत बदल झालेला असतो. अशावेळी जीवनाचे नियंत्रण करणारी प्रस्थापित मूल्यव्यवस्था निकामी ठरू लागते आणि आवश्यक असणाऱ्या व्य मूल्यव्यवस्थेची प्रस्थापनप्रक्रिया पूर्णत्वाला गेलेली नसते. अशा परिवर्तनकाळात शहाणपणाच्या नव्या वाड्मयाची आवश्यकता असते. ते जर निर्माण झाले तर त्याच्या मार्गदर्शनाखाली नवे जीवन जगणाऱ्याला आत्मविश्वासपूर्वक जगता येऊ शकते. आजच्या काळात असेच जीवनपरिवर्तन सुरू आहे आज जीवनपरिवर्तनाबद्दल पु.ल. देशपांड्यांच्या भाषेत बोलायचे तर हे जीवनपरिवर्तन 'रुद्राक्ष' संस्कृतीकडून 'द्राक्ष' संस्कृतीकडे होत आहे. पारलौकिक जीवनाच्या - म्हणजेच 'रुद्राक्ष' संस्कृतीच्या जागी लौकिक जीवन - म्हणजेच द्राक्षसंस्कृती केंद्रस्थानी आलेली आहे आता लौकिक जीवन सुखाने जगण्याला प्राधान्य मिळू लागले आहे. या सुखासाठी अधिकाधिक उपभोग घेण्याची प्रवृत्ती वाढीला लागली आहे. उपभोगाची नवी नवी साधने उपलब्ध होऊ लागली आहेत. उपभोगसुलभतेसाठी अधिकाधिक अर्थार्जन करण्याची धडपड केली जाऊ लागली आहे लैंगिक भुकेबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. लैंगिक भूक ही अन्नाच्या भुकेइतकीच नैसर्गिक असून तिची वांच्छा करण्यात आणि ती भागवण्यात अनैतिक असे काहीच नाही; हा दृष्टिकोन मूळ धरू लागला आहे त्यामुळे ती भागविण्यात अडथळा ठरणारी पारंपरिक सामाजिक निषिद्धे अमान्य केली जाऊ लागली आहेत. काय खावे, काय प्यावे हा वैयक्तिक प्रश्न मानला जाऊ लागला असून त्यासंबंधीची पारंपरिक निषिद्धे गळून पडू लागली आहेत. मद्यपानाला अद्याप सामाजिक प्रतिष्ठा जरी प्राप्त झाली नसली तरी त्याकडे उदारपणे पाहिले जाऊ लागले आहे. जागतिकीकरण सुरू झाल्यापासून या परिवर्तनप्रक्रियेला वेग प्राप्त झाला आहे. या परिवर्तनातून एक नवा वर्ग जरी अस्तित्वात आला असला तरी पारंपरिक जीवनव्यवस्था, मूल्ये आणि विधिनिषिद्धे टिकवून ठेवू पाहणारा वर्गही आज अस्तित्वात असून तो नव्या जीवनपद्धतीचा स्वीकार करू पाहणाऱ्या तरुण पिढीला उग्रपणे विरोध करतो आहे. अशा प्रकारचे दोन वर्ग असणारा आणि त्यांच्यातील संघर्षामुळे निर्माण होणाऱ्या ताणतणावाखाली जगणारा आजचा समाज पाडगावकरांच्या 'बोलगाण्यां' ची निर्मितिसामग्री आहे. या दोन वर्गांखेरीज माणसाच्या जीवनात अडथळा ठरणारी नियती हा आणखी एक घटक 'बोलगाण्यां' च्या निर्मितिसामग्रीचा भाग आहे. माणसाच्या जगण्यात अडथळे उत्पन्न करणाऱ्या नियतीवर त्यांचे नियंत्रण नसते. जीवनातील तिचे अस्तित्व स्वीकारूनच माणसाला जगावे लागते. तरुण माणसाच्या विरोधात उभे राहणारे म्हातारे जग आणि माणसाच्या जगण्याला अडथळे आणणारी त्याच्या वाट्याला येणारी त्याची नियती अशा दोन्ही विरोधी घटकांना तोंड देत देत माणसाने कसे जगायचे हे पाडगावकरांची कविता सांगते, पाडगावकरांची ही शहाणपणाची कविता जीवनाकडे पाहण्याच्या त्यांच्या रोमँटिक भूमिकेतून जन्माला आली आहे. जगण्यावर अढळ श्रद्धा बाळगणे हे या शहाणपणाच्या कवितेचे केंद्रीय सूत्र आहे. पारंपरिक जीवननिष्ठा बाळगणाऱ्या