पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मूल्यवान वाटते, पाडगावकर जगण्यावर प्रेम करणारे कवी आहेत. जीवनातील सर्वच सामाजिक व्यवस्था या अस्तित्वाला, त्याच्या जगण्याला पूरक असल्या पाहिजेत, परंतु प्रत्यक्षात त्या या अस्तित्वाला आणि जगण्याला विरोधी किंबहुना मारक आहेत; याची जाणीव त्यांची ही कविता व्यक्त करते. अशा या जगण्याला विरोधी सामाजिक वास्तवाबद्दल तीव्र प्रतिकूलतेची भावना ही या जाणीवव्यूहाचा भाग आहे. व्यक्तीच्या कृतिस्वातंत्र्याला केंद्रस्थानी असणारी जीवनपद्धती अस्तित्वात असली पाहिजे; व्यक्तीच्या पायाभूत, नैसर्गिक प्रेरणांमधून जन्मणाऱ्या कृती करण्याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असणे, हा जगण्याला आवश्यक असणारा पाया आहे; त्यावरच मानवी जीवन उभे केले गेले पाहिजे असे त्यांना वाटते. निसर्गाची तद्रूप होणे, स्त्रीपुरुषांनी परस्परांवर आणि व्यक्तींनी एकमेकांवर प्रेम करणे, ही मानवाची नैसर्गिक - स्वाभाविक प्रेरणा आहे. मानव हा निसर्गाचा एक सेंद्रिय घटक आहे; निसर्गाशी तो जिवंतपणे जोडलेला असल्यामुळे त्याला स्वाभाविकपणे निसर्गाची ओढ वाटते; परंतु तो या जीवनपद्धतीत निसर्गापासून तोडला गेला आहे. व्यक्तीच्या नैसर्गिक प्रेरणांच्या तृप्तीतून मिळणाऱ्या आनंदासह व्यक्तीला जगायला मिळणे हा त्याचा जन्मजात अधिकार आहे, परंतु त्याचा हा स्वाभाविक अधिकार हिरावून घेणारी परिस्थिती त्याच्या सभोवताली निर्माण केली गेली आहे. पाडगावकरांच्या या कवितेच्या निर्मितीमागे असलेल्या जाणीवव्यूह्यचे स्वरूप थोडक्यात याप्रकारे सांगता येईल. व्यक्तिकेंद्रित जीवनपद्धतिप्रस्थापनेचा आग्रह, मानव आणि निसर्ग यांच्यातील सेंद्रिय नात्याच्या आणि मानवामानवामधील प्रेमपूर्ण नात्याच्या अस्तित्वाचे भान, मानवी जीवनात स्त्रीपुरुषांतील प्रेमसंबंधांना पायाभूत आणि प्राथमिक स्थान असण्यावरचा विश्वास; हे सर्व रोमँटिक जाणीवव्यूहाचे मूलभूत घटक आहेत. केवळ बोलगाण्यांमधूनच नव्हे तर पाडगावकरांच्या सर्वच कवितांमधून हे घटक व्यक्त होत आले आहेत. म्हणून पाडगावकरांच्या कवितेमागील जाणीवव्यूह अस्सल रोमँटिक स्वरूपाचा आहे, असे म्हटले पाहिजे. पाडगावकरांचा रोमँटिक जाणीवव्यूह हा अस्सल असला तरी त्याच्या कक्षा त्यांच्या प्रारंभीच्या कवितांतच निश्चित झाल्या. नंतर त्या फारशा विस्तारल्या नाहीत आणि त्यांच्या जाणीवव्यूहाचा वेगवेगळ्या अंगांनी विकासही झाला नाही. १९५२ साली लिहिलेली त्यांची 'जिप्सी' ही कविता या दृष्टीने पाहता येईल. 'जिप्सी' ही रूढ जीवनपद्धतीत राहणे नाकारण्याच्या आणि कुठलेही बाह्य बंधन न स्वीकारता आपल्या प्रेरणांप्रमाणे जगण्याच्या वृत्तीची प्रतिमा आहे. कुठलीही जीवनपद्धती प्रस्थापित झाली आणि तिचे व्यक्तीच्या प्रेरणांशी असलेले नाते संपुष्टात आले की ती उधळून देण्याची या कवितेच्या नायकाची प्रवृत्ती आहे. तो बालपणापासून आपल्या नैसर्गिक प्रेरणांना प्रतिसाद देत जगू पाहतो. म्हणूनच, झावळ्याच्या भिंती आणि पानांची कौले या निसर्गातील सामग्रीतून 'घर' बांधण्याचा प्रयत्न तो बालपणी करतो आणि हे घर बांधून होताच तो ते मोडून टाकतो. लहानपणी शाळेत भेटलेले 'जाड काचेची चाळिशी लावलेले आणि बालक- विद्यार्थ्यांकडे 'उग्र नजर' रोखणारे पंतोजी हे व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्याला विरोधी असणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेचे प्रतीक आहेत. त्यांच्या सहवासात या 'जिप्सी' चे मन रमत नाही. 'पानांच्या हातांनी झाडे' आणि 'शेपटीच्या झुबक्याने खार' हे निसर्गघटक त्याला बोलावीत राहतात. सारी लौकिक सुखे असूनही 'खोल खोल मनी' हा जिप्सी दुःखी असतो. पाडगावकरांचा 'जिप्सी' ही रोमँटिक वृत्तीची प्रतिमा आहे. आणि ती त्यांच्या कवितेत प्रारंभापासून स्थिरावली आहे. त्यांच्या प्रारंभीच्या काळातल्या 'छोरी' (१९५३) या कवितेतली 'चौकोनी खोकेंच चार खिडक्यांचे अशी असलेली शाळा आणि 'काढा पाट्या कुठे उजळणी चला दाखवा' असा 'कर्कश आवाजाने हुकूम देणारे मास्तर, हे प्रस्थापित, रूढावलेल्या आणि व्यक्ति विरोधी जीवनाची प्रतीके आहेत. येथे 'उजळणी' ही व्यक्तीच्या प्रेरणेपासून तुटलेली आणि यांत्रिकपणे करावयाची गोष्ट, याची प्रतिमा म्हणून आली आहे. अशी 'उजळणी' लिहून आणण्याचे नाकारणारा बाल विद्यार्थी रोमँटिक हिरोची प्रतिमा आहे चष्म्याची भिंगे रोखून मास्तरांनी या नायकाच्या हातावर छड्या मारणे, हा या प्रस्थापित, रूढ व्यवस्थेने केलेला 'न्याय' आहे. 'नजर खोडकर' असलेली 'छोरी' ही रोमँटिक नायिका आहे. तिने नायकाच्या दुखऱ्या हातावर ठेवलेली कैरीची फोड, ही व्यक्ती- व्यक्तींमधील प्रेमाच्या नात्याचे प्रतीक आहे. या कविता विशिष्ट घटनांची अभिव्यक्ती आहे, हे जरी खरे असले तरी या कवितांतील घटनांची उभारणी आणि घडण जाणिवांच्या ज्या विशिष्ट चौकटीवर झाली आहे ती रोमँटिक आहे थोडक्यात, पाडगावकरांच्या प्रारंभापासूनच्या कविता या अस्सल रोमँटिक जाणिवांची अभिव्यक्ती आहेत असे म्हणावे लागते, याच रोमँटिक वृत्तीतून पाडगावकरांनी 'बोलगाणी' लिहिली आहेत. पाडगावकरांच्या बोलगाणीमध्ये त्याच्या जाणीवव्यूह्यतील दोन्ही केंद्रे एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहेत. आपल्या नैसर्गिक प्रेरणांप्रमाणे जगू पाहणाऱ्या आपल्या सुखी जीवनाची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांचे जग हे या कवितेचे केंद्र आहे. हे तरुण आपल्या प्रेरणांना अनुकूल कृती करू पाहतात. अशा कृती करण्याचे स्वातंत्र्य त्यांना हवे आहे पारंपरिक जीवन श्रद्धेने जगणारे आणि नव्या जीवनाला, तरुणांच्या इच्छा-आकांक्षा आणि प्रेरणाजन्य कृतींना विरोध करणारे, म्हणजेच वृत्तीने 'म्हातारे' झालेले जग हे या कवितेचे दुसरे केंद्र आहे. या दोन जगांतील संघर्ष ही या नाट्यकवितेची सामग्री आहे. या नाट्यकवितेची सामग्री असलेल्या दोन जगांचे अस्तित्व हे आपल्या आजच्या समाजाचे प्रत्यक्ष वास्तव आहे. आज आपल्या समाजात ही दोन्ही जगे अस्तित्वात आहेत. पारंपरिक प्रस्थापित जीवनपद्धतीकडून एका नव्या जीवनपद्धतीकडे होणाऱ्या परिवर्तनाच्या गतिमान प्रक्रियेतून आजचा समाज जात आहे. जीवनाची पारंपरिक, प्रस्थापित मूल्ये आणि प्रमाणके, परंपरेने निश्चित केलेली जगण्यामागील उद्दिष्टे, विधिनिषेधांची प्रस्थापित चौकट, या सर्वांत वेगाने बदल होत आहेत. अशा सामाजिक परिवर्तनकाळावर ही कविता लिहिली गेली आहे आजच्या प्रत्यक्षातल्या रोखठोक वास्तवावर ही कविता उभी केली गेली आहे. त्यामुळे ती ऐकताना निवडक अंतर्नाद ३१३