पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माधवराव सप्रे : मराठीचे हिंदीला योगदान ज्ञानेश्वर मुळे छत्तीसगडचे सहकारमहर्षी वामन बळीराम लाखे, पूर्वांचलचे गांधी बाबा राघवदास, वाराणशीचे संपादक पंडित बाबूराव विष्णू पराडकर हे तीन मूळचे महाराष्ट्रपुत्र. हिंदी भाषेला व हिंदी प्रदेशाला त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले. महाराष्ट्रात ते फारसे परिचित नसले तरी हिंदी भाषकांनी त्यांना सदैव प्रचंड आदर दिला. त्याच मालिकेत बसणाऱ्या मध्य प्रदेशातील साहित्यिक माधवराव सप्रे यांचा ज्ञानेश्वर मुळे यांनी करून दिलेला हा परिचय. मराठी माणूस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत सावध व बुजरा दिसतो, हे मी वारंवार अनुभवले आहे. क्षेत्र कोणतेही असो, धाडस व कल्पकता यांच्या बळावरच राजकीय, आर्थिक व सामाजिक प्रभाव प्रस्थापित करता येतो. या पार्श्वभूमीवर एकोणिसाव्या शतकात व काही अंशी विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काही मराठी माणसांनी राष्ट्रीय पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांतल्या फुले, टिळक, गोखले इत्यादी महाराष्ट्रस्थित व्यक्तींची कामगिरी सर्वांच्या परिचयाची आहे. पण महाराष्ट्राबाहेर राहून असे महत्त्वपूर्ण काम करणारे अनेक लोक उपेक्षित राहिले आहेत. ते महाराष्ट्राचे म्हणून महाराष्ट्राबाहेर उपेक्षित राहिले आणि महाराष्ट्राबाहेर काम करतात म्हणून महाराष्ट्रात उपेक्षित राहिले. 'तद्भव' नावाच्या एका हिंदी साहित्यिक नियतकालिकातील (जानेवारी २००८) एका लेखावर माझी नजर पडली व ती तिथेच थांबली. 'माधवराव सप्रे का महत्त्व' हा लेख 'मैनेजर पाण्डेय' या दिल्लीवासी लेखकाचा आहे, आणि लेख पूर्ण तेरा पानांचा आहे. माधवराव सप्रे हे नाव मी स्वप्नातही ऐकले नव्हते. महाराष्ट्रात आजवर हे नाव माझ्यासमोर उच्चारणारी दुसरी कोणी व्यक्तीही मला भेटलेली नाही. माधवराव सप्रेंच्या विषयीची त्या लेखातली माहिती थक्क करून सोडणारी आहे. माधवरावांचे पूर्वज कोकणातून येऊन मध्य प्रदेशातल्या दामोह जिल्ह्यात स्थायिक झाले. त्यांचा जन्म १९ जून १८७१ मध्ये पथरिया या गावात झाला आणि अवघ्या पंचावन्न वर्षांनी २३ एप्रिल १९२६ रोजी देहान्त. त्यांचे कार्य अत्यंत प्रभावी ठरले. त्यांच्या जीवनाची ठळक वैशिष्ट्ये अशी : - "ते हिंदीचे आधारस्तंभ, सामाजिक, साहित्यिक व राजकीय संस्थांचे संस्थापक आणि राष्ट्रीय तेज असणारे व्यक्तिमत्त्व होते' अशा शब्दांत त्यांचे वर्णन माखनलाल चतुर्वेदी या अतिशय नामवंत हिंदी साहित्यिकाने केले आहे. ते एक साहित्यिक पत्रकार होते. टिळकांच्या 'केसरी' वर आधारित त्यांनी संपादित केलेल्या 'हिंदी केसरी' वरून त्यांचा इंग्रजांनी छळ केला. १९०८ मध्ये त्यांना अटक झाली आणि २९४ निवडक अंतर्नाद 'स्वदेशी आंदोलन और बॉयकॉट' या त्यांच्या पुस्तिकेवर बंदी आली. इंग्रजांना कळू नये म्हणून त्यांनी अनेक नावांनी लिखाण केले. त्यांपैकी काही नावे: माधवदास रामदासी, त्रिमूर्ती शर्मा, त्रिविक्रम शर्मा, राजनीती, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मनोविज्ञान व विज्ञान हे सगळे विषय त्यांनी हाताळले. १९०० साली 'छत्तीसगड मित्र' या नियतकालिकाची स्थापना, हिंदीत समीक्षेची सुरुवात आणि समीक्षेचा प्रसार या नियतकालिकाने केला असे मानले जाते. १९०५ मध्ये नागपूर येथे 'हिंदी ग्रंथ प्रकाशन मंडळाची स्थापना. १९०६ पासून 'हिंदी ग्रंथमाला' चा प्रारंभ. १३ एप्रिल १९०७ मध्ये हिंदी केसरी' ची स्थापना, स्वदेशीचा प्रचार, विदेशीचा बहिष्कार, स्वराज्याचा प्रसार हे मुख्य काम, १९०८ मध्ये 'हिंदी केसरी' मुळे अटक, हिंदी पत्रकारितेच्या इतिहासातील राजद्रोहाचा हा पहिला खटला, भावाने आत्महत्येची धमकी दिल्याने त्यांनी इंग्रजांची माफी मागितली व ते सुटले. पण, अपराधी भावनेने व्याकूळ होऊन त्यानंतरचे त्यांचे जीवन अज्ञातवास, गरिबी, संताप, पश्चात्ताप, लज्जा अशा अवस्थेत गेले. अज्ञातवासातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 'दासबोधा' चे भाषांतर, निरूपण आणि विश्लेषण केले. त्यानंतर 'गीतारहस्या' चा अनुवाद केला. ह्य अन्य भाषेतील गीतारहस्याचा पहिला अनुवाद होता. 'महाभारत मीमांसा' हा त्यांच्या तिसरा अनुवाद, हिंदी भाषेत अर्थशास्त्रासंबंधी लिखाण करणारे ते पहिले भारतीय होते. समीक्षक, निबंधकार, साहित्यकार, अनुवादक व पत्रकार अशा विविध रूपांत सप्रे समोर येतात. पण या सर्वांहून त्यांची जाज्वल्य देशभक्ती मनाला मोह पाडते, कारण तीच त्यांच्या जगण्याची प्रेरणा होती, ज्या आदराने 'मैनेजर पाण्डेय' यांनी हा लेख लिहिला आहे, तो आदर प्रत्यक्ष लेख वाचून अनुभवण्यासारखा आहे. माधवराव सप्रे यांना माझे शत शत प्रणाम ! (ऑगस्ट २००९)