पान:निवडक अंतर्नाद.pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समजत जातं असं मला वाटतं. करिअर आणि संसार या दोन्ही जबाबदाऱ्यांचा समतोल साधत स्वत:ला अजमावणारी प्रत्येक स्त्री मला प्रभावशाली वाटते. संजय तुझ्या कथेत विषयातलं धाडस असतं कधी कधी. लैंगिकतेचे संदर्भही असतात. पण तुझ्या अभिव्यक्तीत विशेष धाडस नसतं, म्हणजे स्पष्ट करायचं तर शिव्यांचा अतिरेकी वापर, लैंगिक संबंधांचं अन् क्रियांचं उघड आणि धाडसी चित्रण वगैरे नसतं, हे कशामुळे होतं? तुला त्याची गरज वाटत नाही म्हणून? का कसलं दडपण? का संस्कार? का स्वतःच्या इमेजची भीती? का तत्वं? नेमकं काय कारण आहे यामागे? मोनिका : लिहिताना मी फक्त लेखिका असते व त्यामुळे माझ्यावर दडपण, संस्कार किंवा इमेज यातलं कुठलंच बंधन येत नाही. एखाद्या अनुभवाची गरज असेल तर धाडसी अभिव्यक्ती, चित्रण करणं ठीक आहे. पण केवळ 'ही एक स्त्री असूनही, लेखिका असूनही असं धाडस दाखवते' असल्या कौतुकासाठी वा कौतुकमिश्रित आक्षेपासाठी, थोडक्यात धाडसासाठी धाडस म्हणून मी काही लिहीत नाही. मला असलं धाडस दाखवणं मान्य नाही. पटत नाही. दुसरं म्हणजे संयतता, सूचकता हे साहित्याचे फार मोठे गुण आहेत, यावर माझा विश्वास आहे. संवततेने आणि सूचकतेने तुम्ही फार मोठा परिणाम साधू शकता, जो परिणाम वाचकाला अंतर्मुख करतो. संजय लेखिका असूनही तू रूढ अर्थाने स्त्रीवादी दृष्टिकोन बाळगून लिहीत नाहीस. याचं कारण काय? एकूणातच समाजात, साहित्यादी क्षेत्रांत, कुटुंबात, स्त्रीला कमी दर्जाची वागणूक मिळत नाही, असं तुला वाटतं का? बंडखोरीचा आवेश तुला नकोसा वाटतो का? मोनिका : मला या संदर्भात सिल्व्हिया पाथ आठवते. तिच्या कवितेत तिचं जीवन आणि जीवनाने तिच्याकडून अपेक्षिलेलं रूप यांतला संघर्ष येतो. पण ती फेमिनिस्ट नव्हती. विजयाबाई राजाध्यक्षही स्वतःला पोस्टफेमिनिस्ट म्हणतात. परिवार कुटुंब यांबद्दल त्यांना ओढ वाटते, असं त्या म्हणतात. आशा बगेही पूर्ण स्त्रीवादी लेखिका नव्हेत. मी ज्या घरात, संस्कारात वाढले, त्या घरात माझ्या वडिलांनी माझ्या आईला बरोबरीनं वागवलं. थोडाफार अन्याय झालाही असेल, पण मुख्यतः तिच्यावर कुठली बंधनं नाही लादली. तिनं या अर्थानं खूप स्वातंत्र्य उपभोगलं. सुदैवाने त्याहीपेक्षा मुक्तता मला सासरी मिळाली. अगदी माझी दोन मुलंही माझं लेखिकापण जपतात. कदाचित म्हणूनच स्त्रीवाद मला केवळ मर्यादित अर्थाने जवळचा वाटतो. अजूनही वेगवेगळ्या क्षेत्रांत स्त्रीवर केवळ स्त्री म्हणून अन्याय होताना मीही अनुभवले आहेत, पण बंडखोरी ही व्यक्तिमत्त्वातच असावी लागते हे जितकं खरं, तितकंच अभिनिवेशाने स्वतः स्त्रीच आपलं दुबळेपण त्या अभिनिवेशापोटी पुन:पुन्हा असं ना तसं अधोरेखित करत जाते की काय, हेही विचारात घ्यायला हवं. आजची स्त्री मला वाटतं पुरेशी समर्थ आहे तिच्यावर होणाऱ्या अन्यायांची तिला जाणीव आहे आणि त्याविरुद्ध ती अशी ना तशी झगडते आहे. स्त्रीमधलं हे आंतरिक सामर्थ्यं अन् त्याची जाणीव तिला असणं हे माझ्या दृष्टीनं २९२ • निवडक अंतर्नाद महत्त्वाचं आहे. तिचं एकीकडे सौम्य, शांत परंतु आंतरिक मात्र कणखर खंबीर रूप, तिला वाटणारी आत्मसन्मानाची प्रखर ओढ बंडखोरीच्या अभिनिवेशापेक्षा, त्या आवाजापेक्षा कधीकधी जास्त तीव्र ठरून जाते. माझ्या बहुतेक नायिका या अशा आंतरिक सामर्थ्याने अधिक उठून दिसतात - नाळ, जन्म, जाणीव, देणं... वगैरे कथांत. संजय पुरुष लेखकांनी रंगवलेली स्त्रीपात्रे आणि त्यांचे मनोव्यापार आणि स्त्री-लेखकांनी रंगवलेली स्त्री यांत नेमका काय फरक जाणवतो तुला? केवळ तूच असं नव्हे, तुझ्या आधीच्या आणि समकालीन अशा दोन्ही, म्हणजे सानिया, गौरी, मेघना, नीरजा, आशा बगे वगैरे अनेक लेखिका मला इथे अभिप्रेत आहेत. अर्थात एका दमात म्हटले म्हणून या लेखिकांतदेखील काही साम्य मला अभिप्रेत नाही. ही नावं केवळ उदाहरणादाखल घेतली इतकंच. मोनिका : मला सगळ्याच लेखकांच्या बाबतीत म्हणता येणार नाही, पण काही लेखकांना स्त्री आणि तिचं सामर्थ्य जाणवलं आहे आणि त्यांनी कायमच तिला कचकड्याची बाहुली आणि पुरुषांसाठी केवळ प्रणयिनी असं रंगवलेलं नाही. पुंडलिकांची सती ही कथा, बोकिलांची उदकाचिया.., मतकरींचं कथांचं पुस्तक दहा जणी, जी.एं.ची कैरी, गोखल्यांची मंजुळा वगैरे असे काही अपवाद वगळता ही लेखकमंडळी कमी पडलीही असतील, तिचं सहनशील, सोशिक रूपच त्यांनी अधिक रेखाटलं असेल. पण मला असं वाटत नाही, की त्यांना स्त्री समजलीच नाही. हां, तिची दुःखं किती प्रकारची असू शकतात आणि तिची कुचंबणा त्यांना तितकीशी समजली नसेल, त्यांना तिचं सामर्थ्य तितकंसं जाणवलं नव्हतं असं म्हणता येईल. शिवाय त्या काळाचाही तो परिणाम असेल. त्यामुळे बहुतेक कथा स्त्री प्रधान नव्हत्या, कथांतलं स्त्रियांचं चित्रण तितकसं ठळक नव्हतं. गौरीने स्त्रीवादी नायिका आपल्या लेखनातून पुढे आणल्या आधी कमल देसाईंनी. यामुळे स्त्रीवादी भूमिकेचं व्यापकपण ठसलं गेलं, गौरी, सानिया या लेखिकांनी मुख्यतः स्त्रीला केंद्रस्थानी ठेवूनच पुढे कथा लिहिल्या स्त्रीच्या संवेदना, तिच्या व्यथा, तिची घुसमट एक स्त्री या नात्याने या लेखिकांना अधिक जिवंतपणे, तीव्र संवेदनशीलतेने मांडता आली. तिच्या मनाचे पापुद्रे उलगडता आले. संजय मुळात कथा सुचते कशी? कसं पडतं ते बीज मनात? आणि कथा सुचणं ते कथा लिहून संपणं हा प्रवास - एकदा तुझ्याशी बोलताना मी याला गरोदरपण असा सुरेख शब्द वापरला होता, आठवतं? - हा प्रवास नेमका कसा होतो तुझ्या बाबतीत? मोनिका : कधी कधी कथेसाठी एखादा शब्दही मला पुरतो. उदाहरणार्थ, माझी रूट्स ही कथा. अमेरिकेत स्थायिक झालेल्या उद्ध्वस्त भारतीय मनांची ती अक्षरशः फक्त 'रूट्स' या शब्दावरून, त्या शब्दामुळे सुचली. आणि एखाद्या अनुभवातून मला वाचकापर्यंत काय पोहोचवायचं आहे, ते मी आधी मनाशी संघर्ष करत करत लिहून ठेवते. मला जे सांगायचं आहे, तो शेवट