पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एखाद्या डागाने बिंग फुटायचे व मग त्यांना आईच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागे. मठीत फार वस्तू जमा झाल्या की मग आईचं तिकडे लक्ष जाऊन तिच्या आधिपत्याखाली एखादी विशेष स्वच्छता मोहीम राबवली जायची. ही मोहीम म्हणजे भाऊसाहेबांच्या या विश्वावर एकप्रकारे आक्रमणच असायचं. भाऊसाहेब त्यातून त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी वाचवायचा शर्थीचा प्रयत्न करायचे. मी क्वचित् प्रसंगी या लढ्यात भाऊसाहेबांची बाजू घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचो. अर्थातच त्याला फार मर्यादित यश यायचं, आमची आई म्हणजे 'खुबसुरत' मधली 'दिना पाठक असं समजा! म्हणजे जास्त सांगायला नको! हे माझं विधान नकारात्मक अजिबात नाही. आमच्या घरात गेल्या अनेक पिढ्या मातृसत्ताक आहेत. बाबांची आई व पत्नी यांच्यामुळे त्यांचं राजकारण व समाजकारण झालं, तर माझ्या आईमुळे भाऊसाहेबांचा संसार झाला. भाऊसाहेब वकील होऊन आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांनी खासगी वकिली केली. अशील यायचे, खटला चालायचा, अनुकूल निकालही यायचा, पण फी कशी मागायची ह्य प्रश्न काही वकीलसाहेबांना सुटायचा नाही! आईने वेळीच हस्तक्षेप करून भाऊसाहेबांना सरकारी नोकरी घ्यायला लावली. आजकाल स्त्री सबलीकरण हा चर्चेतला विषय आहे. त्या काळात माझी आजी कसलंही आरक्षण नसताना खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवून आधी नगरसेवक व नंतर पंढरपूर नगरपालिकेची पहिली महिला उपाध्यक्ष झाली होती. माझ्या दोन्ही आत्यादेखील व्यवस्थित शिकल्या धाकटी आत्या तर तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुणे विद्यापीठाची बी. ए. झाली. आईने आपल्या सासूचा समाजसेवेचा वारसा वर्धिष्णू केला. तीदेखील अनेक वर्षे नगरपालिकेची नगरसेवक होती. इथल्या एका मोठ्या नागरी सहकारी बँकेची ती चेअरमन झाली. या बँकेची पूर्णपणे महिलांनी चालवलेली 'महिला शाखा' तिनेच स्थापन केली. भाऊसाहेब अत्यंत नियमितपणे रोजनिशी लिहायचे. त्यांचं अक्षर फारसं सुवाच्य नव्हतं. त्यामुळे ती इतर कोणाला वाचता येणं शक्य नव्हतं. अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा त्यांचा मार्ग असावा. भाऊसाहेब नोकरीनिमित्त बऱ्याच गावांत वास्तव्य करते झाले. त्या त्या गावामधून ते आईला वेळोवेळी पत्र पाठवायचे. आईलादेखील त्यांची पत्र वाचताना त्रासच व्हायचा. आई विनोदाने म्हणायची, "पत्र आलं याचा अर्थ ते सुखरूप आहेत... लिखित शब्दामागची भावना महत्त्वाची!” त्यांचं अक्षर विद्यार्थिदशेत बरं होतं. नंतर ते हळूहळू बिघडत गेलं. ते रोजनिशीत काय लिहितात, ते त्यांना विचारायचा मी एकदोनदा प्रयत्न केला होता. पण त्यांनी तो विषय शिताफीने टाळला. भाऊसाहेबांचं अक्षर बिघडणं सुनियोजित होते! म्हणजे त्यांनी ते काहीसे ठरवून केलं होतं काय, असा मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो! त्यांच्या अंतर्मुख प्रवृत्तीचा तो आविष्कार असावा. अर्थात हा माझा कयास आहे. भाऊसाहेब पुण्यातून वरिष्ठ श्रेणी पोलीस अभियोक्ता म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गृहखात्याला पोलीस अभियोक्ता कसा असावा याविषयीचं एक टिपण पाठवलं होतं. त्यात एक महत्त्वाची शिफारस होती- पोलीस अभियोक्ता या पदनामातच पोलीस हा शब्द आहे. त्यामुळे त्याने पोलिसांच्या आधीन राहून फक्त पोलिसांचीच वकिली करावी असं गृहीतक निघतं. प्रत्यक्षात तो जनतेचा वकील असतो. न्यायव्यवस्थेसमोर घडलेल्या गोष्टीची यथार्थ, निष्पक्ष मांडणी करून खऱ्या अर्थाने न्याय व्हावा यासाठी या व्यवस्थेने काम केले पाहिजे. त्यासाठी पोलिसांच्या नियंत्रणातून ही व्यवस्था मोकळी करून तिची स्वतंत्र •वेगळी आस्थापना स्थापन करावी अशी ती शिफारस होती. बऱ्याच वर्षांनी शासनाने धोरणबदल करून या सरकारी वकिलांची पोलिसी नियंत्रणातून सुटका केली. आता गृहखात्याअंतर्गत एक वेगळा विभाग या वकिलांच्या कामकाजाचं नियंत्रण करतो. आता या पदाला 'पोलीस अभियोक्ता' असे न म्हणता 'सरकारी वकील' (Public Prosecutor ) म्हणतात. आता पोलिसांच्या तपासाबाबतचं आपलं मत हे वकील मोकळेपणाने मांडू शकतात व त्याचा परिणाम अधिकाधिक आरोपींना शिक्षा होण्यात होऊ लागला आहे. ११ ऑगस्टला २०१३ साली त्यांचा नातू मिहिर उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेला. त्याला मुंबई विमानतळावरून निरोप देऊन १२ तारखेला रात्री मी व सौ. शुभांगी परतलो. १३ तारखेला सकाळी सौ. शुभांगीने त्यांना मिहिर सुखरूप पोचल्याचं सांगितलं. 'त्याची जेवणाची व्यवस्था काय आहे?' असं भाऊसाहेबांनी विचारलं. त्याच दिवशी दुपारी भाऊसाहेबांनी इहलोक सोडला. ते गेल्यानंतर मला एक वेगळीच बधिरता आली. अंत्यसंस्कार पार पडले. आप्तेष्ट येऊन भेटत होते. सर्वांशी रीतसर बोलत होतो. पण मनात अजिबात दुःख वा शोक किंवा इतर कसलीच भावना येत नव्हती. एखाद्या यंत्रमानवाचा वावर व्हावा तसं काहीसं माझं झालं होतं. चार-पाच दिवसांनी रात्री अकरा-साडे अकराच्या सुमारास मी संगणकावर थोडंसं काम करत होतो. साचलेल्या काही इमेल मार्गी लावल्या आणि काहीतरी ऐकावं म्हणून भीमसेन जोशींकडे वळलो. अचानक संत तुकारामांचा पंडितजींनी गायिलेला एक अभंग सापडला. याजसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥ आता निश्चितीने पावलो विसावा । खुंटलिया धावा तृष्णेचिया ॥२॥ कवतुक वाटे झालिया वेचाचे नाव मंगळाचे तेणे गुणे ॥३॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आता दिवस चारी खेळीमेळी ॥४॥ पंडितजींचा आर्त सूर अक्षरश: हृदयात घुसत होता. डोळ्यांमधून अश्रूंची धार कधी सुरू झाली ते कळलं नाही. मी हे अश्रू आवरायचा अजिबात प्रयत्न केला नाही. या अश्रूरूपाने मला जी अनुभूती मिळत होती, तिच्यामागे तृष्णेवर विजय मिळविणारे भाऊसाहेब होते. अतिशय आनंद वा दुःख झालं की डोळ्यात अश्रू येतात असं म्हणतात, पण अश्रूंचा हा प्रकार मात्र अलौकिक होता. एका स्थितप्रज्ञाच्या जीवनसाधनेचं ते सार होतं. त्याचं शब्दात वर्णन करण्याची माझी पात्रता नाही! (दिवाळी २०१९) निवडक अंतर्नाद २५५