पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

होती, इंग्रजी व्याकरणातील अनेक संकल्पना त्यात आकर्षक चित्रांचा जागोजागी वापर करून समजवण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रकरणाअखेरीस अनेक प्रश्न दिलेले असत. त्यांची उत्तरं दिली, की ते-ते प्रकरण पक्कं होत असे. मी ही पुस्तकमालिका भाऊसाहेबांबरोबर सोडवली. त्यांच्या खांद्यावर, डोक्यावर, मांडीवर बसून प्रत्येक प्रकरणाअखेरीचे प्रश्न मी सोडवत असे. माझ्या बऱ्या इंग्रजीचं मूळ या हसतखेळत केलेल्या इंग्रजीच्या पाठांमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे. 'अभ्यासाचा आता कंटाळा आला' असं मी जाहीर केलं, की लगेच आमचा हा अभ्यास थांबत असे. पण गुरुजींच्या खांद्यावर बसून अभ्यास करण्याची मुभा असल्याने कंटाळा लौकर कसा येईल! भाऊसाहेबांना बालमानसशास्त्राची जाण होती, का त्यांच्यात एक निरागस बालक होतं ते माहीत नाही, पण ते बच्चे कंपनीत फारच लोकप्रिय होते. माझा मुलगा मिहिरही माझ्यासारखाच शब्दश: त्यांच्या अंगाखांद्यावर खेळला. भाऊसाहेब, आई व मिहिर हे तिघे मिळून रामायणातील व महाभारतातील अनेक प्रसंग घरी सादर करायचे, मिहिरच्या इच्छेनुरूप रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा, दुर्योधन, दुःशासन इत्यादी खलनायकी थाटाची पात्रं आई व भाऊसाहेबांच्या वाट्याला यायची व त्याला ते यथाशक्ती न्याय द्यायचे. वानरसेनेचा भाग म्हणून आपल्या लेंग्यात वृत्तपत्राच्या पट्ट्यांची तयार केलेली शेपटी अडकवून भाऊसाहेब मिहिरच्या बरोबरीने उड्या मारायचे, पळायचे, प्रसंगी युद्धातला एखादा बाण वर्मी लागून त्यांना धारातीर्थी पडण्याचं सोंगही वठवावं लागे! मिहिरप्रमाणेच घरी येणाऱ्या इतर बालचमूतही भाऊसाहेब 'आबा' अतिशय लोकप्रिय होते. आपण घरात एखादं लहान मूल आलं की जरा जादा सतर्क होतो. ते काही तोडफोड करणार नाही ना याची सर्व जण दक्षता घेऊ लागतात व त्याच्यावर सूचनांचा एकच भडिमार सुरू होतो. भाऊसाहेब आबांची खोली मात्र याला अपवाद होती. तिथे येणाऱ्या बच्चे कंपनीला अक्षरश: मुक्तद्दार होतं. कागद फाडणं, पेन फेकणं, पुस्तकं उलटीसुलटी करून पाहणं, कपड्यावर शाईचे फराटे मारणं या गोष्टींना तेथे अजिबात मज्जाव नसायचा. प्रसंगी त्याला उत्तेजनच दिलं जायचं. आता ही भाऊसाहेबांची खोली हा एक जगावेगळा प्रकार होता. आई काहीशा वैतागाने त्याला 'मठी' म्हणायची, ही खोली आमच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर एका बाजूला होती. खरंतर जास्तीचं सामान ठेवायला म्हणून ही खोली बांधलेली. सेवानिवृत्तीनंतर भाऊसाहेबांनी हळूहळू या खोलीचा ताबा घेतला. अडगळीची खोली असल्याने घरात इतरत्र प्रचलित असलेले साफसफाई, नीटनेटकेपणा इत्यादी 'सद्गुण' या खोलीत फारसे प्रवेश करू शकायचे नाहीत. या खोलीच्या उंबऱ्या बाहेरचं विश्व व खोलीतलं भाऊसाहेबांचं भावविश्व यांत अक्षरशः युगायुगांचं अंतर होतं. ज्याला ब्रह्म व माया यांतील फरक समजावून घ्यायचा असेल त्याने या खोलीत एकदा डोकावले तरी त्याची बरीच प्रगती झाली असती! खोलीत दोन भिंतींलगत लावलेल्या जुन्या ट्रंका होत्या. इतर दोन भिंतींत असलेल्या कप्प्यांत असंख्य जुनी पुस्तकं रचून ठेवलेली होती. वृत्तपत्रात येणाऱ्या मजकुराची कात्रणं कापून २५४ निवडक अंतर्नाद ठेवायचा भाऊसाहेबांना छंद होता. पुणे येथील सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ पद्मश्री डॉ. अशोक केळकर हे भाऊसाहेबांचे कॉलेजमधील मित्र होते. मराठी भाषा किंवा व्याकरणाचे संदर्भ असलेली अनेक कात्रणं आपल्या टिपणीसह भाऊसाहेब त्यांना पाठवायचे. ते ती टिपणं वाचून त्यावरची त्यांची मतं भाऊसाहेबांना पाठवायचे, हा पत्रव्यवहार फारसा गाजावाजा न होता अनेक वर्ष चालू होता. या भाऊसाहेबांच्या मठीत पंखा नव्हता. तरीही भर उन्हाळ्यात भाऊसाहेब डोक्याला पाट घेऊन व खाली चवक वर्तमानपत्र अंथरून अनेकदा तेथेच गाढ झोपी जायचे. आईचा संताप संताप व्हायचा, पण तो संताप त्या खोलीत पोचूच शकायचा नाही. काय काय होतं त्या खोलीत? या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'काय काय नव्हतं त्या खोलीत?' असा प्रतिप्रश्न करावा लागेल. आमची सर्वांची शालेय प्रगतिपुस्तकं, पंचांग, वेगवेगळे वैद्यकीय अहवाल, प्रमाणपत्रं, जन्मदाखले, विवाहदाखले, लग्नपत्रिका, अगदी ब्रह्मांडच म्हणाना! त्यांची स्वतःची कागदपत्रं ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत होती. वरकरणी ती अगम्य वाटली, तरी त्यांना स्वत:ला कोणता कागद कोठे आहे ते अगदी अचूक माहीत होते. काहीही मागितलं की क्षणार्धात ते तो कागद हजर ठेवायचे. त्यांचा देवावर विश्वास होता का, याचा मी विचार करू लागतो. हा विचारच अत्यंत प्रेरक होता. त्यांच्या खोलीत सर्व बाजूंना मिळेल तिथे खिळे ठोकलेले असायचे. जाडसर छापडीच्या एका बाजूला कोरा पांढरा कागद लावून, त्यावर ॐ असं लिहून ते जागोजागी लावलेले असत. त्यांच्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत बायबल हे अग्रस्थानी होते. मीही त्यांच्याबरोबर पत्राद्वारे बायबल अभ्यासक्रमाचे काही धडे बालपणी विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले. ते आईबरोबर अनेक वेळा ज्ञानेश्वर महाराजांच्या मठात, होळकर वाड्यातील राममंदिरात जायचे, पण प्रत्यक्ष देवळात न जाता चपला राखण्याच्या नावाखाली जवळच्या फळीवर बसून राहायचे, विनोद म्हणजे एकदा भाऊसाहेब असे चपला राखत बसलेले असतानाही त्यांचाच स्वतःचा चपलाजोड चोरीला गेला होता! आम्ही पंढरपुरात राहात असूनही भाऊसाहेब आवर्जून कधी पांडुरंगाला गेल्याचं मलातरी आठवत नाही. एकंदरीत त्यांचा कल निर्गुण उपासनेकडे असावा असं वाटतं. त्यांना अंतिम सत्य गवसलं होतं का? मला माहीत नाही! हा त्यांचा प्रवास मात्र चालू होता. त्या प्रवासात खिळ्याला लावलेले ओंकार व कप्प्यातील बायबल हे त्यांचे मैलाचे दगड होते. 'Fear those who have found the truth, cherish those who are in search of it' असं साक्षात व्हॉल्टेअर सांगून गेला आहे. मुलगा म्हणून माझ्यावरती कसलेही धार्मिक संस्कार करण्याचा यत्किंचित प्रयत्न त्यांनी कधी केला नाही. त्याचबरोबर वडील म्हणून त्यांनी मला धाक दाखविण्यासाठी एकदाही हात लावला नाही हेही आवर्जून नमूद करावे लागेल. खिळे मारण्याच्या त्यांच्या वर उल्लेख केलेल्या छंदापायी त्यांना अनेकदा हाताला किंवा पायाला लागून रक्तस्त्राव व्हायचा. आम्ही कोणीतरी काहीतरी बोलू म्हणून ते आम्हाला ही बाब सांगायचेच नाहीत. पायजम्यावर किंवा शर्टावर पडलेल्या रक्ताच्या