पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यामुळे जातपात आमच्या आसपासदेखील नव्हती. घराच्या पंढरपूरच्या सामाजिक इतिहासात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या • हरिजन मंदिर प्रवेश सर्वधर्मीयांचा मंदिर प्रवेश. व साने गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी पंढरपुरात प्राणांतिक उपोषण केलं. त्यावेळी हरिजन मंदिर प्रवेश मान्य व्हावा व गुरुजींचे प्राण वाचावे म्हणून स्थानिक पातळीवरील झालेल्या सर्व प्रयत्नांची धुरा बाबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाहिली. या उपोषणाची कोंडी फुरावी म्हणून अनेक स्थानिक लोकांची मनधरणी त्यांना करावी लागली. या सर्व प्रयत्नांचं फलित म्हणून विठ्ठल 'विश्वदेव' झाला. पंढरपूर देवस्थानाच्या त्यावेळच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी नाडकर्णी कमिशन नेमण्यात आलं होतं. त्यापुढे त्याकाळचे विधानसभा सदस्य म्हणून बाबांची साक्ष झाली होती. मतांचा हिशोब न करता बाबांनी परखडपणे तत्कालीन व्यवस्थेतील गैरप्रकार कमिशनच्या नजरेस आणून दिले होते. नाडकर्णी कमिशन हा पंढरपूर देवस्थानाच्या व्यवस्थापनाचा एक अप्रिय परंतु आवश्यक आढावा आहे. कमिशनचे अध्यक्ष नाडकर्णी व सचिव हुपरीकर यांनी चौकशी अहवाल कसा तयार केला पाहिजे त्याचा जणू एक आदर्शच या निमित्ताने निर्माण केला आहे. बाबांचा संसार त्यांची आई व पत्नी या दोघी मिळूनच यथाशक्ती चालवीत होत्या. त्याकाळी घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचीच प्रथा असल्याने बाबांनी पंढरपुरात अनेक संस्था स्थापन करून त्या जोपासल्या, पण कटाक्षाने त्यांची संस्थाने होऊ दिली नाहीत. अशा पित्याचे आपल्या मुलांकडे किती व काय लक्ष असणार ते वेगळे सांगायला नको. त्यांचे चिरंजीव भाऊसाहेब म्हणजे माझे वडील त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९२९ रोजी पंढरपूर मुक्कामी झाला. त्यांना दोन भाऊ व दोन बहिणी! भाऊसाहेबांचा क्रमांक वरून दुसरा, भावंडं जास्त असण्याचे काही फायदे-तोटे असतात. भाऊसाहेबांना फायदेच जास्त झाले असं म्हणायला हरकत नाही. बाबांसारखे घरात फारसं लक्ष न देणारे वडील असल्याने ही भावंडं आपले प्रश्न - अडचणी एकमेकांना विचारून सोडवीत असत. भाऊसाहेबांसमोर अशा स्थितीत आदर्श होता तो त्यांचे थोरले भाऊ बाळासाहेब यांचा या सर्व भावंडांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाबांसारख्या हिमालयाच्या सावलीत वाढतानादेखील त्यांनी आपली बौद्धिक वाढ खुंटू दिली नाही. बाळासाहेब यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय व्यासंगी होतं. वाचन, लेखन, वक्तृत्व या बाबतीत त्यांनी आपल्या पित्याचाच वारसा पुढे चालवला होता. ते पुढे जळगाव व भुसावळ इथे महाविद्यालयांचे प्राचार्य झाले व पुणे विद्यापीठाच्या विद्वत्सभेचे ते अनेक वर्षं सभासद होते. त्यांचाच कित्ता गिरवत भाऊसाहेब प्रथम इतिहास विषय घेऊन एम. ए. झाले व नंतर एलएल.बी. इतिहासाची आवड व प्राध्यापक होण्याची मनीषा असणारे भाऊसाहेब नियतीच्या एका डुलकीने सरकारी वकील झाले. एखाद्या गुन्ह्याचा, पोलिसांनी 'तपास' या नावाखाली लावलेला निकाल 'इदं न मम' वृत्तीने न्यायासनासमोर मांडणाऱ्या गरीब बिचाऱ्या प्राण्याला 'सरकारी वकील' म्हणतात! ही सरकारी नोकरी त्यांनी २५-३० वर्षं केली. नोकरीनिमित्ताने पहिली बढती मिळाल्यावर गडचिरोलीमध्येही त्यांनी दोन-अडीच वर्षं काम केलं. 'नक्षलवादाचा किती त्रास झाला?' असं त्यांना विचारल्यावर 'गडचिरोलीत न्यायदानाचं काम नक्षलवादीच करत असल्याने मला तिथल्यासारखा आराम कोठेच मिळाला नाही' असं त्यांनी मला एकदा हसत हसत सांगितलं. या सर्व शासकीय नोकरीच्या काळात त्यांनी कधीही बदली किंवा बढती या विषयांकरिता आपल्या पुढारी असलेल्या वडिलांच्या ओळखीचा वापर केला नाही. ते गडचिरोलीत असताना तेथील दुर्गम भागातील एका गावचा सरपंच एका शासकीय कामाबद्दल त्यांचं मार्गदर्शन घ्यायला गडचिरोलीला जिल्हा मुख्यालयात येऊन त्यांना भेटला, भाऊसाहेबांशी चर्चा करून तो गावी परतताच, शासनाचा खबऱ्या असल्याचा संशय घेऊन त्याचा शिरच्छेद करण्यात आला. ही गोष्टही आम्हाला भाऊसाहेबांकडूनच कळली. माझा मोठा भाऊ अजित याच्या जन्माच्यावेळी त्याच्या मानेभोवती नाळेचा तिढा पडला होता व त्यावेळी वेळेवर प्राणवायू न मिळाल्याने तो प्रसूतीच्या वेळी गुदमरला. त्याला त्यामुळे अपस्माराचे झटके येऊ लागले. उपचारांची पराकाष्ठा होऊनही त्याचा हा आजार पूर्ण बरा झाला नाही. चौथीपर्यंत त्याने शालेय शिक्षण घेतले. त्यावेळी तो पहिल्या दुसऱ्या क्रमांकात असायचा. पुढे वैद्यकीय सल्ल्याने नाइलाजाने त्याची शाळा बंद करावी लागली. अजित हा भाऊसाहेबांच्या भावविश्वातला एक हळवा कोपरा होता. त्याला ते फार काळजीने जपायचे, शक्यतो त्याच्या मनाविरुद्ध काही घडणार नाही याची काळजी घ्यायचे, ते जरी त्याचे वडील असले तरी त्याच्याशी एक मित्र म्हणून वागायचे. आम्हाला त्यांनी कधीही मारलं नाही किंवा आम्हाला ते कधी रागावलेदेखील नाहीत. ते एकदा नोकरीनिमित्त सांगलीत असताना मे महिन्याच्या सुट्टीत मी त्यांच्यापाशी सांगलीला राहायला गेलो होतो. ते ऑफिसातून घरी आले की मारुती चौकातल्या एका पुस्तकाच्या दुकानात आम्ही फिरत जायचो व रोज एक छोटं पुस्तक ते मला विकत घेऊन द्यायचे. माझं वाचनवेड जपण्याचा त्यांचा हा अभिनव उपक्रम होता, मी पाचवीत गेल्यावर इंग्रजी विषय माझ्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला. त्याकाळी इंग्रजी व्याकरणाची 'Brighter Grammar' या नावाची चार पाच पुस्तकांची मालिका प्रसिद्ध निवडक अंतर्नाद •२५३