पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मध्यंतरी 'माऊली' सारखी एक वेगळ्या विषयावरील कादंबरीही यादवांनी लिहिली होती. आदिम मातृबंधाची एक वेगळी कलात्मक मांडणी कशी असू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कादंबरी होय. मी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत सदस्य असताना व्याख्यानमाला हा विभाग सांभाळत होतो. तेव्हा यादवांना व्याख्यानमालेसाठी बोलावलं होतं. यादवांनी दोन व्याख्यानं दिली होती. मध्यंतरी डॉ. सुभाष सावरकरांनी भंडारा येथे जनसाहित्य संमेलन आयोजित केलं होतं त्याचे अध्यक्ष आनंद यादव होते. त्यांना विदर्भातून अनेकदा अशा वाड्मयीन कार्यक्रमांचं बोलावणं जायचं आणि ते प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून यायचे. त्यांच्या अशा मुक्कामात त्यांची माझी आवर्जून भेट व्हायची. एकमेकांची ख्यालीखुशाली आम्ही विचारायचो. तोपर्यंत त्यांचे माझे मैत्रीचे बंध कौटुंबिक पातळीवर स्थिरावले होते. नागपूरला आले, की ते आवर्जून घरीही यायचे. यादव हे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक आहेत आणि त्यांच्यावर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत कुठल्या का कारणाने होईना, पण दोनदा अन्याय झाला, आता ते या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हायला हवेत, असं मनोहर म्हैसाळकरांना मनातून वाटत होतं. मागच्या दोन वेळेला विदर्भ साहित्य संघ त्यांच्या पाठीशी उभा राहू शकला नव्हता. आता आपण त्यांच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहू तेव्हा त्यांनी आता अध्यक्षपदासाठी अर्ज भरावा म्हणून म्हैसाळकरांनी दोनतीनदा त्यांच्याकडे माझ्यातर्फे निरोप दिला होता. 'आता तुम्ही हा विचार केला तर विदर्भ साहित्य संघ निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभा राहील,' म्हणून मीही त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण आधीच्या दोन अनुभवांनी ते इतके दुखावले होते, की त्यांनी तो विचार मनातून जवळजवळ काढूनच टाकला होता. मध्यंतरी माझ्या चिरेबंद या कादंबरीला रणजित देसाई यांच्या नावाने साहित्य पुरस्कार जाहीर झाला आणि मी तो पुरस्कार घ्यायला रणजित देसाई यांच्या कोवाड या गावी गेलो, मेहता पब्लिशिंग हाऊसच्या पुढाकाराने हा पुरस्कार सुरू झाला होता आणि पहिल्या पुरस्काराचा मानकरी मी ठरलो होतो. मी कोवाडला गेलो तेव्हा तिथे आनंद यादव, अनिलभाई मेहता, चंद्रकुमार नलगे ही मंडळी आधीच आलेली होती. यादव कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तिथे रणजित देसाईंच्या पांडुरंग कुंभार या लेखनिकाकडून मला कळलं - आनंद यादव परीक्षक मंडळात होते आणि त्यांनी आपला कौल माझ्या बाजूने दिला म्हणून अर्थात एक संकेत म्हणून यादवांनी हे मला कधीही सांगितलं नाही. पण असे अनेकदा ते माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. आणि याला कारण म्हणजे ते माझे एक तटस्थ वाचक होते. माझ्या बहुतेक पुस्तकांवरील त्यांच्या प्रतिक्रिया मला खूप मोलाच्या वाटत होत्या. माझ्या लेखनासंबंधी ते नेहमी म्हणत 'तुमच्या लेखनाची प्रकृती शांत आणि संयमित स्वरूपाची आहे. एखादा अनुभव तुम्ही कलाकृतीत मांडता तेव्हा तो सर्वांगाने कसा विकसित होईल आणि त्यात लेखक कसा तटस्थ राहील हे तुम्ही फार चांगल्या रीतीने साधता. असं लेखन फार कमी लेखकांना साधतं.' त्यांची माझ्या लेखनाविषयीची ही प्रतिक्रिया माझ्यावरील प्रेमापोटी असेल, पण ती आंधळी नव्हती हेही मला समजत होतं. निवृत्तीनंतर आनंद यादवांनी वारकरी संप्रदायातील दोन महत्त्वाच्या संतांवर कादंबऱ्या लिहिण्याचा संकल्प सोडला. त्यातली पहिली लोकसखा ज्ञानेश्वर आणि दुसरी होती संतसूर्य तुकाराम, दोन्ही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि त्या चांगल्या विकल्यासुद्धा गेल्या. वाचकांना त्या मनापासून आवडल्या, पण त्यावेळीही माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला होता. आणि तो म्हणजे या दोन कादंबऱ्या लिहून आनंद यादवांचा वाड्मयीन आलेख असा कितीसा उंचावला ? कारण चरित्रात्मक कादंबरीलेखनाची त्यांची प्रकृती नव्हती. त्यांचा पिंड नवसाहित्यावर पोसला गेला होता. ते मौजेचे लेखक होते. श्री. पु. भागवत, राम पटवर्धन यांच्या तालमीत ते तयार झाले होते. त्यामुळे समकालीन वास्तवाचा विचार त्यांच्या साहित्यात प्रामुख्याने अधोरेखित व्हायचा. असा वाड्मयीन पिंड असलेला लेखक या विषयांकडे का वळावा हा प्रश्न मला आजही अनुत्तरीतच आहे. हे दोन्ही संत लोकमानसात खूप खोलवर रुजलेलं असल्यामुळे त्यांच्यावर या आधी अशा प्रकारचे कादंबरीलेखन झालेलं होतं. नाही असे नाही. त्यामुळे या आधीच्या लेखनापेक्षा आणखी वेगळं असं ते काय आपल्या लेखनातून मांडू शकतील, ही शंका मला होतीच, त्यापेक्षा या संतांवर त्यांनी समीक्षणात्मक, वाड्मयीन कर्तृत्वावर विवेचनात्मक, अभ्यासपूर्ण लेखन केलं असतं, तर कदाचित ते त्यांचं लेखन अधिक महत्वपूर्ण ठरलं असतं असं मला वाटतं. अर्थात हे माझं मत झालं. पण तरीही त्यांनी त्या कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या लोकप्रियही ठरल्या. लोक त्या आवडीने वाचू लागले. यानंतर यादव आपल्या कादंबरी लेखनासाठी कोणता विषय निवडतात याविषयी मला उत्सुकता होती. मधल्या काळात ते ललितसाहित्याविषयी काहीसे उदासीन झालेले दिसत होते. आवर्जून वाचावं असं काही ह्यताशी येत नाही ही त्यांची तक्रार होती. अर्थात त्याविषयी मी त्यांच्याशी सहमत होतोच असंही नाही. कारण माझ्या पिढीवर माझा भरवसा होता. आम्ही आमच्या पिढीपेक्षा वेगळं असं काही मांडण्यासाठी धडपडत आहोत असं मला वाटायचं. पण यादवांनी मात्र या काळात काही अपवाद सोडले तर ललितसाहित्य वाचायचं बंद केलं होतं. त्याऐवजी ते तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास अशी पुस्तकं अधिक वाचू लागले होते. वाचनाच्या बाबतीत जे होतं तेच लेखनाच्या बाबतीतही त्यांचं झालं होतं. या काळात त्यांचं ललितलेखनही जवळ जवळ थांबलं होतं. कथा तर त्यांनी लिहीणंच सोडलं होतं. 'आता आधीसारखं काही सुचत नाही,' अशी त्यांची स्वतःविषयीचीच तक्रार असायची. ही तक्रार साधारणतः वयाच्या किंवा लेखनाच्या विशिष्ट टप्प्यानंतर प्रत्येकच लेखकाच्या बाबतीत असते का? त्याचे निवडक अंतर्नाद २४३