पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखक म्हणून या काळात माझीही धडपड सुरू होती. अशातच माझी रक्तध्रुव ही कादंबरी लिहून पूर्ण झाली होती. ती मी यादवांना वाचायला दिली. त्यांनी त्यात काही बदल सुचविले. नंतर ती कादंबरी त्यांच्याच पुढाकाराने आधी 'पुढारी' च्या दिवाळी अंकातून आणि नंतर मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे पुस्तकरूपात प्रकाशित झाली. यानंतर आमचे मैत्रीचे संबंध अधिक घट्ट झाले. माझे कादंबरी- लेखन मी त्यांना वाचायला देऊ लागलो, त्यावर ते आपल्या प्रतिक्रिया देऊन माझ्याकडून त्याचे पुनर्लेखन करवून घेऊ लागले. साधारणत: माझ्या कोंडी या कादंबरीपर्यंत हा आमचा संवाद कायम होता. त्यामागचं एक कारणही होतं. आणि ते म्हणजे यादव त्यावेळी मेहता पब्लिशिंग हाऊससाठी संपादनाचे काम करीत होते. यादवांमुळेच मी मेहता पब्लिशिंग हाऊसचा लेखक झालो होतो. त्यावेळी माझ्या पिढीच्या अनेक लेखकांना यादवांनी मेहतांच्या उंबरठ्यावर उभं केलं होतं. पण पुढे त्यातल्या काहींनी केवळ आपल्या स्वार्थासाठी यादवांकडे पाठ फिरवली. केवळ पाठच फिरवली नाही, तर त्यांच्यावर वैयक्तिक टीका करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. अशा मंडळींविषयी त्यांच्या मनात कायमच पश्चातापाची भावना सलत होती. यादवांच्या साहित्याशी माझी तोंडओळख व्हायला लागली तेव्हा मी त्यांच्या नटरंग या कादंबरीने अक्षरश: भारावून गेलो होतो. हे भारावलेपण जरा वेगळ्या कारणामुळे निर्माण झालं होतं. आणि ते कारण होतं कारण होतं माझ्या नाट्यप्रेमाचं, नटरंग वाचल्यावर मला एक गोष्ट आवर्जून जाणवली आणि ती म्हणजे या कादंबरीत फार मोठी नाट्यात्मकता आहे. यावर नाटक लिहिलं तर ते रंगभूमीवर अधिक यशस्वी होईल, अशी खात्री पटली. त्या दिवसांत मी नाटकांच्या प्रेमात पार बुडलो होतो. आपलीही नाटकं रंगभूमीवर यावीत, त्यांचे भरपूर प्रयोग व्हावे असं वाटत होतं. यापूर्वी माझं एक नाटक महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादरही झालं होतं. त्यामुळे इथल्या नाटकवाल्यांशी बऱ्यापैकी मैत्रीही झालेली होती. नटरंगवर आपण नाटक लिहावं आणि ते राज्य नाट्यस्पर्धेत सादर करावं असं मनातून वाटू लागलं आणि त्याच इच्छेपोटी मी यादवांकडे कादंबरीच्या नाट्यरूपांतराची परवानगी मागितली, यादवांसारखे ज्येष्ठ लेखक आपल्याला याविषयीची परवानगी देतील की नाही ही शंका मनात होतीच, पण त्यांनी ताबडतोब पत्र पाठवून मला या नाट्यरुपांतराची परवानगी दिली. या माझ्यासाठी नटरंगचे नाट्यरूपांतर करणं ही गोष्ट जेवढी आनंददायक होती तेवढीच ती जोखमीचीही होती. कारण एक तर मी अशा प्रकारचं कलांतर पहिल्यांदाच करीत होतो. आणि त्यातच कादंबरीतला अख्खा जीव मला त्या तीन तासांच्या प्रयोगात ओतायचा होता. मी माझं सगळं कसब पणाला लावून अधिक जबाबदारीने लेखनाला बसलो आणि दोन ते तीन आठवड्यांत त्यावरील काम पूर्ण केलं. त्याचं शीर्षक ठेवलं होतं होती एक बृहत्रडा, नाट्यरूपांतराचा पहिला खर्डा पूर्ण झाला आणि तो मी यादवांना पाठवून दिला. त्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासाठी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांचं आठ दिवसांत २४२ • निवडक अंतर्नाद पत्र आलं आणि त्यांनी त्यात लिहिलं होतं 'यापूर्वी नटरंगवर तिघाचौघांनी नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला; पण त्या सगळ्यांपेक्षा तुमचे नाट्यरूपांतर अधिक उजवे आहे.' त्या प्रतिक्रियेने माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं होतं. नागपूरच्या रंगस्वानंद या नाट्यसंस्थेने एकोणतिसाव्या राज्य नाट्यस्पर्धेत त्या नाटकाचा सुरेख प्रयोग सदर केला. इथे ते प्रादेशिक फेरीत दुसरं आलं. अंतिम फेरीसाठी या नाटकाची निवड झाली. या नाटकाचा प्रयोग यादवांनी बघावा म्हणून मी त्यांना दोन्ही वेळेला आग्रहाने बोलावलं होतं; पण त्यांना ते शक्य झालं नाही. मुंबईच्या प्रयोगाला मात्र त्यांच्याऐवजी त्यांची मोठी मुलगी स्वाती आपल्या यजमानांसोबत आली होती. तो प्रयोग तिलाही खूप आवडला होता. हा प्रयोग पाहायला डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर आवर्जून आले होते, तेव्हापासून त्यांची मैत्री झाली ती कायमची. प्राथमिक फेरीसाठी परीक्षक असलेले श्री. अनंत ओक (रोहिणी हट्टंगडीचे वडील) यांनी ते नाटक कापड गिरणी नाट्य स्पर्धेसाठी बाजीराव पोपळकरांना सुचविलं. त्याचे प्रयोग त्या स्पर्धेतही झाले. पुढे बाजीराव पोपळकरांनी नटरंगवर त्याच नावाने यादवांकडून नाटक लिहून घेऊन त्याचे व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग केले. पण ते नाटक व्यावसायिक रणभूमीवर फार चाललं नाही. यादवांनी खूप आधी रात घुंगराची या नावाचं एक वगनाट्य लिहिलं होतं. त्यावरूनच त्यांनी पुढे नटरंग लिहिली होती. तीच गोष्ट त्यांच्या गोतावळा या कादंबरीची सांगता येईल. त्यांच्या इंजिन या कथेवरून त्यांनी ही कादंबरी लिहिल्याचं त्यांनीच नमूद करून ठेवलं आहे. यादवांचा लेखनाचा झपाटा चकित करणारा होता. एकाच वेळी ते सव्यसाची वृतीने लेखन वाचन करीत होते. शिवाय ग्रामीण साहित्य चळवळही ते नेटाने चालवीत होते. याच दरम्यान ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुखही झाले होते. पण त्यांच्या लेखनावर आणि वाचनावरही या प्रशासकीय कामाचा कुठलाही परिणाम झाला नव्हता, उलट त्यांच्या आत्मचरित्राचे शेवटचे दोन खंड त्यांनी याच दरम्यान लिहून काढले होते. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'सत्तांतर'ला १९८३चा साहित्य • अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि काही दिवसांतच सत्तांतर ही कशी उचलेगिरी आहे, एका इंग्रजी पुस्तकावरून ती कशी बेतली आहे याबद्दलचा लेख श्री. ग. वा. बेहेरेंच्या 'सोबत' मधून एक निनावी लेख प्रकाशित झाला होता, तो निनावी लेख यादवांनी लिहिला असं म्हटलं गेलं आणि तेव्हापासून माडगूळकर यादव यांच्यातील वैमनस्याला चांगलीच धार चढली. माडगूळकरांनी यादवांवर अब्रुनुकसानीचा दावा टाकला. पण पुढे माडगूळकर गेले आणि तो विषय तिथेच संपला. खरं तर हे वैमनस्य इथेच संपायला हवं होतं; पण त्याची परिणती कलेचे कातडे लिहिण्यात झाली. ही कादंबरी माडगूळकरांची बदनामी करणारी कादंबरी आहे, अशी चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे माडगूळकरप्रेमी फार दुखावले. यादवांविषयी मराठी साहित्यवर्तुळात प्रतिकूल वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली ती इथूनच.