पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयोजित करणार होते आणि त्यांना या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून आनंद यादव हवे होते. यादवांचे प्रतिस्पर्धी म्हणून सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर हेसुद्धा रिंगणात उतरले होते. अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते गंगाधर गाडगीळ त्यापूर्वी रायपूरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गाडगीळांच्या विरोधात कानेटकर उभे होते आणि ते पराभूत झाले होते. त्यामुळे गाडगीळांची सहानुभूती कानेटकरांकडे होती. यादवांचं वय तेव्हा बावन्न वर्षांचं होतं तर कानेटकरांचं वय चौसष्ट वर्षांचं होतं. त्यामुळे एकीकडे ज्येष्ठत्वाच्या कारणांवरून काहींचा कल कानेटकरांकडे होता तर यादव भूमिका घेऊन लिहिणारे लेखक आहेत आणि कानेटकर लोकप्रिय नाटककार आहेत या मुद्द्यावरून काही मंडळींचा कल यादवांकडे होता. पण यादवांकडे कल असणारी मंडळी महामंडळाचे मतदार नव्हती. तथापि यादवांच्या पाठीमागे असणारी मंडळी पाहून कानेटकरांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी गाडगीळांकडे राजीनामा दिला; पण तो न स्वीकारता गाडगीळांनी कानेटकरांना मैदानात कायम ठेवलं. आता आपल्याला निवडणूक लढविण्यावाचून दुसरा पर्याय नाही हे पाहून कानेटकर कामाला लागले. परिणामी कानेटकर निवडून आले आणि यादवांचा पराभव झाला. आपल्याला हवा असलेला अध्यक्ष पराभूत झाला या सबबीवर बाळासाहेब विखे पाटील यांनी संमेलन घ्यायचं नाकारलं. त्यामुळे ते संमेलन ठाण्याला झालं. इकडे महामंडळाचे अध्यक्ष असताना गाडगीळांनी पक्षपात केला म्हणून गाडगीळांना महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात वेगळ्या राजकारणाने गाजलेलं हे एकमेव संमेलन होय. या सगळ्या प्रकारावर नागनाथ कोत्तापल्ले यांनी एक पुस्तकही लिहिलं. या काळात यादवांना पाठिंबा देणारं पाक नागपुरातून या. वा. वडस्कर यांनी काढलं होतं आणि त्या पत्रकावर सह्या घेण्यासाठी वडस्करांच्या सोबत मीही फिरलो होतो. त्यानंतर यादवांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा प्रयत्न केला तो परभणी येथील साहित्य संमेलनाच्या वेळी. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध नारायण सुर्वे उभे होते आणि महामंडळ नागपूरला होतं. आधीच्या वर्षी पणजीच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य राम शेवाळकर बिनविरोध निवडून आले होते. त्यावेळी शेवाळकरांसाठी सुर्वेनी माघार घेतली असल्यामुळे सुर्व्याविषयी तमाम रसिक वाचकांच्या मनात आपुलकीची आणि आदराची भावना होती. त्यामुळे याही वेळी यादवांना पराभव पत्करावा लागला. या दोन्ही पराभवांमुळे यादवांच्या मनात या व्यवस्थेविषयी अनास्थेची आणि दुराग्रहाची भावना निर्माण झाली होती. ती पुढे खूप वर्षं कायम होती. मला या संदर्भात नेहमी असं वाटतं, या दोन्ही वेळेला त्यांच्याकडून काही गफलत तर झाली नाही ना? कारण यादवांचा तो अधिकार कुणीही नाकारू शकत नव्हतं. फक्त प्रश्न होता योग्य वेळेचाच. आणि तीच त्यांना नेमकी साधता आली नाही की काय? कारण या दोन्ही वेळेला मी यादवांसोबत होतो. प्रवरानगर प्रकरणाच्या आसपासच यादवांची झोंबी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी प्रकाशित झाली आणि यादव यानिमित्ताने साहित्यवर्तुळात अधिक चर्चेत आले. आत्मचरित्रात्मक कादंबरी ही संकल्पना यादवांनी झोंबीला एक टिपण जोडून जाणीवपूर्वक मांडली आणि त्यामुळे या नव्या वाङ्मयप्रकाराची चर्चा सुरू झाली. झोंबीला पु. ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभल्यामुळे आणखी वेगळी झळाळी या सगळ्याला प्राप्त झाली होती. ही कादंबरी त्याकाळी वाचकांनी वेड्यासारखी वाचली आणि तिच्यावर वेड्यासारखं प्रेम केलं. शेकड्यांनी पत्र आली. जो तो झोंबी वाचून गदगदून जायचा. कुठून कुठून त्यांना माणसं भेटायला यायची. झोंबी लिहिणारा लेखक कोण आहे, कसा आहे हे पाहायला वेड्यासारखे वाचक त्यांच्याकडे यायचे. एक असाच अनुभव यासंदर्भात सांगता येईल. मी त्यांना भेटायला गेलो होते. सकाळची वेळ होती. घरी यादव एकटेच होते. त्यांनाही तासाभरात विद्यापीठात निघायचं होतं. आमच्या गप्पा सुरू होत्या. वढ्यात तीन चार माणसं अचानक त्यांना भेटायला म्हणून आली. कुठून खेडेगावातून आलेली असावीत. तरुणच होते. विशी पंचविशीचे अंगावर मळकट कपडे, केस अस्ताव्यस्त, बोलण्यात वागण्यात ग्रामीण ढब, त्यांना यादवांनी विचारलं – 'काय बाबांनो, कसे काय आला?' त्यावर त्यातला एक जण म्हणाला - 'सर, आम्ही सगळ्यांनी मिळून आपली झोंबी वाचली आणि आम्ही लई अस्वस्थ झालो की, आमचीच गोष्ट तुम्ही लिहून काढली की रहावलं नाही म्हणून रात्रभर एस. टी. चा प्रवास करून तुम्हाला भेटायला आलो.' यादव घरी एकटेच असल्यामुळे त्यांच्यासाठी चहापाणीही करू शकत नव्हते. त्यांनी त्यांची अडचण सांगितली. त्यावर ती मुलं म्हणाली, 'असलं काय बी नको सर फक्त तुमच्या पायावर डोकं ठेवू आणि निघू की.' आणि श्रद्धेने यादवांच्या पायांवर डोकं टेकवून ती सगळी मुलं आल्या पावली निघून गेली, मी स्तंभित होऊन हे सगळं पाहत होतो. त्यानंतर यादव म्हणाले 'शोभणे, झोंबीनं असा खूप मोठा गोतावळा उभा केला बघा माझ्याभोवती महाराष्ट्रभर, ' यादवांच्या मुलीनं - कीर्ती मुळीकनं - जानेवारी २०१७च्या 'ललित' मध्ये सांगितलेला अनुभव तर अंगावर शहारा आणणारा आहे यादवांना इकडे स्मशानभूमीवर नेलं असावं आणि त्यांची झोंबी वाचून गडचिरोलीचा एक वाचक घरी त्याना भेटायला त्यांच्या घरी आला होता. दोन दिवसांच्या प्रवासात त्याने पेपर वाचला नव्हता व त्यामुळे यादव गेले, ते त्याला कळलंही नव्हतं, या कादंबरीला त्यावर्षीचे बहुतेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. त्यांच्या प्रतिभेला सलाम म्हणून त्यावर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार झोंबीला प्राप्त झाला आणि यादवांच्या नावाला आणखी महत्त्व प्राप्त झालं. पुढे यादवांनी या वाङ्मयप्रकाराची चिकित्सा करताना यातील कादंबरी हा शब्द बाजूला सारला आणि चार खंडांत आपले आत्मचरित्र (झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल) मांडलं. त्यांच्या या आत्मचरित्रात्मक प्रकल्पावर अनेकांनी टीकाही केली; पण ते त्या टीकेला बधले नाहीत. निवडक अंतर्नाद २४१