पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणण्यापेक्षा त्या मतांचा मीही माझ्या परीने पुरस्कार करू लागलो, त्यांच्या खळाळ, गोतावळा इत्यादी कलाकृतींबद्दलची – विशेषतः निवेदनासंबंधीची मतं मला अधिक भावू लागली होती. मराठी ग्रामीण साहित्याच्या – विशेषतः साठोत्तरी ग्रामीण साहित्याच्या - संदर्भातील यादवांचं योगदान किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव झाली. ग्रामीण कलाकृतीचं निवेदनसुद्धा बोलीमधूनच करणं त्या त्या अनुभवाच्या प्रकटीकरणासाठी अधिक उपयुक्त ठरतं, स्वाभाविक ठरतं हा विचार त्यांनी आपल्या लेखनातून प्रत्यक्षपणे, आग्रहपूर्वक मांडला आणि तो त्या काळाच्या साहित्याविश्वाने केवळ स्वीकारलाच नाही, तर या भूमिकेचं अनुयायित्व पत्करण्याचं धाडसही अनेकांनी केलं. हे धाडस यासाठी की यापूर्वीच्या मराठी ग्रामीण साहित्याची प्रकृती काहीशी वेगळी होती. कलाकृतीचं निवेदन प्रमाणभाषेत आणि संवाद मात्र बोलीत अशाप्रकारे ग्रामीण साहित्य अस्तित्वात होतं. वाचकांची सोय म्हणून या लेखनाकडे पाहिलं जात होतं. वाचकाला कलाकृतीचा आस्वाद घेताना कुठला व्यत्यय येऊ नये, हाच त्यामागे विचार होता. आणि या प्रकृतीने लिहिलेल्या अनेक महत्त्वाच्या कलाकृती मराठीत अस्तित्वात होत्या. तथापि यादवांनी मांडलेला कलाकृतीच्या रचनेसंबंधीचा हा विचार स्वीकार करून लिहिती झालेली एक पिढी मराठी साहित्यात अस्तित्वात आली होती. त्या पिढीने आनंद यादव यांचा एक प्रतिभासंपन्न लेखक म्हणून स्वीकार केला होताच; त्याशिवाय एक संघटक, ग्रामीण साहित्य चळवळीचे अध्वर्यू म्हणूनही त्यांना त्यांचं श्रेय बहाल केलं होतं. आनंद यादवांनी आपलं कसदार लेखन आपल्या कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात तर केलंच. १९६६ ते १९८० या काळात त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी जरी पाहिली, आणि त्यासाठी त्यांना मिळालेले मानसन्मान पाहिले, तर ते मराठी साहित्यात पहिल्या प्रतीचे लेखक म्हणून स्थिरावल्याचं दिसून येतं. हिरवे जग ते नटरंग असा हा त्यांच्या साहित्यनिर्मितीचा अडीच दशकांचा कालखंड आहे. हे लेखन करताना त्यांना एक गोष्ट आवर्जून जाणवली आणि ती म्हणजे या काळात आपले अनुभव घेऊन लिहू पाहणारी ग्रामीण भागात एक नवी पिढ़ी उभी राहते आहे. या पिढीसमोर व्यक्त होण्यासाठी माध्यमांचा आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे. आणि त्यातूनच ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा जन्म झाला, ललित लेखकाने फक्त लिहीत राहावं, त्याने सामाजिक चळवळीच्या किंवा तत्सम गोष्टींमध्ये अडकून पडू नये; किंबहुना असं अडकून पडणं त्याच्या प्रतिभेच्या आणि सर्जनाच्या आड येतं असा विचार करणारा तो एक काळ आणि वर्ग होता – ज्यात आनंद यादव वावरत होते. सर्जनशील लेखकाला सामाजिक प्रश्नाविषयी, चळवळीविषयी जे काही बोलायचं आहे ते आपल्या लेखनातूनच मांडावं, असा विचार करणाऱ्या लोकांमध्ये यादव वावरत होते. पण यादवांनी मात्र हा विचार बाजूला ठेवून ग्रामीण साहित्यचळवळीच्या निकडीतून ग्रामीण साहित्य परिषदेची स्थापना केली आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावांत जाऊन तिथल्या जिद्दीने लिहू २४० निवडक अंतर्नाद पाहणाऱ्या नव्या लेखकांना सजगपणे लिहितं केलं. त्यांच्यासाठी गावोगावी साहित्य संमेलनं घेऊन त्या लेखकांना व्यासपीठ मिळवून दिलं. हे यादवांचं कार्य निश्चितच महत्वाचं मानलं जातं. या काळातच मी यादवांच्या अधिक जवळ आलो. लेखक म्हणून यादव माझ्याकडे काहीशा आपुलकीने याच काळात पाहू लागले. आणि त्याला तसं एक निमित्तही झालं. १९८५ साली महाराष्ट्र शासनाने राम गणेश गडकरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यावर्षीचा शासनाच्या वाङ्मय पुरस्कार वितरणाचा सोहळा नागपूरजवळ असलेल्या सावनेर या गावी आयोजित केला होता. सावनेर हे गाव गडकऱ्यांशी संबंधित आहे. इथे त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता. या वाङ्मयपुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कार घ्यायला म्हणून आनंद यादव नागपूरला आले होते. त्यांच्या नटरंग या कादंबरीला पुरस्कार मिळाला होता. त्यांचा मुक्काम नागपूरच्या आमदार निवासात होता. वाड्मयपुरस्कार स्वीकारायला आलेल्या लेखकांमध्ये डॉ. अरविंद वामन कुलकर्णीही होते. याच दरम्यान माझी प्रवाह ही कादंबरी प्रकाशित झाली होती. प्रवाहची प्रत आनंद यादव यांना भेट म्हणून देण्यासाठी मी त्यांना भेटायला आमदार निवासात गेलो. ही त्यांची माझी फार तर दुसरी किंवा तिसरी भेट असावी. पण ही भेट स्वतंत्र होती. प्रवाहची प्रत त्यांना भेट म्हणून दिल्यावर त्यांनी माझी आस्थेने चौकशी केली. इतर वाचन लेखनाबद्दल मनापासून विचारणा केली. प्रवाहच्या भेटप्रती मी अनेकांना दिल्या होत्या. पण फारशी त्या लेखनाची कुणी दखल घेतली नव्हती. अर्थात ते माझं लेखनही तसं कच्चं होतं आणि मला त्याची जाणीवही होती. तेव्हा आनंद यादवही पुस्तक घेतील आणि आपल्या कपाटात ठेवून देतील असं मला वाटलं होतं, एवद्य व्यग्र आणि मोठा लेखक आपलं हे सामान्य पुस्तक वाचेल अशी मला साधी आशाही नव्हती; पण यादवांनी मला आश्चर्याचा • सुखद धक्का दिला. त्यानंतर महिन्याभराच्या आताच माझ्या पत्त्यावर त्यांचं पत्र आलं. त्यांचं मला आलेलं ते पहिलं पत्र होतं. प्रवाह वाचून त्यांनी मला काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. चांगलं लेखन करताना ललितलेखकाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, याविषयी त्यांनी मला मनापासून चार गोष्टी त्या पत्रातून सांगितल्या होत्या. त्या मला पटल्याही होत्या. माझ्यातल्या लेखकाच्या विकासासाठी या सगळ्या गोष्टी कशा पूरक आणि पोषक आहेत याची मला जाणीव झाली होती. इथून आमच्या खाजगी पत्रव्यवहाराची सुरुवात झाली ती त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत कायम होती. या दरम्यानच आनंद यादवांनी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक लढविण्याचं मनावर घेतलं, त्या संदर्भातल्या बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या. हे संमेलन प्रवरानगर येथे सहकारमहर्षी बाळासाहेब विखे पाटील