पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बोलेना, मात्र तो रोज आप्पांच्या टाइपरायटरचा आवाज ऐकत असे. काही दिवसांनी तो टाइपरायटरचा आवाज हुबेहुब काढू लागला! 'टक् टक् टक् कर्र किट्ट' आणि मग घंटी वाजल्याचा 'रिंग' असा आवाज! आप्पांच्या लिहिण्याच्या वेळा अगदी ठरलेल्या होत्या. सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ४ ते ६. शिवाय पत्रव्यवहार, व्याख्यानांची तयारी वगैरे काम असायचं दर्शनी खोलीतच त्यांचं टेबल असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा, आम्हां मुलांच्या खेळण्याचा त्यांना त्रास होतंच असणार, पण जलाशयातील मासोळ्यांपासून अलिप्त राहून फुलणाऱ्या कमळासारखं त्यांचं साहित्य फुलतच राहिलं. १९५७ साली आप्पांनी 'दौलत' बंगला बांधला आणि आम्ही ४२ विजयानगर कॉलनी ह्या जागी राहायला गेलो. त्या काळात केवळ लेखनावर उदरनिर्वाह करणाऱ्या लेखकाचा बंगला असणं हीच नवलाची गोष्ट होती. ताईच्या नावावर तिच्या वडिलांनी ठेवलेली बेळगावची छोटी वास्तू विकून आणि दौलत कादंबरीचे हक्क विकून हा बंगला उभा राहिला. 'दौलत' मधे त्यांच्या ऑफिसच्या दोन खोल्या घरात असूनही वेगळ्या होत्या, त्यामुळे त्यांचं काम निर्वेध होऊ लागलं. ताईनंदेखील मोठ्या हौशीनं त्यांच्या लिहिण्याच्या खोलीची सजावट केली होती, ती खोली अजूनही माझ्या दृष्टीसमोर आहे. आप्पांच्या लिहिण्याच्या खोलीजवळ ताईनं दत्तू माळ्याकडून पिवळ्या गुलाबाची वेल लावली होती, ती वेल बहरली की गुलाबांच्या सुगंधानं आप्पांची खोली दरवळून जायची. भिंतीवर नाट्याचार्य खाडिलकरांचा फोटो आणि 'काश्मिरी गुलाबा' साठी बाबुराव पेंटरांनी केलेलं मुखपृष्ठ ह्या दोनच फ्रेम लावल्या होत्या. टेबलाजवळच्या कोपऱ्यातल्या त्रिकोणी लाकडी शेल्फवर आप्पांचे लाडके विद्यार्थी कोल्हापूरचे शहाजी महाराज (ज्यांच्यावर आप्पांनी 'एक होता युवराज' ह्या कादंबरीतल्या युवराजाचं व्यक्तिचित्र बेतलं) ह्यांचा चांदीच्या फ्रेममधला फोटो होता, ज्याच्यावर To my dear Sir असं लिहून त्यांनी स्वाक्षरी केली होती. आप्पांबद्दल त्यांच्या विद्यार्थ्यांना किती प्रेम आणि आदर होता ह्याचंच ते प्रतीक होतं. ताईशी विवाह झाल्यावर आप्पा जेव्हा पहिल्या घरातून बाहेर पडले होते, तेव्हा तिथली एकच वस्तू त्यांनी बरोबर आणली होती - शिसवी लाकडाचं त्यांचं लिहिण्याचं टेबल. तर आमच्या भांडारकर पथावरल्या घरात आप्पा खोलीत लिहायला बसले, की टेबलाखालच्या पाय ठेवण्यासाठी बनवलेल्या कमानाकृती जागेत, अगदी आप्पांच्या पायाशी मी माझी भातुकलीची भांडीकुंडी आणि बाहुली घेऊन बसत असे, आप्पांना पार्किन्सनच्या आजारामुळे हाताला कंप होता. त्यामुळे फार पहिल्यापासून त्यांच्याकडे लेखनिक असे. ते डिक्टेशन देत आणि लेखनिक आपल्या सुंदर अक्षरात लिहून घेई. लेखनिकाचं काम करणारी मुलं बरेचदा कॉलेजात शिकणारी गरजू मुलं असत. त्यांतले किती तरी पुढं जाऊन प्राध्यापक किंवा नामवंत लेखक झाले. तर त्यांचं असं काम चालू असताना मी दिलेला गरम चहा त्यांना भुरके मारीत प्यावा लागे. शेंगदाणे गुळाचे लाडू आणि पोह्यांचा भात खाऊन 'छान झालाय हं स्वयंपाक' अशी शाबासकी २३२ निवडक अंतर्नाद ना. सी. फडके - ४ ऑगस्ट १८९४ ते २२ ऑक्टोबर १९७८ (छायाचित्र सौजन्य: जया दडकर) मला द्यावी लागे! आम्ही सगळ्या पोराटोरांनी एकदा आमच्या मांजराचं लग्नही लावलं होतं. आमंत्रणाला मान देऊन आप्पा व ताई लग्नाला हजर झाले होते. त्याच्या आठवणी अजूनही विश्वास काळे काढतो ! ह्या घरातली आणि पुढे जाऊन दौलतमधली प्रमुख महत्त्वाची जागा म्हणजे पुढच्या अंगणातला झोपाळा. ह्या झोपाळ्यावर बसून आप्पा आम्हांला गोष्टी सांगत. आप्पा-ताई तिथेच बसून जिवाभावाच्या गोष्टी करीत किंवा आप्पा सिगरेट ओढत त्यांच्या लेखनाचा विचार करीत, पुष्कळदा गोष्ट ऐकता ऐकताच त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपी जात असे. ताईनं कालवून दिलेला दहीभात ते मला आणि विजूला भरवीत असत ते ह्याच झोपाळ्यावर, पुढे आम्ही मोठे झालो, तेव्हाही त्यांच्या पानातला दहीभात वाटीत घालून ते मला देत असत. त्या भाताची अमृताची चव अजून आठवते. आपले आईवडील इतर समवयस्क मुलांच्या पालकांपेक्षा वेगळे आहेत हे मला नेहमीच जाणवत राहिलं. नऊ ते पाच ऑफिसात काम करणाऱ्या बापांपेक्षा माझे आप्पा खूपच वेगळे होते. ते सभा समारंभातून परतले, की मला हारामधली कलाबूत मिळत असे, ती मी मैत्रिणींना बाहुलीच्या लग्नासाठी देत असे. मला हवे तेवढे पांढरेशुभ्र कागद, येणाऱ्या पत्रांवरची तिकिटं, पंचिग मशिनमधल्या कागदाच्या टिकल्या असा अमूल्य खजिना