पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझे वडील आणि मी गीतांजलि अविनाश जोशी “आप्पांनी मराठी साहित्याला तीन अमूल्य उपहार दिले असं म्हणता येईल. एक म्हणजे सोपी, ओघवती, प्रसन्न भाषा. दोन, गुजगोष्टी किंवा ललित निबंध. आणि तीन म्हणजे त्यांनी आग्रह धरून रूढ केलेला, 'मानधन दिलंच पाहिजे ह्या पद्धतीनं स्थापित झालेला, लेखकाचा आत्मसन्मान!" आपल्या कन्येच्या नजरेतून ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण ना. सी. फडके. १९४९ साली माझा जन्म झाला तेव्हा आप्पांचं म्हणजे माझ्या वडिलांचं वय ५५ वर्षांचं होतं. माझा जन्म झाल्यावर काहीच महिन्यांत राजाराम कॉलेजातल्या प्राध्यापकाच्या नोकरीतून ते निवृत्तही झाले. म्हणजे खरं तर ते माझ्या वडिलांपेक्षा माझ्या आजोबांच्याच वयाचे होते. परंतु आमच्या दोघांच्या वडील आणि मुलीच्या नात्यात वयातल्या ह्या अंतरानं कधीच फरक पडला नाही. माझा जन्म झाला त्या सालची आप्पांची दैनंदिनी एकदा माझ्या हाती लागली. त्या काळातल्या बहुतांश व्यक्तींसारखीच आप्पांनाही दैनंदिनी लिहिण्याची सवय होती. माझ्या जन्माआधीच्या तीन- चार महिन्यांमधे 'कमल डॉ. डनिंगकडे जाऊन आली.' अशा नोंदी दिसतात. माझा जन्माच्या दोन-तीन दिवसच आधी आप्पा व्याख्यानासाठी औरंगाबादला गेल्याची नोंद आहे. मी ह्या जगात अवतरल्याची बातमी त्यांना तिथेच कळली असणार, त्या दिवशी दैनंदिनीत 'कमल प्रसूत झाली.' एवढीच नोंद दिसते. त्यानंतर मात्र माझं वजन, मला घेऊन पाहिलेला 'माझा' पहिला चित्रपट, माझ्या बाबागाडीची किंमत अशा अनेक नोंदी आढळतात. १९५१ साली कोल्हापूर सोडून आप्पा-ताई पुण्याला स्थायिक झाले. भांडारकर पथावरच्या भालेरावांच्या बंगल्याचा तळमजला आप्पांनी भाड्यानं घेतला आणि १९५६ पर्यंत माझं बालपण त्याच घरात गेलं. आज कोणी भांडारकर पथ पाहिला तर मोठमोठ्या इमारती, दुकानं आणि ऑफिसांनी हा रस्ता गजबजलेला दिसेल. भरधाव धावणाऱ्या मोटारी आणि दुचाकी वाहनांनी पायी चालणाऱ्यांना रस्त्यानं चालायलादेखील जागा मिळत नाही. पण १९५१ मधे मात्र ह्य पुण्याचा शांत, काहीसा निर्जन भाग होता. आमच्या घरालगत एक कालवा होता जो बहुतेक वेळा सुकलेला असायचा. कालव्याच्या दुसऱ्या काठावर श्री. वा. काळ्यांचा बंगला होता. त्यांचा मुलगा विश्वास आणि त्यांच्या घरात भाड्यानं राहणाऱ्या वास्तुतज्ज्ञ डोंगऱ्यांची मुलं नंदू आणि राजू माझे बालमित्र होते. आमच्या घरासमोर हैद्राबादच्या राणीसाहेबांचा सुंदर, बैठा बंगला होता. फ्लॅट संस्कृती नव्हतीच तेव्हा पुण्यात आमचं ते घर थोडसं कोंदट आणि अंधार असल्याचं मला आठवतं. पुढच्या पोर्चमध्ये आप्पांनी झोपाळा लावून घेतला होता. घराच्या खोल्या आगगाडीच्या डब्यांसारख्या एका रांगेत होत्या. ३-४ खोल्यांमधे माझे आई-वडील, आम्ही तीन भावंडं, माझ्या आईची आई, तवंदीहून, म्हणजे माझ्या आईच्या माहेरगावाहून वरसंशोधनासाठी पाठवल्या गेलेल्या माझ्या दूरच्या नात्यातल्या दोन मावशा फर्ग्युसन कॉलेजात शिकणारा माझा लाडका मावसभाऊ चंद्र (प्रकाश नारायण संत) असे सर्व जण आनंदात राहायचो. ह्याशिवाय एक माकड, एक पोपट आणि दोन-चार मांजरं आमच्या कुटुंबाचे माननीय सभासद होते. आप्पांची आणि माझी गट्टी ह्या काळातच झाली असावी. माझ्या बहिणीला - रोहिणीला शाळेत घालायची घाई न करता एक वर्षभर आप्पांनी घरीच शिकवलं. त्यानंतर ती शाळेत जाऊ लागली. माझा धाकटा भाऊ विजय एक-दीड वर्षांचाच होता. तो बहुतेक वेळा माझ्या आईपाशीच असायचा. ह्या दोघांच्या मधली मी. मी मात्र एखाद्या चिवट, चेंगट मांजराच्या पिल्लासारखी आप्पांच्या आसपासच घुटमळत राहायची. घराच्या दर्शनी खोलीतच आप्पांचं लिहिण्याचं टेबल (आप्पांचा लाडका शब्द 'मेज') होतं. टेबलावर डाव्या बाजूला त्यांचा यइपरायटर असे. एका सुंदरशा फाइलमधे पांढरे शुभ्र चौरस कागद ठेवलेले असत. एका लांबट ट्रेमधे विविध प्रकारच्या लेखण्या आणि अणकुचीदार टोक केलेल्या पेन्सिली असत. त्यातली एक अर्धी निळी आणि अर्धी लाल पेन्सिल मला फारच आवडायची. एक हस्तिदंती पेपरनाइफ, कागदाला भोकं पाडणारं पंचिग मशिन आणि शाई टिपण्यासाठी टीपकागद लावलेलं बोटीच्या आकाराचं एक यंत्रही असायचं. ह्या सगळ्याचं मला फार आश्चर्य वाटायचं. खोलीत कुणी नसलं की मी आप्पांच्या खुर्चीवर बसून त्यांचा 'रोल' करायची आणि हे सगळं हाताळायची. ते आप्पांच्या लगेच लक्षात यायचं. त्यांनी माझं नावंच 'कारभारीण' ठेवलं होतं. पण मला ते कधीच रागावले नाहीत. एक गमतीदार आठवण म्हणजे आमच्या पोपटाला बोलतं करण्यासाठी ताईनं प्रचंड प्रयत्न केले. पहाटे त्याच्याशी बोलणं, त्याला हिरवी मिरची खायला देणं वगैरे वगैरे पण पोपट काही निवडक अंतर्नाद २३१