पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जयंतराव टिळकांसाठी मागितला समितीत ऐक्य टिकावे, हिंदुमहासभा ही बरोबर राहावी याच इच्छेने एस. एम. नी आपला मतदारसंघ टिळकांना देऊन टाकला. समितीच्या शिडीने सत्तेच्या सिंहासनावर चढता येईल असे सर्वांचे हिशेब असताना समितीला बहुमत मिळाले तरी समितीने सत्ता घेऊ नये अशी भूमिका एस. एम. नी मांडली. बहुतेक नेते या भूमिकेच्या विरोधात होते. सत्ता मिळण्याची शक्यता असताना सत्ता न घेण्याचा निर्णय करणे हे राजकारणातील नेत्यासाठी फार अवघड असते. डॉ. आंबेडकरांनी मात्र पूर्वीच एस. एम. च्या या भूमिकेला पाठिंबा दिला होता आणि बजावले होते की, सत्तेला स्पर्श केलात तर तुमचे ऐक्य टिकणार नाही. १९५० ते ६५ या सुमाराचा काळ हा लोकशाही समाजवादी चळवळीच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी एक सुवर्णयुग होते. सत्तेबित्तेच्या आम्ही जवळ नव्हतो, परंतु चळवळीचे नेतृत्व आणि कार्यकर्ते या सर्वांच्याबद्दल एक विलक्षण आदराची भावना महाराष्ट्रभर होती. ज्यांच्या निष्ठेबद्दल अजिबात शंका नव्हती. ज्यांच्या अविश्रांत धडपडीमुळे लोकमानसात त्यांनी स्थान मिळवले होते असे विविध जातीधर्माचे खूप कार्यकर्ते चळवळीला लाभले होते. एसेम आणि नानासाहेबांचे नेतृत्व तर होतेच, परंतु संसदीय क्षेत्रात भारतीय लोकशाहीला पडलेले एक सुंदर स्वप्न असे ज्यांचे वर्णन होई असे नाथ पै होते, मधू दंडवते होते. जॉर्ज फर्नांडिस, मृणाल गोरे, बाबा आढाव यांच्यासारखे नेते वेगवेगळ्या क्षेत्रांत लोकांच्या आदराचा विषय होईल असे काम करत होते. अशा या मेळाव्यात बरोबर राहणे आणि छोटेही काम करणे हा जीवनाला सार्थकता देणारा आणि धन्य करणारा अनुभव होता. एस. एम. हे या मेळाव्याचे मध्यवर्ती केंद्र होते. एस. एम. यांचा आणखी एक विशेष महत्वाचा होता. एस. एम. हे लोकांच्याबरोबर आणि कार्यकर्त्यांबरोबर राहणारे नेते होते. समाजवादी पक्षाला जयप्रकाश, अच्युतराव आणि अशोक मेहता यांच्यासारखे नेते लाभले होते. जयप्रकाशांनी पक्षाला विश्वासात घेऊन त्यात चर्चा न करताच आपले आयुष्य विनोबांच्या चळवळीला देऊन टाकले. अच्युतराव पटवर्धन राजकारणातून निवृत्तच झाले तर अशोक मेहतांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह काँग्रेस गाठली. या तिघांच्या नेतृत्वावर विसंबलेले असंख्य कार्यकर्ते पक्षात होते. त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले होते. नेता एखादा राजकीय पक्ष बनवतो, संघटना बांधतो त्यावेळी कार्यकर्ते त्याच्यावर विसंबून संघटनेत किंवा पक्षात येतात आणि त्यांच्याशी सल्लामसलत करण्याची जबाबदारी नेत्यांवर असते. रेल्वेच्या सगळ्या डब्यांना रस्त्यात सोडून इंजिनने भलतीकडेच जावयाचे नसते, परंतु हे मानणारे नेते कमीच असतात. एसेम हे एक असे नेते होते की ज्यांनी कार्यकर्ता ह्य आपला राजकीय निर्णयाचा भाग आहे असे मानले जनता पक्ष फुटला त्यावेळी एसेम विभाजनाच्या विरुद्ध होते. ताडदेवच्या जनता केंद्रात समाजवादी कार्यकर्त्यांची या फुटीच्या प्रश्नासंबंधी एक बैठक झाली. या बैठकीत जॉर्ज फर्नांडिस आणि मधू लिमये यांनी आपण पक्ष का फोडणार ही भूमिका विशद करून सांगितली. बैठकीत चर्चेला वावच नव्हता; कारण त्या दोघांचा निर्णय पूर्वीच झालेला दिसत होता. या सभेत माधव साठे नावाचे तरुण कार्यकर्ते फार पोटतिडकीने जे बोलले ते खरे होते. पुढाऱ्यांचे पक्ष बदलल्याने फारसे बिघडत नाही; पण सामान्य कार्यकर्त्यांची जीवने उद्ध्वस्त होतात, त्यांचा विचारच न करता नेते निर्णय घेतात असा साठ्यांचा आक्षेप होता. एस. एम. ना मात्र पक्ष सोडण्याचे निर्णय घाईघाईने व अपुऱ्या कारणामुळे घेऊ नयेत असे वाटत होते. संसोपाचे (संयुक्त • समाजवादी पक्षाचे) ते अध्यक्ष असताना प्रजासमाजवादी पक्षाची मंडळी बाहेर पडली, परंतु त्यासाठीची कारणे पुरेशी नव्हती, त्यांची चर्चाही झाली नव्हती. अशा परिस्थितीत समाजवादी ऐक्य टिकविण्याचा प्रयत्न म्हणून सगळेच जुने सहकारी बाहेर गेले असतानाही एस. एम. संसोपातच राहिले. पक्षातील आपले सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी आपले संबंध फक्त पक्षकार्यापुरते औपचारिक आहेत असे एस. एम. मानीत नव्हते. माणूस म्हणूनसुद्धा ते आपले स्नेही आहेत असे एसेम समजत. त्यामुळे थोडे मतभेद झाले की काढ आपल्याच सहकाऱ्याविरुद्ध फाक असे एस. एम. करीत नव्हते. आपला जुना सहकारी आपले म्हणणे ऐकून न घेता, आपली बाजू समजून न घेता आपल्याविरुद्ध जाहीर पत्रक काढतो याचे दुःख एस. एम. नाही भोगावे लागले ह्येते. भारत चीन युद्धानंतर चीनशी बोलणी करावीत अशी एसेमनी सूचना करताच ही सूचनाच अराष्ट्रीय आहे असे पत्रक त्यांच्या एका जुन्या सहकाऱ्याने काढले. त्याबद्दलची आपली व्यथा एसेमनी नोंदविली आहे एखाद्या मुद्द्यावर मतभेद झाले तरी स्नेह कायम राहू शकतो, नव्हे राहिला पाहिजे यावर एस. एम. यांची श्रद्धा होती. प्रजासमाजवादी पक्षातील सगळे जुने सहकारी संसोपा सोडून गेले आणि एसेम मात्र संसोपात राहिले. अधिवेशन संपवून ते मुंबईला आले तेव्हा त्यांना स्टेशनवरून आणण्यासाठी संसोपातील मित्रांनी गाडी पाठविली होती. पण एस. एम. स्टेशनवरून सरळ डॉ. मंडलिकांच्या घरी गेले. मंडलिक प्रसोपात परतले होते. पक्ष वेगळे झाले असले तरी स्नेहात अंतर येण्याचे कारण नव्हते. राजकारणाने अशी कटुता निर्माण करण्याचा एस. एम. यांचा स्वभाव नव्हता. श्रेयाचे धनी होण्याची सुतराम इच्छा न बाळगता, लोकांच्या कामासाठी झटताना एस. एम. त्यांच्याशी कसे एकरूप होत याची एक आठवण पुण्याचे माजी महसूल आयुक्त के. एस. सिद्धू यांनी सांगितली आहे. ८३-८४ साली महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळ होता. अनेक खेड्यांत पिण्याचे पाणी नव्हते. एस. एम. नी एका खेड्यात नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा व्हावा अशी सूचना एक पत्र लिहून आयुक्तांना केली होती. सरकारी अहवालाप्रमाणे ज्या खेड्यांना प्राधान्याने नळयोजना आवश्यक होती त्यात एसेमनी सुचवलेल्या खेड्याचा उल्लेख नव्हता. पण एसेमसारख्या व्यक्तीने सुचवले तेव्हा ती गरज खरीच असणार हे जाणून पुनः माहिती घेण्यात आली. खात्री पटल्यावर त्या गावाला नळयोजना मंजूर करून पूर्ण करण्यात आली. गावकऱ्यांनी त्या योजनेचे उद्घाटन समारंभपूर्वक करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आयुक्त सिदूंना बोलावले. समारंभ उत्साहात झाला. त्यावेळी निवडक अंतर्नाद २२७