पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एस. एम. यांच्या अंत:करणाचा उद्गार होता. एखाद्या वाईट गोष्टीविषयी गप्प बसावयाचे आणि दुसऱ्या एखाद्या वाईट गोष्टीचा मात्र निषेध करावयाचा असे त्यांच्याकडून होत नसे. एस. एम. चे राजकारण आणि समाजकारण ही त्यांची सहजप्रेरणा होती. या त्यांच्या नितळपणामुळे लोकांचे मन कळणेही त्यांना अधिक सोपे होई. इतर कार्यकर्ते ज्यावेळी स्वत:भोवती निर्माण केलेल्या कोषामुळे भ्रमात वावरत त्यावेळी एसेम मात्र वास्तवात पक्के उभे असत. अशाच एका निवडणुकीच्या वेळी मी आणि ना. य. डोळे त्यांना नांदेडहून लातूरला घेऊन जात होतो. आमच्या लातूरच्या उमेदवाराने जी गाडी आणली होती त्यात तो उमेदवार आणि मी, तर डोळ्यांच्या गाडीत डोळे आणि एस. एम. असे होतो. लोह्याच्या जवळ डोळ्यांच्या गाडीचे दिवे गेले आणि अंधारात गाडी चालवणे धोक्याचे असल्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, पहाटेचे तीन वाजले होते. लोहह्याच्या डाक बंगल्यातील एका कॉटवर अण्णा (एस.एम.) लवंडले परंतु त्यांना झोप लागत नव्हती. म्हणून मी व डोळे त्यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यावेळी आमचे लोकसभेत २४-२५ खासदार होते. या निवडणुकीत ही संख्या किती वाढेल असा आम्ही प्रश्न केला. अण्णांनी 'वाढेल कसली, जास्तीत जास्त आपले दोन-चार लोक निवडून आले तरी जिंकलो म्हणू,' असे उत्तर दिले. अण्णांचे उत्तर आमचा भ्रमनिरास करणारे होते. परंतु ते बरोबर ठरले. आमचे तीनच लोक निवडून येऊ शकले. लोकांच्या मनात काय चालले आहे हे अण्णांना बरोबर उमगत होते. एका निवडणूक दौऱ्यात किशोर पवारांनी एक गाडी एसेमच्या मदतीला दिली होती. त्या गाडीची एक समोरची सीट एसेमना झोपता येईल अशी पूर्ण मागे वळविण्याची व्यवस्था होती. या गाडीने एस. एम. औरंगाबादला आले. तेथून दौरा सुरू होणार होता. त्यांना एका सभेसाठी नेण्याची जबाबदारी माझ्याकडे होती म्हणून मी औरंगाबादला आलो होतो. मी त्यांना घेऊन गेलो, तेथील सभा आटोपली आणि एस. एम. ना निरोप देताना लक्षात आले की, ड्रायव्हर सोडून त्यांच्याबरोबर कोणीच नाही. बरोबर कोणी का नाही असे मी विचारले, तेव्हा त्याचा विचार दौरा ठरवणारांनी करावयास हवा होता' एवढेच एस. एम. म्हणाले. वस्तुत: एस. एम. चे वय आणि दर्जा आणि निवडणुकीतील वातावरण लक्षात घेता कोणीतरी सोबत असणे आवश्यक होते. ते पुण्याला परत जाईपर्यंत त्यांच्याबरोबर राहण्याचा मीच निर्णय घेतला. चार पाच दिवसांच्या दौऱ्यात एस. एम. ना आणखी जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यातली एक सभा माळशिरसला होती. सभा मोठी होती पण वीज गेलेली होती. चांदण्यात समोर बसलेल्या माणसांची मोठी गर्दी मात्र दिसत होती. व्यासपीठावरही उजेड नव्हता. चंद्रशेखरांवर नुकताच जवळच्या अकलूजमध्ये हल्ला झाला होता. अंधारातून व्यासपीठाच्या दिशेने कोणी एखादा दगड भिरकावला तरी कठीण प्रसंग उद्भवू शकत होता. एस. एम. च्या खुर्चीजवळ उभे राहण्यापलीकडे दुसरे काहीच करता येण्यासारखे नव्हते, एस. एम. मात्र अतिशय शांतपणे राज्यघटनेतील स्वातंत्र्याचे आणि समतेचे तत्त्व अगदी तळाच्या माणसांनासुद्धा कसे उपलब्ध करून देता येईल हे पाहणे २२६ निवडक अंतर्नाद राजकारणाचे ध्येय असले पाहिजे हे समजावून सांगत होते. प्रचंड मोठी सभा संपूर्ण शांततेत त्यांचे भाषण ऐकत होती. एस. एम. बरोबरचा हा प्रवास म्हणजे एक शिक्षणानुभव होता. काही निवडणूक प्रचारसभा खूप मोठ्या असत, तर काही ठिकाणी सभेचे नियोजन बरोबर नसे. अशा सर्व ठिकाणी एस. एम. सारख्याच गांभीर्याने बोलत एस. एम. च्या वक्तृत्वाचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यांचा सोपेपणा महत्त्वाचा विचार सांगतानासुद्धा अवघड शब्दांचा आधार घ्यावा लागत नाही हे एस. एम. कडून शिकण्यासारखे होते. भारताने अंगीकारलेली लोकशाही व्यवस्था, राज्यघटनेत हमी देण्यात आलेली मूलभूत स्वातंत्र्ये आणि त्यावर घालण्यात येणारी बंधने एस. एम. अतिशय सोप्या शब्दांत आणि नेमक्या उदाहरणांनी समजावून सांगत. त्यांच्या वक्तृत्वाचा दुसरा विशेष म्हणजे त्यामागची तळमळ, एस. एम. काही शब्दांचा फुलोरा फुलवू शकणारे किंवा आपल्या बोलण्याच्या वेगाने लोकांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते नव्हते. आकर्षून घेई ती त्यांच्या बोलण्यामागची तळमळ. एखादा विषय हा लोकांच्या हिताचा आहे आणि तो लोकांना समजावून सांगितला पाहिजे हे त्यांना मनोमन पटलेले असे आणि त्यामधून त्यांचे प्रतिपादन जन्माला आलेले असे. साहजिकच एका शिक्षकाने लोकांशी साधलेला संवाद असे त्यांच्या भाषणाचे स्वरूप असे. मी एस. एम. या त्यांच्या आत्मकथनात आपल्यावर लोक एवढे प्रेम का करतात या प्रश्नाचे उत्तर त्यांनीच शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात त्यांच्या अवघ्या जीवनाचे मर्म व्यक्त झाले आहे. "माझ्या अंगी लोकोत्तर असे काही नाही, परंतु काम हाती घेतले म्हणजे त्यात सारा जीव ओतून ते करण्याचा माझा जणू स्वभावच बनला आहे. त्यामुळे एखाद्याच्या दुःखाबद्दल मला सहानुभूती वाटली तर मी त्याच्याशी पूर्णपणे एकजीव होऊन ते अनुभवतो. माझा तो स्वभावधर्मच बनला आहे कित्येक वेळा मला प्रश्न पडतो की, लोक माझ्यावर इतके प्रेम का करतात ? त्याचे उत्तरही माझ्या या स्वभावधर्मामध्ये शोधावे लागते.” लोकांची दु:खे आणि प्रश्न हे हल्ली राजकीय नेत्यांसाठी चळवळीला उपयोगी पडणारे विषय असतात. त्यांची निवड करून ते विचारपूर्वक हाती घेतले जातात. एस. एम. बद्दल असे घडत नव्हते. लोकांचे दुःख आणि त्यांच्यावर झालेला अन्याय एस. एम. च्या अंत:करणाला भिडे आणि त्यांच्याकडून आपोआपच क्रिया होई. मी महाविद्यालयीन विद्यार्थी असताना संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. एखाद्या प्रश्नाला सर्वस्व वाहिलेला नेता कसा असतो याचा त्या काळातले एस. एम. हा एक वस्तुपाठ होता. अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते चळवळीचा आपल्या पक्षाला काय उपयोग होईल याचा हिशेब मांडत होते आणि एस. एम. मात्र कर्मफलाची आशा न धरणाऱ्या एखाद्या योग्याप्रमाणे चळवळीचे नेतृत्व करीत होते. या चळवळीच्या काळात एस.एम.नी घेतलेले अनेक निर्णय त्यांच्या या नि:संग वृत्तीचेच द्योतक होते, ५७ सालची निवडणूक होणार होती. समितीला चांगले यश मिळणार हे दिसतच होते. अशा वेळी ज्यातून ते स्वत: निवडून आले होते तो सदाशिव पेठ मतदारसंघ हिंदुमहासभेने