पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गावकऱ्यांसोबत स्वागताला एसेम उभे होते. सिदूंनी त्यांना पाहिले व 'तुम्हीच योजनेचे उद्घाटन करा अशी विनंती केली. पण एस. एम. नी नकार दिला. उद्घाटन सिद्धंच्या हस्तेच झाले. एस. एम. गावकऱ्यांपैकी एक बनून त्यांच्यातच उभे होते. सिद्धूनी लिहिले आहे, 'ज्यांनी हयातीत कधी सार्वजनिक अधिकारपद स्वीकारले नाही त्यांना नळयोजनेच्या समारंभात प्रमुख पाहुणा होण्यात काय विशेष ? ते लोकांमध्ये उभे राहिले तेच बरोबर, कारण लोकांच्या हृदयात त्यांना स्थान होते. ' दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी प्रत्येक वेळी धावणारा हा माणूस निरस आणि रुक्ष नव्हता. व्यक्तिगत जीवनातल्या आवडीनिवडी समाजाचे हित समोर ठेवून बाजूला साराव्या लागतात हे लक्षात घेऊन एस. एम. जगले. परंतु वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या मनातले क्रिकेट आणि संगीत जागे होई. बार्शीला पक्षाचे राज्य अधिवेशन भरले होते. इंग्लंडप्रमाणे भारतातील आरोग्यव्यवस्थेचे राष्ट्रीयीकरण करावे या ठरावावर चर्चा चालू होती. त्याचवेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुप्रसिद्ध लढत चालू होती. इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे वैद्यकीय सेवेचे राष्ट्रीयीकरण झाले तसेच भारतातही व्हावे, अशी मागणी करणारा ठराव चर्चेला आला होता. एस. एम. व्यासपीठावर चर्चेचे नियंत्रण करीत होते. त्यांनी खूण करून मला व्यासपीठावर बोलावले व क्रिकेटच्या सामन्याची ताजी स्थिती काय आहे याची माहिती देण्यास सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या विकेट भराभर पडत होत्या आणि भारताचा विजय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आकाशवाणीवरून प्रक्षेपित होणाऱ्या धावत्या वर्णनाच्या आधारे मिळणारी माहिती मंडपाजवळच्या एका दुकानात ऐकून दर अर्ध्या तासांनी मी चिठ्ठीवर लिहून अण्णांना पोहोचवत होतो. राजकारणाचे गांभीर्य आणि त्यापासून होणारे क्लेश आयुष्यभर सोसणाऱ्या एस. एम. ना खेळ आणि संगीत यांतही रुची होती आणि जीवनातला रसिकतेचा दरवाजा त्यांनी बंद केलेला नव्हता. एस. एम. हे आपल्या व्यक्तिगत जीवनाप्रमाणेच सार्वजनिक जीवनातही नैतिकतेचा आग्रह धरणारे नेते होते. त्यांना 'राजकारणातील स्फटिक' असे यथार्थपणे संबोधण्यात येई. मूल्यांचा ते सतत धरीत असलेला आग्रह ठायीठायी प्रगट होई. समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी युरोपातील काही छोट्या समाजवादी देशांचे प्रतिनिधी निरीक्षक म्हणून हजर असत. अशाच एका अधिवेशनात आलेले काही प्रतिनिधी आमच्या एका ज्येष्ठ मित्राबरोबर बोलत होते. भारतात सार्वत्रिक निवडणुका लवकरच होणार होत्या. त्या परदेशी प्रतिनिधीने चांगल्या भावनेने एक प्रस्ताव आमच्या मित्रासमोर ठेवला. भारतीय समाजवादी पक्षाला निवडणुकीत मदत म्हणून कार्यालयीन कामकाजासाठी काही टाइपरायटर्स देणगी म्हणून देण्याची त्यांची इच्छा होती. आमच्या मित्राने ह्य प्रस्ताव एस. एम. ना सांगितला, एस. एम. नी आपल्या खास शैलीत त्याला सुनावले. 'शेणच खायचे तर मुंगीचे कशाला? हत्तीचे खाऊ की! अगदी मोठे देशही मदत करतील, पण शेण खायचे का याचा निर्णय अगोदर करा.' निवडणुकीत परकीय मदत ही गोष्ट एसेमच्या नैतिक कल्पनेत बसूच शकत नव्हती. त्यांची प्रतिक्रिया अतिशय तीव्र होती व अशा प्रसंगी त्यांच्या २२८ निवडक अंतर्नाद तोंडून सहज निघणाऱ्या रोखठोक भाषेत ती व्यक्त होत होती. पाचलेगावकर महाराजांचे मराठवाड्यात बरेच चाहते होते. त्यांचे नेहमी दौरेही होत. एकदा नांदेडला एस. एम. असताना पाचलेगावकरांचाही मुक्काम नांदेडला होता. अचानक एस. एम. नी आपण पाचलेगावकरांना भेटायला जाऊ असे मला सांगितले. हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पाचलेगावकर महाराजांना भेटण्यात एस. एम. ना काय स्वारस्य असा प्रश्न साहजिकच माझ्या मनात निर्माण झाला. मी बोललो मात्र काही नाही. पुढे मग मी वाचले, की पाचलेगावकर महाराज पुण्याच्या येरवडा तुरुंगात एस. एम. बरोबरच स्थानबद्ध होते. अण्णांना घेऊन पाचलेगावकर ज्या ठिकाणी उतरले होते तेथे मी गेलो. तेथे बाहेरच जुने समाजवादी कार्यकर्ते पद्माकर लाठकर उभे होते. ते आम्हांला आत घेऊन गेले. पाचलेगावकरांनी एस. एम. चे स्वागत केले. पाचएक मिनिटे औपचारिक बोलणे झाल्यावर आम्ही परत निघालो. परतताना एस.एम. म्हणाले, 'पद्माकरचा फार आग्रह होता. त्याला बरे वाटेल म्हणून आलो.' एस. एम. तत्त्वांशी तडजोड करीत नसत. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सौजन्य दाखवण्यास त्यांची ना नसे. एस. एम. ना लोकांचे प्रचंड प्रेम मिळाले ही गोष्ट खरी, परंतु सार्वजनिक जीवनात असे नुसतेच प्रेम वाट्याला येत नसते. कोणी तरी अजाणता दुखावले जाते. कोणी तरी बेजबाबदारपणे वाटेल ते आरोप करते. कधी कधी अगदी जवळचे सहकारीही मनाला वेदना देऊन जातात. पूर्वीच्या जनसंघातून जनता पक्षात आलेल्या एका नेत्याने 'एस. एम. ना उपराष्ट्रपती व्हावयाचे आहे व त्यासाठी ते निरनिराळे प्रयत्न करीत आहेत असा बेजबाबदारपणाचा आरोप केला. या सत्त्वशील नेत्याचा अवमान करण्याचेही प्रसंग घडले. परंतु यांपैकी कशानेही जे मलिन होणार नाही असे धवल चारित्र्य अण्णांच्या जवळ होते, माझ्यासारख्या असंख्य छोट्या माणसांना त्यांचे जीवन हा एक प्रेरणा देणारा आधार होते. पुण्यात भरलेल्या संयुक्त समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनातील एस. एम. यांचे एक भावपूर्ण भाषण माझ्या लक्षात आहे. संध्याकाळी समारोपादाखल बोलताना एस. एम. म्हणाले होते की 'समाजवादाचा ध्वज या खांद्याने आजवर पेलला, कधी तरी हा खांदा निरुपयोगी होईल तेव्हा तो ध्वज तुम्ही आपल्या खांद्यावर घेतला पाहिजे आणि फडकत ठेवला पाहिजे.' एस. एम. भाषणात फार कमी वेळा भावुक होत. परंतु त्या अधिवेशनात घडलेल्या अनेक घटनांनी त्यांना अस्वस्थ केले होते. एस. एम. यांचे भाषण सर्व उपस्थितांना हेलावून गेले. आज आपल्या समाजजीवनात सर्वत्र मूल्यांची पीछेहाट होत आहे. समाज एकसंघ होण्याऐवजी त्याच्या चिरफळ्या होण्याची प्रक्रिया चालू आहे. सत्तासंपादनाचे साधन म्हणून द्वेष वापरला जात आहे. रोजची वृत्तपत्रे वाचणे हा अतिशय उद्देगजनक अनुभव झाला आहे. भ्रष्ट आचरण हा जीवनाच्या सर्व क्षेत्रांचा स्थायीभाव झाला आहे. हे जे दृश्य दिसते आहे ते एस. एम. ची उणीव अधोरेखित करणारेच आहे. पण गांधीजी असोत अगर एस. एम., ते नेहमीच कसे उपलब्ध होतील? (एप्रिल २०१७)