पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एसेम नरेन्द्र चपळगावकर ज्येष्ठ समाजवादी नेते एसेम जोशी यांचे नाव संयुक्त महाराष्ट्राशी कायम निगडित राहील. किंबहुना एसएम ही त्यांची आद्याक्षरे म्हणजेच संयुक्त महाराष्ट्र असे एकेकाळी म्हटले जाई. त्यांचा निकटचा सहवास लाभलेल्या लेखकाने चितारलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व. १ एप्रिल या एसेम यांच्या स्मृतिदिनानिमित्त. कनिष्ठ मध्यमवर्गात आम्ही मोडत होतो, तरीही वडिलांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत माझ्या जन्माच्या अगोदरपासून भाग घेतला होता. गांधी विचारांवर आणि अहिंसक सत्याग्रहाच्या मार्गावर विश्वास असलेल्या स्वामी रामानंद तीर्थांच्या सहकाऱ्यांपैकी ते एक होते. त्यामुळे राजकारण थोडेफार आमच्या घरातच होते. व्यक्तिजीवनातील सचोटी आणि निरलसता हा त्याकाळी अनेक राजकीय कार्यकर्त्यांत आढळणारा विशेष होता. १९४८ साली नाशिकला मामांकडे काही दिवस असताना मी राष्ट्र सेवादलाच्या घराजवळच असलेल्या शाखेवर जात होतो; पण ते वय राजकीय तत्त्वज्ञान समजण्याचे नव्हते. १९५० च्या सुमाराला गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे इत्यादी आणि त्यांचे अनुयायी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी समाजवादी पक्षात जावे, असा बाबासाहेबांचा आग्रह होता. गोविंदभाईंना ते मान्य नव्हते. गोविंदभाईंनी लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स नावाचा एक पक्ष स्थापन केला, त्यात अनंतरावही गेले कम्युनिस्टांबरोबर लीगने आघाडी करून निवडणुका लढवल्या. त्यात दारुण पराभव झाल्यानंतर लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स विसर्जित झाली तेव्हा बहुतेक कार्यकर्ते कम्युनिस्ट पक्षात गेले. थोड्या राहिलेल्या मंडळींनी स्वतंत्र राहून लोकशाही समाजवादी विचारांच्या आधाराने काही सार्वजनिक काम सुरू केले. अनंत भालेराव त्यापैकीच एक. अनंतरावांचा ओढा समाजवादी पक्षाकडे होता. ते ज्या वृत्तपत्राचे संपादक होते त्याचा अधिकृत पाठिंबा कोणालाच नसला तरी सर्वसामान्यतः सत्ताधाऱ्यांना विरोध आणि लोकशाही समाजवादी विचारांना पाठिंबा हीच त्याची ही भूमिका होती. साहजिकच एस. एम. नानासाहेब गोरे आदी मंडळी औरंगाबादला आली म्हणजे ती अनंतराव, काशीनाथ नावंदर, बन्सीलाल लड्डा अशांना भेटत, राष्ट्रसेवादल कलापथकाचे कार्यक्रम झाले की त्याची व्यवस्था अनंतराव आणि त्यांचे मित्रच करीत असत. माझे वडील अनंतरावांचे स्नेही होते. विद्यार्थिजीवनापासूनच अनंतराव आणि मराठवाडा' यांच्याबद्दल मलाही आपुलकी होती. या परिवारातच कधीतरी एस. एम. ना समक्ष पाहिले. मी विद्यार्थी असताना काही दिवस सरस्वती कॉलनीत राहत होतो. सरस्वती भुवन सभागृहात सार्वजनिक सभा होत. तेथून जवळच माझे घर होते. एकदोन वेळा एस. एम. ची भाषणे झाल्यानंतर त्यांची विश्रांतीची व्यवस्था माझ्या घरात करण्यात आली होती. एका विद्यार्थ्यांचे घर, त्यात फारशा सोयी काय असणार? पण एसेमना त्याची काळजी नसे. कार्यक्रम संपवून आले, म्हणजे एसेम १०- १५ मिनिटे तरी माझ्याशी बोलत. माझ्या अभ्यासाचे विषय, माझी उत्साही बातमीदारी, माझे कुटुंब याबद्दलचेच ते बोलणे असे. राजकारणाचा विषय त्यात नसे. घरातल्या एखाद्या वडीलधाऱ्या माणसाने चौकशी करावी, आस्था व्यक्त करावी असे ते बोलणे असे आग्रह केला तर कपभर दूध घेत आणि झोपून जात. सकाळी कोणी तरी त्यांना पुढच्या मुक्कामासाठी घेऊन जाई. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा तो काळ होता. एस. एम. हे त्या चळवळीचे नेते होते. मला तरुणवयात सर्वांत जास्त प्रभावित केले ते एस. एम. नी. त्यांच्या व्यक्तित्वातला नितळपणा आणि सामान्यांविषयी असलेली कळकळ मला आकर्षित करे. लोकशाही समाजवादाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून मी समाजवादी झालो नाही. राजकीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ते तत्त्वज्ञान अमलात आणू इच्छिणाऱ्या राजकीय पक्षात सामील होण्याची प्रक्रिया फार कमी लोकांची होत असावी. मी समाजवादी पक्षाकडे ओढला गेलो याचे कारण एस. एम. जोशी आणि अनंत भालेराव ही दोन माणसे. औरंगाबाद येथे असताना आणि नंतर लातूरच्या एक वर्षाच्या प्राध्यापकीत एस. एम. यांचे नेतृत्व मनावर संस्कार करत होते. अनंत भालेराव हे तर माझेच नव्हे तर माझ्या वडिलांचेही स्नेही होते. राजकीय विचार पुस्तकातून वाचण्याऐवजी या दोघांच्या प्रत्यक्ष कृतीतून मी समजून घेत होतो आणि नंतर त्याला वाचनाची जोड देऊन त्याचा शास्त्रीय आधार समजून घेत होतो. लोकशाही समाजवाद मी बऱ्याच नंतरच्या काळात समजून घेतला, तात्त्विक भूमिकेपेक्षा कोणत्याही अन्यायाविरुद्ध राजकीय निवडक अंतर्नाद २२३