पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मा कथेचा असला तरी आवाका कादंबरीचा आहे.” त्यानंतर एकदा भेट झाली तेव्हा म्हणाले, "तुम्ही कादंबरीचा ऐवज दीर्घकथेत ठासून भरता, त्यापेक्षा कादंबरीच का लिहीत नाही ?" गोखल्यांनी मला कादंबरी लिहिण्यास सुचविले. पण त्यांनी स्वतः कधी कादंबरी लिहिली नाही. इतर कथाकारांनी कादंबरी, नाटक, चरित्र, एकांकिका असे अनेक वाड्मयप्रकार हाताळले. पण गोखल्यांनी कथेची कास सोडली नाही. 'कथा एके कथा' असाच ठेका त्यांनी धरला होता. त्यात कधी खंड पडला नाही. त्यामुळे गोखले हे मराठी कथाक्षेत्रातले एक विक्रमवीर ठरले आहेत. मराठी कथेच्या वाटचालीमध्ये अनेक विक्रम त्यांनी प्रस्थापित केले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे गोखल्यांची पहिली कथा १९३६ साली 'मनोहर' मासिकात प्रसिद्ध झाली. त्यावेळी गोखले सतरा वर्षांचे होते. 'वहिनींची इच्छा' हे त्या कथेचे नाव आहे. १९३६ पासून पुढे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ गोखल्यांनी तत्याने कथालेखन केले. म्हणजे गोखले हे मराठीतले एक सुवर्णमहोत्सवी कथाकार आहेत. केवळ आवड म्हणून, केवळ निष्ठा म्हणून त्यांनी हे अखंड आणि प्रचंड असे कथालेखन केले, असे नाही, तर कथालेखन ही त्यांच्या व्यक्तित्वाची अदम्य अशी भूक होती. त्यांच्या प्रतिभेची ती एक अपरिहार्य गरज होती. या नैसर्गिक आणि अटळ अशा आवेगातूनच अर्धशतकापेक्षा जास्त काळ त्यांनी अविरतपणे झपाटल्यासारखे कथालेखन केलेले आहे. त्यांच्या 'अग्निहोत्र' या पुस्तकात एके ठिकाणी ते लिहितात, "शब्दांशी नातं जडल्यावर वयात येताच मी लघुकथेशी गांधर्वविवाह केला, कथालेखन हे मला श्वासोच्छ्वासासारखं आवश्यक आणि सहज आहे.” ते म्हणतात, "टू मी इट्स अ वे ऑफ लाईफ.” म्हणजे कथालेखन ही त्यांची जीवनदृष्टी होती, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा तो एक दृष्टिकोन होता. त्यांच्या जीवनपद्धतीचाच तो एक भाग होता. इतकेच नव्हे तर कथालेखन हा त्यांच्या जगण्याचाच एक अविभाज्य आणि अतूट अशा अंश होता. त्यांनी केवळ कथा लिहिली नाही तर ती कथा ते जगले. कथा लिहिता लिहिता ते जगले आणि जगता जगता त्यांनी कथा लिहिली. कारण कथालेखन हा त्यांच्या लेखणीचा धर्म होता. ती त्यांच्या लेखणीची प्रकृती होती. आणि म्हणूनच त्यांच्या हयातीत त्यांचे सुमारे ४७ कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. आणि या संग्रहांमध्ये त्यांच्या शेकडो कथा समाविष्ट झाल्या आहेत. पण गोखल्यांचा कथालेखनातील हा विक्रम केवळ सातत्याचा किंवा संख्येचा नाही, तो फक्त संख्यात्मक नाही तर प्रामुख्याने गुणात्मक आहे, दर्ज्याचा आहे, उत्कृष्टतेचा आहे. १९४५ साली 'कोकराची कथा' ही लघुकथा लिहिल्यानंतर गोखले एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर मंजुळा, नर, कमळण, रिक्ता, गंधवार्ता, आभा सावंत, वेडी बाभूळ, अविधवा, कातरवेळ, माहेर, मिलन, जागरण, कवडसा, शुभा, मिथिला, यात्रा, मुक्ता, विघ्नहर्ती अशांसारख्या मराठी कथेचा मानदंड ठरलेल्या एकापेक्षा एक सरस असंख्य कथा त्यांनी लिहिल्या. त्यांच्या अशा उत्कृष्ट कथांची यादी आणखी खूप वाढवता येईल. त्यांच्या 'गंधवार्ता' या कथेला ग्रॅहम ग्रीन आणि स्टीफन स्पेंडर यांच्यासारख्या परीक्षकांनी आंतरराष्ट्रीय कथास्पर्धेत अव्वल क्रमांकाचे पारितोषिक दिलेले आहे. मराठी कथेचा हा पहिला जागतिक सन्मान होता, तो गोखल्यांच्या कथेला लाभला आहे म्हणजे गोखल्यांची कथा संख्येने जशी मोठी आहे, तशी गुणवत्तेने, दर्ज्यानेही मोठी आहे. फार लिहिले, की लेखनाचा दर्जा घसरतो असा नेहमीचा अनुभव असतो. विपुलता आणि गुणवत्ता यांचे प्रमाण नेहमी व्यस्त असते, असा नियम मानला जातो. पण गोखल्यांची कथा या नियमाला अपवाद आहे प्रमाण आणि दर्जा, विपुलता आणि गुणवत्ता यांचा दुर्मिळ मिलाफ त्यांच्या कथालेखनात झालेला आहे हा मिलाफ साधणे ही फार कठीण गोष्ट आहे. कारण गोखल्यांची कथा ही मूलतः मनोव्यापाराची कथा आहे त्यांच्या कथेत प्रामुख्याने व्यक्तिमनातील भावविश्वाचे चित्रण त्यांनी केले आहे कथानक, घटना, प्रसंग यांना त्यांच्या कथेत फारसे महत्व नाही. जे प्रसंग आणि घटना येतात ते त्या कथेतील व्यक्तीच्या मनाचा शोध घेण्यासाठी, त्या व्यक्तीच्या मनाची अवस्था दर्शविण्यासाठी येतात. एखाद्या घटनेच्या किंवा प्रसंगाच्या आधारे गोखले अलगद त्या व्यक्तीच्या मनात शिरतात आणि तिच्या व्यक्तित्वाचे पदर उलगडून तिचे अगदी वेगळे जिवंत आणि अनपेक्षित असे दर्शन आपल्याला घडवितात. एखाद्या प्रसंगाच्या अनुरोधाने व्यक्तिमनाचा सर्वस्वी अकल्पित असा आविष्कार करण्याची किमया गोखल्यांना साधलेली आहे. याचे प्रत्यंतर त्यांच्या बहुसंख्य कथा वाचताना आपल्याला येते. त्यांच्या 'रिक्ता' या प्रसिद्ध कथेत हीनदीन, रंग, रूप, शिक्षण नसलेली • रंगनाथाची बायको आहे तिच्या रिक्तपणात, रितेपणातच तिचे सगळे सामर्थ्य आहे. त्यांच्या 'सावधान' या कथेतील रामदास स्वामींच्या उपेक्षित वाग्दत्त वधूचे एकाकीपण, 'सुरामारी' या कथेतील रझाक या गुंडाची मनोव्यथा; 'कवडसा' मधील मवाल्यापासून सुटका करणाऱ्या उपकारकर्त्यांचाच तिरस्कार करणारी सुषमा, कातरवेळेला भरल्या माहेरात एकाएकी लग्नापूर्वीच्या प्रियकराच्या आठवणीने व्याकूळ होणारी आक्का; 'विघ्नहर्ती' या कथेतील, लग्न निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून नवऱ्याच्या मृत्यूचे दुःख लपविणारी दत्तूकाकाची बायको; किंवा 'अविधवा' मधली डॉ. इरावती यांसारखी विलक्षण आणि अतर्क्य असे जगणारी आणि वागणारी माणसे गोखल्यांच्या कथांमधे आपल्याला ठिकठिकाणी दिसतात. या साऱ्या माणसांच्या, व्यक्तींच्या अंतरंगात शिरून ही सारी माणसे गोखल्यांनी उत्कट आणि सजीव केलेली आहेत. म्हणून गोखल्यांची कथा म्हणजे तऱ्हेतऱ्हेच्या प्रसंगांतून जाणाऱ्या भिन्नभिन्न व्यक्तींच्या अंतरंगाचा अखंड शोध आहे. मानवी मानसिकतेचा हा शोध घेताना निरनिराळ्या धर्मांच्या जातींच्या, पेशांच्या वेगवेगळ्या परिस्थितीतल्या आणि प्रसंगातल्या असंख्य नानाविध व्यक्तींनी माणसांनी गोखल्यांचे कथाविश्व गजबजले आहे. पण तरीही तिथे गर्दी झालेली नाही. कारण गोखल्यांनी ही सर्व माणसे एकमेकांपेक्षा वेगळी केलेली आहेत. प्रत्येकाला वेगळे अस्तित्व दिलेले निवडक अंतर्नाद २२१