पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पडत होती, तासदीडतास गप्पा रंगल्यावर गोखल्यांनी आम्हाला कँपातल्या दोराबजीच्या जुनाट, पसरट, बसक्या हॉटेलात नेले. तेथे त्यांचा आवडता पदार्थ त्यांनी मागवला. तो म्हणजे, अंड्याचे पिठले. नाव अकोरी किंवा अकोडी. ती हिरव्या मिरच्या पेरलेली झणझणीत अकोडी, रस्सा आणि पावाबरोबर खायची. त्यानंतर खमंग बिर्याणी, शेवटी पोळलेल्या जिभेवर आइस्क्रीम किंवा कॅरॅमल कस्टर्डची मलमपट्टी 'विघ्नहर्ती' चे सेलिब्रेशन चांगलेच रंगले. सात वाजता आम्ही जमलो होतो, खानपान, गप्पांच्या भरात रात्रीचे अकरा कधी वाजले ते कळले नाही. इतके ते सेलिब्रेशन बहरत गेले. सुजल, सुफळ, सकळ संपूर्ण झाले. गंमत म्हणजे 'विघ्नहर्ती नंतर गोखल्यांचा कुठलाच कथासंग्रह मी कधी प्रकाशित केला नाही, तरी आमचे 'सेलिब्रेशन चालूच राहिले. वेळप्रसंगी सवडीनुसार आम्ही भेटत होतो. कधी ते माझ्या कार्यालयात संध्याकाळी येत तर कधी 'वेळ आहे का आज ?' अशी पृच्छा करून मला घरी बोलवत. आमच्या गप्पा मारुतीच्या शेपटासारख्या लांबत गेल्या की त्यांची अखेर होई दोराबजी रेस्टॉरंटच्या अकोडीने आणि आईस्क्रीम किंवा कॅरॅमल कस्टर्डने. कधी आमच्याबरोबर पारगावकर असत, कधी बाळ गाडगीळ तर कधी मुंबईहून आलेले गंगाधर गाडगीळ, गोखले हे माझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ तर होतेच पण लेखक म्हणूनही नामांकित होते. पण तो मोठेपणा त्यांनी कधी जाणवू दिला नाही. खरेतर मी त्यांचा केवळ एक प्रकाशक होतो. लेखक आणि प्रकाशक यांच्यात कधी सकारण तर कधी अकारण तेढ आणि दुराव्याची भावना निर्माण होत असते, तसा प्रकार आमच्यात कधी घडला नाही. लेखक आणि प्रकाशक यांच्यात आर्थिक संबंधामुळे एक अंतर असते, ते गोखल्यांनी कधी राखले नाही. पहिल्याच भेटीत ते त्यांनी मिटवून टाकले होते. 'विघ्नहर्ती' हा कथासंग्रह प्रकाशित करायचे ठरले तेव्हा ते प्रथमच मला भेटायला आले. तोवर दूरध्वनीवरच आमचा संवाद घडला होता. ते आल्यावर नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या कराराचा मसुदा मी त्यांना दिला. पुस्तक जसे खपेल तसा खपलेल्या प्रतींचा हिशेब व त्यावरची रॉयल्टी देत जाऊ. थोडक्यात, 'ऑन सेल रॉयल्टी' वगैरे अटी करारात होत्या. गोखल्यांनी कराराचा मसुदा शांतपणे वाचला विचारले, "या पुस्तकाच्या ज्या प्रती तुम्ही काढणार आहात, त्या किती वर्षांत खपतील?" "चार पाच वर्षे लागतील.” "सहा वर्षे धरा. चालेल?" "चालेल. सहा वर्षात आवृत्ती निश्चित संपेल.” "मग तुम्ही सहा वर्षांत मला देणार असलेल्या रॉयल्टीच्या रकमेतून बँकरेटप्रमाणे सहा वर्षांचं होणारं व्याज कमी करा आणि उरलेली रक्कम मला आता देऊन टाका. म्हणजे तुम्ही मला हिशोब पाठविण्याचं कारण नाही. मी तो मागण्याचं कारण नाही. " गोखल्यांनी कराराचा कागद मला परत दिला. गोखल्यांची सूचना मला बिनतोड वाटली. मी त्यांना त्या रकमेचा चेक दिला. त्यांनी मला पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची २२० • निवडक अंतर्नाद संपूर्ण रॉयल्टी मिळाल्याची पावती दिली. एका फटक्यात व्यवहार संपला, तसाच आमच्यातील लेखक प्रकाशक हा भेदभावही मैत्र जोडायला ते मोकळे. मी मोकळा, गोखल्यांना मी पहिल्यांदा पाहिले होते ते १९५६ साली ते नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयाच्या वाड्मयमंडळात कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून आले होते तेव्हा त्यावेळी मी तेथे बी. ए. च्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. गोखले त्याकाळात पुण्याच्या शेतकी महाविद्यालयात प्राध्यापक होते. आघाडीचे नवकथाकार म्हणून मराठी साहित्यात ओळखले जात होते. त्यामुळे मराठी साहित्याच्या आम्हां विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल बरेच कुतूहल होते. आम्ही त्यांच्या भाषणाला गर्दी केली होती. भाषणामध्ये गोखल्यांनी त्यांच्या संयत मिस्किल शैलीत आमच्या कॉलेजातील वाङ्मयमंडळाची भलावण केली होती. मला अद्याप आठवते, ते म्हणाले होते : "तुमच्या या कॉलेजात हे वाङ्मयमंडळ आहे. त्यात साहित्यिक येतात, त्यांची भाषणे होतात, साहित्यावर चर्चा होतात. परिसंवाद होतात. आमच्या शेतकी कॉलेजात तसले काही नाही. साहित्य कशाशी खातात याचीसुद्धा तेथे कल्पना नाही. तेथल्या विद्यार्थ्यांना आम्ही पहिला धडा शिकवतो तो म्हणजे, हाऊ टू अप्रोच अ बुल." पुढे पुण्याला आल्यावर परिचय झाला तेव्हा मी गोखल्यांना ही आठवण सांगितली. त्यांनी नुसते स्मित केले. जास्त चौकशी केली नाही. कॉलेजची आणि माझीही, केव्हातरी लवकरच त्यांनी शेतकी कॉलेजला रामराम ठोकला. नोकरीनिमित्त मुंबईला स्थलांतर केले. मुंबईत वांद्र्याला ते साहित्यसहवासमध्ये राहत होते. मी एक-दोनदा मुंबईला त्यांच्या घरी गेलो होतो. पुणेकराने मुंबईकराकडे जायची वेळ म्हणजे दुपारची. दुपारी एक ते तीनपर्यंतची ती मुंबईकराची विश्रांतीची वेळ मीसुद्धा साधारण दुपारी दीड दोनच्या सुमारासच त्यांच्याकडे गेलो होतो. पण त्यांनी न कंटाळता माझे दिलखुलास स्वागत केले. मी न कळवता गेलो होतो. तरी आश्चर्य किंवा नाखुषी व्यक्त केली नाही. तासभर त्यांच्या संयमित हळुवार आवाजात गप्पा मारल्या. अवेळीही माझा चांगला पाहुणचार केला आठवते, की एकदा जिलेबी समोर प्लेटमध्ये होती तर एकदा खरवस गोखले मुंबईला गेल्यावर केव्हातरी होणारे तुरळक भेटणे सोडले तर आमच्या गाठीभेटी साहजिकच उणावल्या होत्या. पण संपर्क तुटला नाही. खरे म्हणजे त्यांनीच तो ठेवला. पुण्याला अधूनमधून त्यांची फेरी होई. तेव्हा ते आवर्जून माझ्या कार्यालयात येत. मार्मिक, मोजके संभाषण करीत. मध्यंतरीच्या काळात मी कथा लिहू लागलो होतो. त्या काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांची दाद गोखले न विसरता देत होते. अगदी रस्त्यात ओझरते भेटले तरी 'अमुक कथा वाचली', 'तमुक वाचली' असे सांगत असत. माझ्या सुरुवातीच्या चाचपडत्या साहित्यप्रवासात त्यांची ही स्नेहाळ सोबत उत्तेजक ठरत गेली. त्या आधारावर माझ्या 'कृष्णजन्म' या दीर्घकथासंग्रहाला ब्लर्ब लिहिण्याची मी त्यांना विनंती केली. ती तत्काळ मान्य करून त्यांनी यथावकाश ब्लर्ब लिहून पाठविला. त्यात त्यांनी लिहिले होते, "या कथांचा