पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इतक्या साध्या कारणावरून... कितीतरी वेळा याच कॉफी शॉपमध्ये तो तिला घेऊन आला होता. 'क्यापुचीनो' ही तिची फेवरीट कॉफी, अशी कॉफी आपण यापूर्वी कधीच प्यायलो नाही, अशा आविर्भावात हसत हसत ती आज त्याच कॉफीचा आस्वाद घेत होती. ते दृश्य सिंचनला आवडलं नाही. पण कृष्णचूडेचं लक्ष नव्हतं. ती कसला तरी विचार करत असावी. सिंचन म्हणाला, "कृष्णचूडा, तू जरा जास्तच रागावतेयस. इतकं रागावण्यासारखं काल काही घडलंय का?" कृष्णचूडाने जीन्सवर वांगी रंगाचा टॉप घातला होता. किती सुंदर दिसत होती ती! तीन महिन्यांपूर्वी सिंचन जेव्हा तिच्या प्रेमात पडला, त्या दिवशी जीन्स टॉप नव्हता. ती नेसली होती साडी. त्या दिवशी सिंचन ऑफिसमधून निघाला होता तेव्हा उशीर झाला होता. कंपनीमध्ये नेहमीच कामाचा ताण असतो. त्यात त्याची ही नवी नोकरी कामाची वेळ संपली तरी बॉसने दिलेली असाइनमेंट पेंडिंग ठेवून निघून जाणं प्रशस्त वाटत नव्हतं. ते काम पूर्ण करून तो बाहेर पडला, तेव्हा सेक्टर फाइव्हसारख्या एरवी गजबजलेल्या भागातही शुकशुकाट वाटत होता. या बाजूला येणाऱ्या बसेस आधीच कमी, त्यात रात्री तर त्या आणखीनच कमी असत. थोडं चालून सिंचन शेअर टॅक्सीस्टँडपाशी आला. स्टँडवर गर्दी होती. टॅक्सी दिसली की ती मिळवण्यासाठी सगळे धावत होते. ज्यांना संधी मिळे, ते धक्काबुक्की करत टॅक्सीत घुसत सिंचनला दोन टॅक्सी सोडाव्या लागल्या, तिसरी टॅक्सी दिसल्यावर त्याने चपळाई करत ती पकडली. त्याला खिडकीची जागा मिळाली. आत येणाऱ्या वाऱ्यामुळे तो सुखावला, डोळे मिटून स्वस्थ बसून राहिला. रस्ताभर त्याने कोणाकडे पाहिलं नाही. टॅक्सीत बसलेल्या इतर पॅसेंजर्सकडेही नाही, अगदी शेजारी बसलेल्या तरुणीकडेही नाही! यादवपूर आलं की लक्ष ठेवायला हवं. उतरायची वेळ आली तेव्हा टॅक्सी बरीचशी रिकामी झाली होती. "एक्सक्यूज मी, मला वाटतं, मी पर्स विसरून आलेय. कॅन यू हेल्प मी?” एका तरुणीचं लडिवाळ बोलणं कानी पडल्यावर सिंचनने चमकून तिच्याकडे पाहिलं, अंधारात तिचा चेहरा नीटसा दिसत नसला तरी आवाजावरून तिचा साधेपणा जाणवला होता. ती खरंच अडचणीत सापडली असावी. तिने साडी नेसली होती. हल्ली साडी नेसलेल्या तरुणी अभावानेच आढळतात. विशेषत: सेक्टर फाइवमध्ये तर अगदी क्वचित सिंचन थांबला. "टॅक्सीत बसण्याआधी लक्षात आलं नाही. " "इट्स ओ. के. किती हवेयत?” "टॅक्सीचं भाडं दिलंत की पुरे. " त्याने आपल्या वॉलेटमधून पन्नास रुपयांची नोट काढली आणि तिच्या हाती देऊ लागला. "प्लीज, मला देऊ नका. तुमची हरकत नसली तर ड्रायव्हरलाच द्या." सिंचन खूश झाला. ती खरोखरच पर्स विसरलीय, याबद्दल त्याच्या मनात संदेह उरला नव्हता. त्याने ड्रायव्हरला दोन माणसांचं भाडं दिलं. तरुणी गाडीच्या खिडकीतून त्याच्याकडे पाह्यत म्हणाली, "आपला पत्ता किंवा मोबाइल नंबर दिलात तर मी उद्याच..." सिंचन म्हणाला, "इट्स ओ. के. एवढेसे पैसे परत द्यायची गरज नाही. तुम्ही नीट घरी जा, टेक केअर, " ती हसली, पुटपुटली, "थँक यू व्हेरी मच गुड नाइट " टॅक्सी पुन्हा सुरू होण्यापूर्वी विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीचा हेड लाइट तिच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे सिंचनला तिचा चेहरा दिसला. पाणीदार डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहात होती. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञताभाव ओसंडला होता. सिंचनला धन्य धन्य झालं. तरुणी हुशार दिसत होती. पत्ता किंवा मोबाइल नंबर दिला असता, तर या सुंदर दृश्यापासून तो वंचित झाला असता. तो कंजूष आहे किंवा त्याचा दुसरा काहीतरी छुपा हेतू आहे, असं तिला वाटलं असतं. अर्थातच मग हे भाव तिच्या चेहऱ्यावर उमटले नसते. गुणगुणत सिंचन घरात शिरला. दुसऱ्या दिवशी काम संपल्यावरही सिंचन ऑफिसमध्ये रेंगाळला. वेळेचं गणित मांडून आदल्या दिवशी प्रमाणेच तो उशिरा बाहेर पडला. त्याला वाटलं, कदाचित आपलं गणित चुकेल. पण तसं झालं नाही. हाच जीवनाचा नियम असावा. थोडं पुढे गेल्यावर टॅक्सी स्टँड, तिथे काल भेटलेली मुलगी टॅक्सीची वाट पाह्यत उभी होती. स्टँडवरचा चकचकीत उजेड आज त्याला आणखी चकचकीत भासू लागला. दूरवरून सिंचनला पाहिल्यावर हसऱ्या चेहऱ्याची ती तरुणी पुढे आली. "आपलीच वाट पाहात होते. " सिंचनच्या छातीत धडधडू लागलं. किती स्मार्ट मुलींशी वागण्याबोलण्यात तो उस्ताद नसला तरी तिला पाहून घाबरणाराही नव्हता. त्या दिवशी मात्र सगळं वेगळंच घडलं. ही मुलगी त्याच्यासाठी नुसती 'एक मुलगी' राहणार नाही, त्यापेक्षा अधिक काही घडेल, असं त्याला वाटलं. तो नर्व्हस झाला म्हणाला, "मी इथे येईन हे तुला कसं समजलं?” "मला बरंच काही समजू शकतं.” हसत हसत कृष्णचूडा म्हणाली. "आणखी काय समजलं?" खुदुखुदु हसत ती म्हणाली, "आपण एक नाइस पर्सन सुंदर माणूस आहात. " - "बाप रे, फक्त वीस रुपयांत माणूस समजतो? मी 'नाइस पर्सन' आहे, हे तुला कसं समजलं?" "वीस रुपये खूप झाले. अहो, दोन रुपयावरूनही माणूस समजतो. माणूस ओळखण्यात माझी चूक होणार नाही. माझे सेन्सर्स खूप पॉवरफूल आहेत.” "सेन्सर्स? म्हणजे काय ?" भुवया उंचावल्या सिंचनने. तरुणी सुंदर तर आहेच पण विनोदी आणि मजेशीर आहे. "जाऊ दे. सोडून द्या ते सगळं, टॅक्सी घेताय की निवडक अंतर्नाद १६५