पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बापरे, आपल्याला महत्त्वाच्या गोष्टींचा विसर पडायला लागलाय, हे काही बरोबर नाही. सगळ्या मॉडेल्सच्या कॅटलॉगवर नजर टाकायला हवी. टेबलावर ठेवलेल्या फाइलींच्या ढिगाऱ्यात त्यांना आठवणीने ठेवलेला कॅटलॉग सापडेना. लॅपटॉपवर बोटं चालवली असती, की लगेच कॅटलॉग मिळाला असता. पण त्यांना तीही इच्छा होईना! त्यांच्यासमोर मिष्टी दह्याची वाटी होती. ती तशीच ठेवून ते गप्प बसून राहिले आणि तेवढ्यात डॉक्टर सरकार यांनी इंटरकॉमवरून ती भयंकर बातमी दिली. त्यांचा आवाज अक्षरशः कापत होता. "सर, लॅबची लोकं म्हणतायत, कृष्णचूडा नाहीशी झालीय. " "कृष्णचूडा? ही आणखी कोण? हू इज शी?” "आपलं के. सिक्स मॉडेल, सर, मी आर. थ्री. दुरुस्त करायला लॅबमध्ये आलोय. काम पुरं करून बाहेर पडताना अचानक लक्षात आलं, के सिक्सची जागा रिकामी, ” "रिकामी ? म्हणजे?" "काही समजेनासं झालंय, सर डॉक्टर शकुंतला मित्रना फोन केलाय. त्या क्वार्टर्समध्ये होत्या. येतीलच त्या इतक्यात, " मणिमय सामंतांनी शांतपणे विचारलं, "बाकीची मॉडेल्स?” "बाकीची सगळी आहेत. फक्त के. सिक्स..." इंटरकॉम ठेवल्यावर पोटातली आग त्यांना जाणवू लागली. दही खाता खाता ते विचार करू लागले, आता करावं तरी काय? ताबडतोब रेसिग्नेशन द्यावा की डोक्यावर ठेवायला बर्फ आणायला सांगावा ? जेलमधून कैदी पळाला तर घंटा वाजवतात. लॅबोरेटरीमधून रोबो पळाला तर काय करतात? त्याशिवाय के, सिक्स पळालाय, ही जगावेगळी कल्पना कोणाच्या पचनी पडेल का? रोबोत बिघाड होऊ शकतो, पण तो पळून जाऊ शकत नाही. प्रसिद्ध वैज्ञानिक मणिमय सामंत यांना वाटू लागलं, ते वेडे होत चाललेयत. थोड्याच वेळात आणखी एक बातमी आली. एका अल्पवयीन तरुणीला बाहेर पडताना कोणीतरी पाहिलं होतं. तिच्या डोक्यावर गुलाबी रंगाची छत्री होती. मोठा रस्ता क्रॉस केल्यावर छत्री मिटवून ती तरुणी टॅक्सीत बसली. सुमारे तासाभरानंतर डिरेक्टरच्या घरी चाललेल्या एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये शकुंतला मित्र यांनी सांगितलं, नुसतं के, सिक्स मॉडेलच नाही, तर तिची छत्रीसुद्धा हरवलीय. आदल्या वर्षी टोकियोला त्या एका कॉन्फरन्सला गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी ती छत्री तिथे खरेदी केली होती. तीच छत्री काल त्या लॅबमध्ये विसरून गेल्या होत्या, मणिमय सामंत यांनी विचारलं, "के. सिक्सच्या चीपमध्ये इतरांबरोबर संवाद साधण्यासाठी विशिष्ट भाषा दिली होती का?" शकुंतला मित्र म्हणाल्या, "होय सर, संवाद साधण्यासाठी तिला भाषा अवगत होती. त्याखेरीज आणखीही एक गोष्ट झालीय. मॉडेल तयार झाल्यावर आम्ही तिला तऱ्हेतऱ्हेचे पोशाख घालून बघितले होते. ते सगळे पोशाख एका बॅगेत भरून ठेवले होते. ती बॅग नाहीशी झालीय." १६४ निवडक अंतर्नाद मणिमय सामंत म्हणाले, "आपल्याला गुप्तपणे शोध घ्यायला हवा. ही बातमी बाहेर कोणालाही समजता कामा नये. तिचा फोटो माझ्यापाशी द्या. मी याविषयी पोलिसांशी बोलणी करीन.” लगेचच त्यांनी पोलिसांना बातमी सांगितली. पण फोटो देता आला नाही. कारण तिचा फोटो कोणी काढलाच नव्हता, होता फक्त सर्किट डायग्रॅम. पोलिसांनी प्रांजळपणे उत्तर दिलं होतं सर्किट डायग्रॅम बघून माणसांच्या गर्दीतून रोबो शोधून काढणं अशक्य आहे - तीन महिन्यांनंतर - कृष्णचूडा तोंड फिरवून बसली होती. सिंचनच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तिनं दिली नाहीत, जी काही थोडीफार दिली, ती तोंड फिरवलेल्या अवस्थेतच हे वेगळं होतं. नवीन ह्येतं. गेल्या तीन महिन्यांत या तरुणीबरोबर सिंचनचे किती मानापमान झाले होते, पण कधी अशी वेळ आली नव्हती. शिवाय पूर्वी घडलं होतं ते तिच्या लटक्या रागामुळे ठरलेल्या वेळी न आल्यामुळे, रात्री आठवणीने फोन न केल्यामुळे, ऑफिसच्या कामात गढून गेल्यामुळे फिरायला जाऊ न शकल्यामुळे अशी विविध कारणं होती. तो लटका राग सहजी दूर करता आला होता. कधी सिनेमा, कधी आइसक्रीम तर कधी छोट्याछोट्या भेटवस्तू, मग तिचा राग केव्हाच पळून जाई. आज मात्र या रागाने वेगळं वळण घेतलं होतं. इथे बसून ही तरुणी वेगळाच काहीतरी विचार करतेय, असं सिंचनला वाटू लागलं. समजायला अवघड असलेला विचार, खरं पाहता आदल्या दिवशी जी घटना घडली होती, त्यामुळे राग यायला हवा होता सिंचनला, अपमान जर कोणाचा झाला असेल, तर तो सिंचनचा, कृष्णचूडेचा नव्हे! सिंचनला राग आला आणि वाईटही वाटलं. रात्री उशिरापर्यंत तो जागा होता. यापुढे तिच्याबरोबर होणाऱ्या भेटीगाठी बंद करायच्या, असं त्याने मनोमन ठरवलं. प्रेमात पडल्यावर फक्त मुलींनीच रागवायचं, असं कुठे लिहिलेलं नव्हतं, पण सकाळी उठल्यावर लक्षात आलं, रात्रीची उद्विग्नता सकाळी नाहीशी झाली होती. यालाच 'प्रेम' म्हणत असावेत. सिंचनने आपल्या मोबाइलवरून तिला फोन लावला, "गुड मॉर्निंग, कृष्णचूडा." "गुड मॉर्निंग." गदगदल्या स्वरात कृष्णचूडाने प्रतिसाद दिला. " थट्टेच्या स्वरात सिंचन म्हणाला, "आवाजावरून जाणवतंय, अजून राग गेला नाहीय. हे बराय ! आपण कसंही वागायचं आणि वर स्वतःच रागवायचं?" “तुला आज थोडी उसंत मिळेल का सिंचन ? मला भेटायचंय तुला तुझ्याबरोबर बोलायचंय.” फोन ठेवल्यावर सिंचन थबकला. कृष्णचूडा इतकी गंभीर का बरं झाली असावी? खरं पाहाता तो या तरुणीला सर्वार्थाने ओळखू शकला नव्हता. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी पुरेसा नव्हता. तरीही... हसतमुख, समंजस आणि सरळ स्वभावाची ही मुलगी