पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्याबरोबर कॉफी प्यायला येताय? आपल्याला वेळ असला तर... पैसे परत करून तुम्हाला दुखवायचं नाहीय मला. कॅन यू गिव्ह मी अ चान्स ? कृतज्ञता दाखवायची एक संधी?" एरवी इतक्या रात्री कॉफी प्यायला जायचा विचारसुद्धा सिंचनने केला नसता. पण त्या दिवशी त्याला वाटलं, कपभर कशाला, या तरुणीला हवं असलं तर दा कप कॉफीही पिईन! "चल, जाऊ या, तुझं नाव समजेल का मला?” "कृष्णचूडा." "वा! किती छान नाव आहे!” "आणखी एक नाव आहे पण ते तितकंसं सुंदर नाही.” "टोपणनाव?" कृष्णचूडा हसत म्हणाली, "नाही. कोडनेम ऐकायचंय का?" सिंचन म्हणाला, "तू चांगलीच थट्टेखोर आहेस कृष्णचूडा. कोड्यात बोलतेयस." "मला कोडी सोडवता येतात. " सिंचनला वाटलं, २६ वर्ष जिची वाट पाहात होतो, तीच ही मुलगी तो प्रेमात पडला होता. पण आज तीच कृष्णचूडा इतक्या क्षुल्लक विषयाचं रामायण-महाभारत करेल, असं वाटलं नव्हतं. यावेळी सिंचन काहीसा विरक्त झाला होता, पण त्याने स्वत:ला सावरलं, नरमाईच्या स्वरात म्हणाला, "ठीक आहे. किती रागावशील? प्लीज, आता तोंड वळवून एकदा तरी माझ्याकडे बघ तुझा सुंदर चेहरा किती वेळात दिसला नाही.” आपलं तोंड न वळवता कृष्णचूडा म्हणाली, "बघायची काही गरज नाही. " "बरं, नाही बघणार. मी डोळे मिटतो. आता तरी तोंड वळवून बघ." तोंड न वळवता गदगदल्या स्वरात ती म्हणाली, "कालचा प्रसंग मी विसरू शकत नाहीय. " आता मात्र सिंचन स्वतःला सावरू शकला नाही. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "काय लहान मुलासारखं बोलतेयस कृष्णचूडा? मी काही केलं नव्हतं, बघता बघता काही न सांगतासवरता तूच पळून गेलीस, मी तुझ्यावर जबरदस्ती केली होती का? भाग पाडलं होतं का? तुझी इच्छा नाही, हे समजल्याबरोबर मी थांबलो. पुढे गेलो नाही. " आता कृष्णचूडाने तोंड वळवलं. त्या क्षणी सिंचनला ती नितांतसुंदर भासली. रागावल्यावर सगळ्या तरुणी अधिक चांगल्या दिसतात की काय? कृष्णचूडा खाली पाहात उद्दिग्न होत म्हणाली, "पुढे जायचं ठरवलं असतं, तर तूच अडचणीत सापडला असतास सिंचन, " "काहीतरीच काय बडबडतेयस कृष्णचूडा? काळाला १६६ निवडक अंतर्नाद अनुसरून नाही तुझं बोलणं, तू अजूनही आजी-पणजीच्या काळात आहेस!" कृष्णचूडा केविलवाणं हसली. डोळे, चेहरा याप्रमाणे तिचं दाताचं सेटिंगही वेगळं ह्येतं. कोणी मापून तयार करून बसवलेयत, असं वाटत होतं. "तुला समजत नाहीय, सिंचन, तू समजूच शकणार नाहीस." “जाऊ दे. मला आणखी काही समजायची गरज नाही. तू कालचा दिवस काढून यक बघू डोक्यातून कम ऑन कृष्णचूडा. मी आज ऑफिसला जात नाही. कुठेतरी मस्त फिरून येऊ या. चल, गंगेतून बोटीत बसून फिरून येऊ या का?" बोटीतून सैर करायचा प्रस्ताव तिला आवडला नसावा, ती विषण्ण होत म्हणाली, “तुला समजलं नाही तरी मला सगळं आकलन होतंय. कालपासून माझ्या लक्षात आलंय. मी तुला फसवू शकणार नाही, सिंचन, गेले तीन महिने मी तुझ्यात गुंतत गेले. ते ठीक नव्हतं. " कपाळावर आलेली बट तिने मागे सारली. अधूनमधून केसांची बट मागे सारायची तिची लकब होती, सिंचनच्या ती केव्हाच लक्षात आली होती. त्यावेळी ती आणखीच सुरेख दिसे. त्याच्या पेशी अन् पेशी शहारून जात. वाटे, प्रेमाने तिच्यावर झडप घालावी. खरं सांगायचं तर कालची घटना तशाच प्रकारची होती, तसं काही घडेल याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. काही महिन्यांपूर्वी त्याच्या बॉसना, सौम्यदांना क्वार्टर्स मिळाल्या होत्या. रुपी पार्क जवळची अप्रतिम जागा तिसऱ्या मजल्यावरचा प्रशस्त फ्लॅट दक्षिणेकडली खिडकी उघडली की सुंदर तळं दिसे. सौम्यदा आपल्या आईला आणायला पाटण्याला गेले होते. जाण्यापूर्वी सिंचनच्या हाती चावी देत म्हणाले होते, "एकदा जाऊन बघून ये. किती महिने जागा रिकामीच पडलेली होती. मला काळजी वाटतेय. " तोच फ्लॅट बघायला सिंचन काल गेला होता. फार वेळ नाही, फक्त थोडा वेळ डोकावून जायचं होतं. कृष्णचूडाला घेऊन जायचं काही कारण नव्हतं. पण तिनेच आग्रह धरला. “जाऊ या ना. तेवढंच तुमच्याबरोबर आणखी फिरता येईल.” "छे! याला काय फिरणं म्हणतात ? ही फक्त ड्युटी आहे. जाऊन सगळं ठाकठीक आहे ना, हे बघून यायचंय.” युक्तिवाद करत ती म्हणाली, "मीपण पाहीन, खिडक्या दारं घट्टमुट्ट बंद केलीयत की नाही, हे तुमच्यापेक्षा मला जास्त चांगलं बघता येईल. माझी हायड्रॉलिक सिस्टिम, मोटर आणि इलेक्ट्रिक सर्किट्स खूपच सक्षम आहेत.” सिंचनला हसू आलं. "कोड्यात बोलण्याची तुझी सवय काही सुटत नाही. तू काय बोलतेयस, ते माझ्या डोक्यावरून गेलं. नाही कृष्णचूडा. तू येऊ नकोस. तुला तिथल्या धुळीचा त्रास होईल.”