पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गजबजलेला, हे, ते मिळविण्याचा ध्यास असलेला स्वतःच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि जबाबदाऱ्या यांचे जोखड मानेवर असलेला घड्याळाच्या काट्यावर तोललेला, मौजमजा आणि विश्रांतीही वेळापत्रकात बसवणारा वाढदिवसाच्या दिवशी 'अगबाई, आणखी एक वर्ष कसं गेलं कळलंच नाही' असे जाणवून देणारा श्वास घ्यायला उसंत न देणारा! रोजच्या धावपळीच्या जगण्यात मनसोक्त वेळ देऊन केलेले स्नान कधीच मागे पडले होते. सकाळ संध्याकाळ घाईघाईत शॉवरखाली उरकण्यात येणाऱ्या क्रियेला 'स्नान' म्हणावे की नाही ही शंकाच होती. नरकचतुर्दशीचे अभ्यंगस्नान तरी काय? ते सूर्योदयापूर्वी होणे या ना त्या कारणाने मागे पडले होते. घाईघाईत औक्षण, तेल, उटण्याची रीत पाळून अभ्यंग उरकले जात होते. या सर्वांचा वचपा काढण्यासाठी की काय, स्वतःच घरी अंगाला तेल बेसन लावणे, मास्क लावणे, सवड असेल तेव्हा मालिशवालीला घरी बोलावणे, पार्लरमध्ये जाऊन 'हेडवॉश' घेणे, नवीन निघालेल्या 'फूट स्पा'ला भेट देणे वगैरे गोष्टी मधून मधून सुरू होत्या. तात्पुरते छान वाटत होते. पण कुठेही परिपूर्णता वाटत नव्हती, परिचारिकांच्या कृत्रिम गोड बोलण्याचा, बेगडीपणाचा कंटाळा येत होता. नुकत्याच घेतलेल्या 'सेकंड होम' मधला जाकुझी किंवा अमेरिकेतल्या भावाकडे आठ फूट उंचीच्या मोठ्या शॉवरहेडखाली बाथरूममधे अनुभवलेला पाऊस काहीही सुखवत नव्हते. मन लागत नव्हते खरे! कैक वर्षे मागे पडली. रोजच्या धडपडाटात तनामनावर मालिन्याची पुटे चढताहेत, जाणिवा बोथट होताहेत, कधी निवांत क्षणी बेचैनी दाटून येते. मन भूतकाळात फेरफटका मारते. धूसर, निवांत, ऊबदार आजोळघरात फिरून येते. माहेरच्या मायघरात विसावते. आजीबाई आठवणीत असणे शक्य नाही. पण शैशवातला त्यांचा जिव्हाळ्याचा स्पर्श अंतर्मनात रिघून बसला आहे. आत्याबाईंच्या सावरीच्या स्पर्शाला जीव आसुसला आहे. ते स्पर्श केवळ ह्यताबोटांचे नव्हते, तर मन, दृष्टी आणि वाचेतूनही होत होते. त्यांनी स्नानासारख्या एका नित्य क्रियेचा परिपूर्ण संस्कार बनवला होता! साठी आली! नको नको म्हणताना सर्वांनी साजरी केली. काही दिवस कृतकृत्य वगैरे वाटले. नंतर जाणवले एक सर्वसामान्य आयुष्य आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या वगैरे बोजड शब्द वापरण्याएवढे त्यात काही नव्हते. चिमणाचिमणीही घरटी बांधतात, अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांना चारा भरवतात, उडायला शिकवतात आणि घरटे रिकामे झाले, की स्वत: ही उडून जातात. आपलेही तसेच थोड्याफार फरकाने ! परदेशातून आलेल्या मुलाने परतताना हातात एक पावती ठेवली. एका प्रसिद्ध आयुर्वेदिक मसाज सेंटरची. "नक्की जा बरं का, आई. हल्ली तू स्वतः कडे खूप दुर्लक्ष करतेस. बरं नाही ते." वगैरे प्रेमळ दटावणीसकट! 'खरंच गेलं पाहिजे, बरंच ऐकलं आहे आयुर्वेदिक मसाजबद्दल' असा विचार करीत ती सेंटरच्या पायऱ्या चढली, चपला बाहेर काढून आतल्या दालनात तिने पाऊल ठेवले. पहिल्या दर्शनानेच अंतर्मनाची तार छेडली. छोट्या पणत्यांची आरास, शांत स्वरात बोलणारी स्वागतिका आणि पावलांचा आवाज न करता आलेली परिचारिका. 'चलो माँ' असे अदबीने म्हणत परिचारिकेने तिला वरच्या खोलीत नेले. अंधारापेक्षा थोडा उजळ असा मंद प्रकाश आणि हळुवार, भावमधुर वाद्यसंगीताचे स्वर यांनी वातावरण भारले होते. समोर उणापुरा दहाफुटी लांब, गडद आमसुली रंगाचा उंच अरुंद पलंग, दणकट आणि अवजड डोक्याच्या बाजूला हलकी नक्षी असलेला. त्यावर चढायला दोन पायऱ्यांचे स्टूल. डोक्याच्या बाजूला एका उभ्या स्टँडला लावलेले पसरट, नक्षीदार पितळी भांडे. पांढऱ्या स्वच्छ धुवट कपड्यातल्या दोन काळ्या सावळ्या सेविका प्रयत्न करूनही ऐकू येणार नाही असे त्यांचे हलके, कुजबुजते बोलणे, संयमित हालचाली आणि शांती प्रस्फुटित करणारी देहबोली ! अभ्यंगस्नान ! सर्वांग निर्मल करणारे स्नान ! समर्पणाच्या भावनेने सुरुवात. डोळे मिटून शांत स्वरात सेविकांनी प्रार्थना केली. मोडक्यातोडक्या हिंदीत, कमीत कमी शब्दांत आपण काय करणार याची तिला कल्पना दिली. त्यांच्या मदतीने वस्त्रे उतरवताना तिच्या मनाचे बंध हळूहळू सैल होऊन गळून पडत होते. 'हेड मसाज माँ!' टाळूवर कोमट तेलाची धार जाणवली. सेविकेची बोटे मुलायमपणे हळूहळू केसांच्या मुळाशी फिरू लागली. कधी हलकासा दाब देऊ लागली. बोटांच्या चक्राकार गतीने क्वचित कोवळ्या झिणझिण्या येऊ लागल्या. भरपूर तेल रिचलेल्या गुळगुळीत टेबलावर आडवे झाल्यावर तो स्पर्श तिच्या सर्वांगाला सुखवून गेला. दोन सेविका दोन्ही बाजूला उभ्या मुखी संस्कृत प्रार्थना शरीरावर कोमट तेलाची धार, प्रथम नाभीस्थानी, नंतर क्रमाने चेहरा, मान, खांदे, दंड, कोपरे, तळहात, छाती, पोट, मांड्या, पाय, पोटऱ्या पावले आणि तळपाय, सर्वांगावर सेविकांचे हात फिरत होते. मऊपणे किंचित दाब देत. आपलेच शरीर आपल्याला किती अनोळखी झाले होते याचा प्रत्यय तिला येत होता. सकस खाण्यापिण्यावर, आप्तस्वकीयांच्या मायेवर पोसलेला हा देह! निगराणी करून वाढविला. ह्यात सर्व देहभोग भोगले. किती गोष्टींसाठी अविश्रांत झिजवला, राबवला. अन्नपाण्याशिवाय त्याच्या काही गरजा असतात हे विशेष कधी जाणवले नाही. त्याच्या किती जागांना आज आपले अनाथपण जाणवून गेले. निर्हेतुक ममतेच्या स्पर्शाला वंचित राहिलेले कायेचे अणुरेणू जणू खूप काळाने जागे होत होते. निर्विकल्प स्पंदने निर्माण करीत. आज या स्पर्शाने जणू सर्वांग आणि त्याबरोबर अंतर्मनही जागे होऊ लागले! 'माँ शिरोधारा!' सेविकेचा कुजबुजता स्वर ऐकू आला. केवळ मस्तकावर पडणाऱ्या मंद धारेची संवेदना, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे पितळी पात्रातले तेल केसात पाण्यासारखे रिचवले जात होते. समाधीची परमावधी ही अवस्था संपूच नये निवडक अंतर्नाद १४३