पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या असोशीने मनाचा ताबा घेतला! शरीराचा डोलारा सांभाळणारे हे मस्तक विचार करून मेंदू शिणला किंवा डोके दुखले की गरम चहा आणि अॅस्पिरीनची गोळी एवढीच बांधिलकी त्याच्या बाबतीत. आल्याला जमिनीशी जोडणाऱ्या त्याच्या मुळाशी आपल्याला काय काम? जगण्याच्या धडपडीत, विचारांचे काहूर आणि भावनांचा गुंता त्यातून काढून टाकण्याची कधी गरज भासली नाही, सवड झाली नाही आणि हे जाणवले तरी ते कसे करावे याबाबतचे अज्ञान नडले. आज या स्पर्शाने जणू सर्वांग जागे झाले. गात्रागात्रांत साचलेला शीण निचरू लागला. थकलेला देह विश्रामाच्या खोल गुहेत जाऊ लागला. तेलाचे स्निग्ध, मुलायम आच्छादन पांघरून तिने नकळत डोळे मिटून घेतले. अभ्यंगाचा शेवटचा टप्पा शरीरावर उटण्याचा लेप, नाक, कानात धुरी, डोळ्यांत औषधी थेंब. उटण्याचे लेपन काढताना सर्वांगावर झुळझुळत होते. कोमटपेक्षा गरम आणि गरमपेक्षा थंड असे सुगंधित पाणी! स्नानगृहात वर्षोनुवर्षे नियमित घासले गेलेले चकचकीत भले मोठे पितळी घंगाळे, त्यात वनौषधीयुक्त गरम गरम पाणी, चौरंगावर तांब्या, मनपसंत शांपू आणि हूकवर पांढरा स्वच्छ पंचा. मनसोक्त नाहताना स्वर्गसुख ते हेच असे तिला जाणवत राहिले. अंग टिपून, सुस्नात, अशी ती कपडे करून बाहेर पडली. खांद्यावरून पदर पुढे ओढून आज खूप खूप वर्षांनी ती स्वतःला भेटली होती नव्याने! साठी मागे पडूनही काही वर्षे झाली. मुले मोठी होऊन आपापल्या संसारात रममाण झाली. कामातून निवृत्ती मिळाली. आता खूप मोकळा वेळ सापडू लागला. त्याचे काय करावे कळेना. घरात नवराबायकोचे काम ते काय ? प्रवास, छंदवर्ग, योगासने, व्याख्याने, सिनेमा, नाटक हे सर्व आळीपाळीने करूनही करमेना. अवेळी बेचैनी दाटून येऊ लागली. एखाद्या एकट्या संध्याकाळी विनाकारण डोळ्यांवर पाण्याचा पातळ पडदा जमू लागला. बाकी सगळे ठीक होते. पण कितीही जोपासले तरी वय हळूहळू जाणवू लागले. आरशात स्वत:कडे बघताना काया काळवंडलेली, सैल पडलेली दिसत होती. विरळ भांगात रूपेरी छटा उमटली होती. रात्री बिछान्यावर पडल्यावर आई ग ! दमले' असा सुस्कारा बाहेर पडत होता. सकाळी उठल्यावर पूर्वीसारखे झटकन उठून उभे राहणे जमत नव्हते. मध्यान्ही बाहेर पडले तर उन्हाची तिरीप डोळ्याला खुपत होती. समवयस्कांच्या घोळक्यात शुगर, बीपी, कोलेस्टेरॉल वगैरे शब्द लाह्यांसारखे उडत होते. 'सिनीयर सिटीझन चे बिरुद लागले होते. भाजीवाली तर केव्हाच 'मावशी' ऐवजी 'आजी' संबोधू लागली होती. पेपरमधल्या वाईट बातम्या वाचून बाहेर गेलेल्या घरच्या १४४ निवडक अंतर्नाद प्रत्येकाबद्दल नको त्या काळज्या करण्याचा रोग पडला होता. नातवाला साधे खरचटले तर 'गँगरीन तर होणार नाही' या चिंतेने झोप उडून जात होती. नवऱ्याचा खोकला जरा लांबला की 'त्याला घशाचा कॅन्सर तर झाला नसेल' ही काळजी जिवाला कुरतडत होती. सासूबाईंच्या हियाच्या कुड्या सुनेला द्याव्या की मुलीला यावर महिनोन्महिने निर्णय होत नव्हता, हव्यासापायी घेऊन कधीही न नेसलेल्या कपाटातल्या अनेक साड्या बघून मनात उद्वेग आणि विरक्ती दाटून येत होती. फुटलेल्या पाइपमधून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यात भिजून नाचणाऱ्या झोपडीतल्या पोरांकडे पाहून डोळ्यांत पाणी येत होते. नळाखाली पाय धुणाऱ्या रखमाच्या भेगाळलेल्या धुळीची पुटे चढलेल्या पायांकडे बघून मनात कळ उठत होती, दिवस मन खूप बेचैन, हळवे आणि चिडचिडे झाले होते. एक अशाच सैरभैर अवस्थेत तिने निर्णय घेतला. कोल्हापूरला जायचा! कुलदेवतेच्या दर्शनाला जायचा. खूप दिवस झाले आईला भेटून जिवाची तगमग तिला सांगू. विसाव्याचे चार क्षण शोधू ! समजूतदारपणे नवऱ्याने तत्परतेने सगळी तयारी करून दिली. हॉटेलचे बुकिंग, गाडी, ड्रायव्हर ! तिला म्हणे एकटेच जायचे होते. आपल्या बायकोला मधूनच काहीतरी असा झटका येतो हे त्याला माहीत होते ! शहरी कोलाहलापासून गाडी भरधाव दूर निघाली. गावामागून गावे मागे पडू लागली. डोंगरावरची हिरवाई आणि आकाशाची निळाई मनावर जादू करू लागली. ते आपोआप शांत होऊ लागले. दिवसाउजेडी हॉटेलमधे पोहचून, गावात फेरफटका मारून, देवीच्या ओटीचे सामान घेऊन परतायला सूर्यास्त होऊनच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळची महापूजा. देवळाबाहेर महाद्दाराजवळ फुलांची ओटीसामानाची दुकाने सजली होती. हातातल्या नक्षीदार पितळी तबकात मोठ्या कौतुकाने देवीसाठी घेतलेली जरीबुट्ट्यांची गर्द जांभळी साडी, पिवळा जरीकाठी खण, हिरव्यागार बांगड्या आणि ओटीसामान होते. समोरच्या दुकानात फुलापानांचा संमिश्र गंध दरवळत होता. पाच कमळांच्या फुलांची वेणी! किती छान दिसेल देवीला! जांभळ्या नऊवारीवर! मनावर पडलेला एक एक वेढा सैल होत होता. प्रवेशद्वारातून आत जाताना, गणपतीपुढे तांदूळ ठेवताना, भाविकांच्या ओळीमधे चालताना ती बघत होती आईच्या ओढीने आलेली लेकरे कोऱ्या कपड्यातली, बाशिंगे बांधलेली नवपरिणित जोडपी, तान्ही बाळे कडेवर घेतलेले तरुण आईबाप आणि थकले भागलेले सुरकुतलेले वृद्ध! चढत्या आयुष्याकडे अपेक्षेने बघणारे आणि उतरणीवर आयुष्याचा ताळेबंद मांडणारे, आईच्या कृपेचे, मायेचे दान मागणारे याचक! कोरीव दगडी खांबांमधून हळूहळू पुढे सरकत ती - -