पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वडीलधाऱ्यांच्या प्रेमाच्या छत्रछायेत नाहणाऱ्या त्या छकुलीच्या अंगावर त्यांनी हलक्या हाताने मायेची पिढीजात शाल पांघरली आणि त्या आईकडे वळल्या! अत्तराचा लग्नघर पाहुण्यांनी गच्च भरलेले. मागीलदाराच्या मांडवात तळल्या जाणाऱ्या बुंदीच्या लाडवाचा, केशर वेलदोड्यांचा घमघमाट, नवीन कोऱ्या वस्त्रांचा वास, झेंडूच्या फुलांचा, आंब्याच्या पानांचा गंध, खसच्या आणि गुलाबपाण्याचा दरवळ यांनी घर परमळले होते. स्वयंपाकघरात अहोरात्र चापाणी आणि स्वयंपाक चालू होता. मागीलदारी करंज्या, चकल्या, शेवेचे घाणे उठत होते. काम करता करता बायकांच्या गप्पांना ऊत आला होता. कुठे बारीकसारीक रुसणी, फुगणी फोडणीला असली तरी सर्वांच्याच उत्साहाला उधाण आले होते. वधू कावरीबावरी, यौवनाच्या उंबरठ्यावर माहेर आणि सासर या शब्दांचा अर्थ नीटसा न कळणारी महिन्याभरापूर्वी 'बघायला' आलेल्या 'पाव्हण्यावर' जीव जडवून बसलेली, वाढत्या वयाच्या प्रत्येक अवस्थेचा नेमकेपणा न जाणवता, मुग्धावस्थेतून पूर्ण विकसित झालेल्या स्थितीचे कौतुकमिश्रित आश्चर्य इतरांच्या डोळ्यांत वाचणारी, गृहस्थीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली, ओघानेच येणाऱ्या गृहस्वामिनीच्या पदाबद्दल अजाण कुतूहल असणारी, उत्सुक पण हुरहुरलेली नवयौवना! सनईच्या सुरात वराकडची उष्टी हळद आली. प्रशस्त देवघरात पंचरंगी रांगोळीवर चौरंग, त्यावर मखमली उशी बाजूला ताम्हनात हळद, कुंकू, अक्षता, सुपारी आणि निरांजन, आजूबाजूला जरीवस्त्रे नेसलेल्या, दागदागिन्यांनी झळझळलेल्या स्त्रिया, गोठ- पाटल्या, चंद्रहार घातलेली आई पुढे झाली. आपल्या बोटातली अंगठी ताम्हनात टाकली. लाडक्या लेकीला औक्षण करताकरता डोळे भरून आले. छकुलीची जन्मापासूनची रूपे डोळ्यापुढे साकार झाली. आता आता अंघोळीनंतर राघूमैनेच्या सोबतीने पाळण्यात गाढ झोपी गेलेले रूपडे एवढे मोठे कधी झाले हा संभ्रम पडला. डोळ्यातल्या पाण्याच्या पडद्यापलीकडे तिची लेक सौभाग्यकांक्षिणी वधूरूपात चौरंगावर बसली होती. तिच्या मस्तकावर तेलाचे थेंब टाकून, गाला हाताला हळदीची बोटे लावून भरल्या मनाने ती हळूच बाजूला झाली. पाच सवाष्णींचे औक्षण झाल्यावर आत्या पुढे सरसावली, लाडक्या भाचीला नहायला घालायला! बाथरूममधे चकचकीत स्टीलच्या बादल्यांत थंड, गरम पाणी, एका वाडग्यात नारळाचे दूध, दुसऱ्यात गाळलेली सुगंधी शिकेकाई, तिसऱ्यात तिळाखसखशीचे उटणे आणि तिच्या बालपणीची तीच तेलाची चांदीची झारी! जरा संकोचत, उभे लावणे लावून ती स्टुलावर बसली आत्याने तिची वेणी सोडवली. लांबसडक, चमकदार, रेशमी केसांच्या लडी अंगाखांद्यावरून ओघळू लागल्या. मस्तकावर अलगद पडणाऱ्या जुईच्या सुगंधित तेलाच्या थेंबांनी आणखीच तकाकू लागल्या. आत्याबाईंचे ह्यत मायेने तिच्या केसांतून, पाठीवरून १४२ • निवडक अंतर्नाद फिरू लागले. नारळाचे दूध केसांत मुरू लागले. उटण्याच्या स्निग्ध, खरखरीतपणाने रंध्र रंध्र मोकळे होऊ लागले. कांती खुलू लागली. आवळ्या- संत्र्याच्या शिकेकाईच्या सुवासाने नहाणीघर दरवळून गेले. गरम पाण्यातून उठणाऱ्या वाफांनी वातावरण तरल होऊन गेले. मस्तकावर उपड्या होणाऱ्या तांब्यातील पाण्याबरोबर खळमळ वाहून जाऊ लागले. 'अग नीट पुसून घे ग' म्हणत आत्या बाहेर गेली. सोहळ्यासाठी सज्ज होणाऱ्या स्वतःच्या पूर्ण विकसित देहाकडे ती स्वत:च अचंबित बघू लागली. मऊ टर्किश टॉवेलने अंगप्रत्यंग पुसताना, पंचात ओले केस गुंडाळताना उगीचच लाजल्यासारखे, बावरल्यासारखे होत होते. कल्पनेचे मोरपीस अंगावर रेशमी काटा फुलवीत होते. बाथरूमच्या बाहेर येऊन ओले केस झटकताना, कंगव्याने विंचरताना, अंबाड्याच्या सैल गाठीत बांधताना ते पीस जाणवतच होते. बाहेर आई आणि मामीचे काहीतरी बोलणे चालू होते. कपाटातले दागिने मामीजवळ सोपवून आई बाहेर गेली, मामीने पिवळ्या रंगाची रेशमी बुट्टेदार शालूची घडी पुढे केली. "अगबाई नऊवारी? मला नाही बाई येत नेसता." ती बावरली, “अग, मी करते मदत तुला आज हीच नेसायची हो मामाकडची. आजचा मान त्याचा, एरवी आहेतच की तुमच्या गोल साड्या आजचा दिवस महत्त्वाचा आज आपली रूढी जपायची. आमच्या वेळी पिवळी अष्टपुत्री असे. सुती साडी हळदीने रंगवलेली. आणि मंगळसूत्र काळ्या पोतीतलं. सोन्याची एक वाटी सासरची, एक माहेरची! पुष्कळदा तर विजोडच असायच्या वाट्या, नाकात पाणीदार मोत्याची नथ आणि पायांत जोडवी, विरोल्या, मासोळ्या, कपाळी लाल पिंजर मेणावर लावलेली. कशी साजरी दिसायची नवी नवरी!"....... तिला नऊवारी नेसवता नेसवता मामी जुन्या जगात रंगून गेली! साजशृंगार पूर्ण झाल्यावर ती आरशासमोर उभी राहिली तेव्हा मामीच काय, तीसुद्धा विस्मयचकित झाली. एका अल्लड, निरागस मुलीचे युवतीत झालेले रूपांतर बघून! सोनसळी रंगाची प्रभा तिच्या सौष्ठवपूर्ण निरोगी देहावर पसरली होती. गालांवर हलकी तांबूस जिल्हई, मानेला सोलीव बदामाचे तेज, केस तकतकीत सुळसुळीत, कांती नितळ, डोळे चमकदार, चेहऱ्यावर सलज्ज प्रभा! रेशमी वस्त्राने आच्छादलेली, सोन्यामोत्याच्या फुलांच्या दागिन्यांनी सजलेली अशी ती नववधू! सुस्नात! एखाद्या झळझळीत कळसासारखी.... घाटदार, तजेलदार आणि सुमंगल! आईने खांद्यावर टाकलेला, घरंदाज अस्मानी बनारसी बुट्टेदार शेला सावरत, पतीच्या जीवनात पाऊल टाकायला सज्ज झालेली.... वर्षे लोटली! तिचा सांसारिक प्रवास सुरू राहिला. चारचौघींसारखा, सुखदु:खाचे कमी-जास्त रंग आलटून पालटून दाखविणारा, मुलेबाळे, नवरा, सासूसासरे, पाहुणेरावळे यांनी