पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजीबाईंनी पलंगावर दुसरे दुपटे पसरले आत्याबाईंनी हौशीने रंगीबेरंगी तुकडे जोडून केलेले. एका कोपऱ्यात चिऊताई आणि दुसऱ्यात मनीमाऊ काढलेले. शेजारी बाळाचे चिमुकले कपडे ठेवले. अंगडे, टोपडे, गोंड्याचे पायमोजे. स्टुलावर तीट, काजल अन् पावडरीच्या चांदीच्या डब्या गायीच्या तुपाच्या, तांब्याच्या निरांजनाच्या ज्योतीवर धरलेलं काजळ आणि साबुदाणा भाजून केलेली तीट चांदीच्या सफरचंदात पावडर आणि फुलासारखा पावडर पफ ! आणि सरतेशेवटी सगळा जामानिमा झाल्यावर बाळाला गुंडाळायला आजोबांच्या धोतराचे, दुधात भिजवून धुऊन आणखीच मुलायम केलेले, बाळीच्या कोमल कायेला कुठेही खुपणार नाही, टुपणार नाही अशा मायेच्या काळजीने निगुतीने बनवलेले दुपटे पलंगावर ठेवून आजीबाई न्हाणीघरात शिरल्या. एखाद्या खोलीसारखे प्रशस्त न्हाणीघर लाकडी झडपांच्या खिडक्या, बसायला चौरंग, पितळी तांबे, बादल्या, लाकडी खुंट्यांवर स्वच्छ पंचेजोड आजीबाईंनी भिंतीशी उभा पाट फरशीवर आडवा मांडला. शेजारी चौरंगावर तिळाच्या तेलाची चांदीची छोटीशी झारी, दूध- बेसनाची काशाची वाटी, पितळी बादल्यांमधे थंड गरम पाणी. सर्व तयारी झाल्यावर आजीबाईंनी नेसूचे लुगडे गुडघ्यापर्यंत वर खोचले आणि आईच्या मांडीवरून बाळाला उचलले. मायेच्या उबेतल्या साखरझोपेचा भंग झाल्याने बाळाने सूर लावला. "उगी, उगी! कुणी मारलं माझ्या बाळाला ? हात रे काऊ, त्रास नको देऊ माझ्या छकुलीला, नाही रे नाही माझ्या शोन्या, उन्हात घर बांधू या हां त्याचं !...." वगैरे वगैरे बोलत त्या सपीठाच्या गोळ्याला उराशी धरत आजीबाई नहाणीत आल्या. हळुवारपणे काळजीपूर्वक एक एक करून त्यांनी बाळाचे कपडे उतरविले. कपड्यांच्या उबेतून बाहेर आलेले शिर शिरलेले बाळ एकदम चूप झाले. हातपाय वेगाने हलवू लागले. मानेला आधार देऊन, बाळाला बसते करून, टाळूवर तेलाची धार सोडली. बोटाच्या हलक्या, सराईत हालचालींनी आजीबाई टाळूत • तेल जिरवू लागल्या. त्यांनी पाय लांब केले व बाळाला पायावर घेतले. झारीतून कोमट तेलाची धार बाळाच्या अंगाखांद्यावर पडू लागली. आजीबाईंची बोटे कधी सरळ, कधी चक्राकार फिरून बाळाला मालिश करू लागली. हालचालीची एक लय निर्माण झाली. बाळ हुंकार देऊ लागले. पायांवर पालथे केल्यावर मान वर उचलू लागले, पाठीला बाक देऊ लागले. तो छोटासा जीव या स्नानसोहळ्याला आपल्यापरीने साथ देऊ लागला, दाद देऊ लागला. त्याची तसून्तसू काया स्निग्धतेत लपेटली गेली. आजीबाईंनी बाळाला सरळ केले. आता त्याच्या अंगावर दूध- बेसनाचा हात फिरू लागला. घरी जात्यावर दळलेले, चाळलेले स्वच्छ बारीक बेसन आणि दुधावरची दाट साय ! हलक्या हाताने अंगावरच्या मळ्या निघू लागल्या. बाळाची काया सतेज होऊ लागली. हा सर्व वेळ वहिनीबाईंच्या आतबाहेर खेपा आणि सूचना चालूच । होत्या, मधूनच बाळाशी बोबडे बोलणेही! बाळाची आईही डोकावून जात होती. पहिलाच अनुभव असल्याने काय करावे हे तिला सुचत नव्हते. बाळाला चाललेली दमदार मालिश पाहून भेदरायला होत होते. 'अयाई ग! हळू हो आजीबाई दुखेल माझ्या बाळीला. केवढासा जीव तो!” अशा घाबरट उद्गारावर आजीबाई हसत होत्या. "कायबी व्हत नाही. दिसामासानी वादंल पोर, हाडं बळकट व्हाया होयीत, बाळसं चढ़ाया पायजेल पन्नास बाळंतपणं काढली म्या! सगळी पोरं गुटगुटीत, हीबी तशीच होईल. गावामंदी नाव हाय माजं. उगाच न्हाई बलावली वहिनीबाईंनी. तुलाबी तुझ्या न्हानपणी न्हाणली आन् तुझ्या भावंडांना बी...." आजीबाईंची बडबड मधेच बाळाला, मधेच तिच्या आईला उद्देशून चालली होती. मालिश संपत आली तशी वहिनींनी मोलकरणीला हाक दिली. तिने पितळी बादल्यातल्या कढत पाण्यात विसवण घातल्यावर त्यांनी स्वतः आपल्या कोपरावर ओतून ते बाळाला सोसवेल की नाही याचा अंदाज घेतला. मोलकरीण हळुवारपणे बाळाच्या अंगावर पाणी घालू लागली. आजीबाई तिला स्वच्छ करू लागल्या. सुख आणि श्रमाने बाळाचा अक्षरशः डोळा लागला, बाळाला पालथे करून 'हर गंगे, हर भागीरथी' म्हणत तिच्या मस्तकावर पाण्याचा तांब्या उपडा केला. जागे होऊन बाळ रडू लागले. मोठ्या मायेने आजीबाईंनी त्याला सरळ केले. अंगावरून पाण्याचे थेंब ओघळणारे, गळ्यात जिवती, मनगयत बिंदुल्या, दृष्टमणी आणि पायांत रुप्याचे पैंजण घातलेले ते सालंकृत कृष्णरूप मोठे लोभस दिसत होते. काहीतरी पुटपुटत, बाळाच्या अंगावरून पाण्याने भरलेला तांब्या आजीबाईने तीनदा फिरवला आणि मोरीत ओतून दिला. मोलकरणीने दिलेल्या पंचाने तिचे अंग टिपून काढले. कोपऱ्यातल्या लोखंडी घमेल्यातल्या पेटत्या गोवऱ्यांवर ओवा, हळद टाकली. नहाणीघरात आणि शेजघरात धुराचा वास दाटून गेला. घराला बाळबाळंतिणीचा गंध लागला. आजीबाईने काळजीपूर्वक बाळाच्या अंगाला, मस्तकाला धुरी दिली आणि तिला कुंचीत लपेटले. बाजूला चौरंगावर बसून वहिनीबाई सर्व काही लक्षपूर्वक निरखीत होत्या. त्यांच्या हातात बाळाला देऊन आजीबाई उभ्या राहिल्या. नेसूचे नीट करून बाळाला हाती घेऊन त्या शेजघरात आल्या बाळाला दुपट्यावर ठेवून उघड्या छातीवर वेखंडाची पूड चोळली. अंगावर हलकासा पावडरचा पफ फिरवून कपडे चढवले. डोळ्यांत काजळ, कपाळाला तीट लावून गालावर आणि तळपायावर काजळाचं बोट ओढलं, कुणा पाप्याची, आल्यागेल्याची, भुताखेताची.... दृष्ट नको लागायला छकुलीला ! सर्व जामानिमा झाल्यावर, आजोबांच्या धोतराच्या पांढऱ्या स्वच्छ, नरम दुपट्यात फक्त चेहरा दिसेल असे बाळाचे घट्ट गाठोडे बांधले आणि ठेवून दिले पाळण्यात. पाळण्याला हलकासा झोका देऊन आपल्या महाटमोळी आवाजात अंगाई गाता गाता पाळण्यात गाढ झोपी गेलेल्या तान्हुलीला पाहता पाहता आजीबाईचे मन मायेने ओथंबून आले. घरादाराला वेड लावणाऱ्या आणि सर्व निवडक अंतर्नाद १४१