पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अभ्यंगस्नानम् नीलिमा इनामदार सोत्कंठ तारुण्य आणि सांसारिक कडूगोड अनुभवातून प्रौढत्व पार केलेलं तरीही... आता या शेवटच्या टप्प्यावर हुरहुरलेलं, काजळलेलं, बेचैन, अतृप्त अबोध, निरागस शैशव, अननुभवी, आयुष्य... सुखी, सुरक्षित आणि समृद्ध ! असं तिचं मन... निर्मल अभ्यंगस्नानाची आस आणि प्रतीक्षा असलेलं... एका हरवत चाललेल्या संस्कृतीची हुरहुर लावणारी कहाणी. केळी नारळीने वेढलेल्या त्या प्रशस्त वाड्यासमोरील अंगणात हिवाळ्यातले तलम, सोनेरी, ऊबदार ऊन पसरले. अंगणातील सडा, रांगोळी केव्हाच झाली होती. वृंदावनातील सावळी तुळस वाऱ्यावर मंद डोलत होती. गुलाबाच्या फुलांचा मंद दरवळ आसमंतात पसरला होता. ओसरीवरच्या झोपाळ्यावर लोडाला टेकून अण्णासाहेब बसले होते. पायाखालच्या फरशीला हलका रेटा देत होते. कडीच्या कुईं कुईं आवाजाच्या तालावर मागेपुढे लयबद्ध झुलणाऱ्या झोपाळ्याच्या गतीत रमून हातातला 'केसरी' चाळत होते. अंगावर पांढरे शुभ्र मलमली धोतर आणि अर्ध्या बाहीच्या पैरणीवर गरम जाकिट, खांद्यावर काश्मिरी शाल भरगच्च मिशा, डोक्याला टक्कल, डोळ्यांवर गोल भिंगाची आरशी. नजरेत दरारा, जरब, घरमालकाचा रुबाब! फाटकातून आत येणाऱ्या जाणाऱ्यावर करडी नजर घराच्या आतबाहेर धडपडणाऱ्या पोराबाळांना आणि बागेत काम करणाऱ्या माळ्याला हुकमी सूचना सारे काही झोपाळ्याच्या लयीत - वृंदावनापलीकडे पायऱ्या चढत गेले की लांबलचक ओटी, सागवानी नक्षीदार खांब आणि लाकडी कठडा असलेल्या भिंतीवर देवादिकांच्या आणि पूर्वजांच्या तसबिरी, खिडक्यांना उभे, लोखंडी गज. आत जाणाऱ्या दारावर काचेच्या पुंगळ्यांचे तोरण, ओटीच्या एका बाजूला पितळी कड्यांचा झोपाळा आणि दुसरीकडे प्रशस्त सागवानी आरामखुर्ची. घराला डावी घालून परसदारी जायची वाट रोजच्याप्रमाणे मागच्या अंगणात गडीमाणसांची, मोलकरणींची वर्दळ चालू होती. कपडे धुण्याचे, भांडी घासण्याचे, पाणी उपसण्याचे आवाज ऐकू येत होते. पाणी तापवायच्या तांब्याच्या बंबातून धूर यायला लागला, की एखादी मोलकरीण खालची चाळणी हलवून राख झटकत होती. बंबात लाकडी ढलप्या घालून पुन्हा जाळ करीत होती. पाण्याची बादली भरून आत कुणाच्या तरी स्नानासाठी घेऊन जात होती. हौदातले गार पाणी विसवणासाठी नेत होती. डोक्यावरचा पदर सावरीत फाटकातून आत शिरलेल्या म्हाताऱ्या आजीबाई परसदारी आल्या आणि हातपाय धुऊन १४० निवडक अंतर्नाद जाळीच्या मागीलदाराने आत स्वयंपाकघरात शिरल्या. स्वयंपाकघरात लगबग सुरू होती. दहा जणांचं घर आणि लाडकी लेक बाळंतपणाला आलेली! काकूंनी आजीबाईंपुढे खाण्याची पितळी ताटली आणि गरमागरम चहाचा कप ठेवला. वहिनींनी जाळीच्या कपाटातला कल्हईदार पितळी डबा उघडला. कालच साजूक तुपातले मेथीचे लाडू केले होते. आजीबाईंच्या ताटलीत लाडू वाढला गेला. "बघा कसा झाला आहे तुम्हांलाही शक्ती हवी ना! बाळबाळंतिणीचं करायचं आहे. पोट चांगलं चोळा हो आईचं, बाळाला मात्र सांभाळून हं. उघडी ठेवू नका फार वेळ खिडक्या नीट लावा, वारा लागू देऊ नका उघड्या अंगावर रात्री किरकिरत होती. टाळू नीट भरा. अंघोळीनंतर दुपट्यात नीट गुंडाळा...." मायेपोटी वहिनींच्या सूचना संपतच नव्हत्या, कप, ताटली विसळून आजीबाई बाळंतिणीच्या खोलीत शिरल्या. बाळंतीणबाई आरामखुर्चीत बसली होती. चेहऱ्यावर तेज आले होते. त्यावर नवथर मायपणाची साय पसरली होती. बाजूच्या नक्षीदार पायाच्या शिसवी टेबलावर हळिवाच्या खिरीचा वाडगा आणि वाटीत मेथीचा लाडू दिसत होता. वावडिंग यकून उकळून गार केलेल्या पाण्याचा तांब्या आणि चकचकीत पानदानही दिसत होते. बाळंतिणीने रोज दोन्ही जेवणानंतर विडा खाल्लाच पाहिजे - बदामबिदाम घालून अशी ताकीद घरच्या वडीलधाऱ्या स्त्रियांकडून मिळाली होती म्हणे! - आजीबाई तान्हुलीच्या पाळण्याजवळ गेल्या. अंगडे- येपडे घातलेले बाळरूप डोळे किलकिले करून पाहत होते. अंगाला आळोखेपिळोखे देत होते. गोडगोड बोलत, बाळाला आईच्या मांडीवर देत, आजीबाई अंघोळीच्या तयारीला लागल्या. राघूमोर लावलेल्या पाळण्यातली दुपटी बदलून स्वच्छ बिछाना तयार केला. नव्याने धुनकून घातलेल्या कापसाची मऊ मऊ गादी, त्यावर वहिनीबाईंच्या वापरून, धुऊन, मऊमऊ झालेल्या लुगड्याचे, हातशिलाईचे, पिसाच्या स्पर्शाचे दुपटे बाजूला छोटे रेशमी लोड, मानेखाली बाकदार उशी पायाजवळ पणजीबाईची ठेवणीतली नरम शाल.