पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छोय सिंधी बघायचा बाकी खिटखट नाय पायजे. इमानदारीसे बेचो, इमानदारीसे कमाओ, सुरुवातीला हणम्याला स्टेशनांची नावंसुद्धा माहीत नव्हती. संडास रोड, डाकी रोड असं तो म्हणायचा. मग बाकीची पोरं त्याला फिदीफिदी हसत. "साला घाटी सुधरेगा नहीं” म्हणून चिडवत, चिडलेला हणम्या संतापून जायचा. खूप माल विकायचा विकता विकता शिकायचा. शिकलेलं मनात साठवायचा, सारखं आठवायचा. सुधरत जायचा. हळूहळू डाकी रोडला डॉकयार्ड रोड स्टेशन, संडास रोडला सॅन्डहर्स्ट रोड स्टेशन असं खणखणीत आवाजात हणम्या बोलू लागला, "ले लो, ले लो डायरी ले लो, हॉस्पिटल नंबर, पोलीस स्टेशन नंबर, एसटीडी नंबर, आयएसडी नंबर, फायर ब्रिगेड नंबर, सब मिलेगा नंबर ले लो, ले लो डायरी ले लो, पाच रुपये का एक डायरी, एक डायरी का पाच रुपया.” हणम्याची प्रगती बघून बाकीची पोरं चाट पडली. तसा बड़ी सिंधीचा हणम्यासाठी निरोप आला. छोटय सिंधी इमानदारीचा धंदेवाला बडा सिंधीकी बात अलग, अफू, गांजा, चरस, हवालाच्या नोटा- बेइमानी म्हणजे पैशाला पासरी, बडा सिंधीकडे बढती मिळावी म्हणून पोरं टाचा घासायची. हणम्याला मात्र बढती न मागता मिळाली, तसा हार्बर लाईनवरच्या गर्दीसारखा हणम्या दिवसेंदिवस फोफावू लागला. चोरून बिडी पिणारा हणम्या सिगरेट शिलगावू लागला. म्हातारीला वास जाऊ नये म्हणून सुगंधी बडीशेप खाऊ लागला. एक दिवस अस्लम त्याला कानात म्हणाला, "देख हणम्या, दारू पिनेके बाद चिकू खाके घर जानेका घरवालों को झ्याट बास समझता नही." संध्याकाळी झोपड्याकडे वळताना हणम्या रोज चिकू खाऊ लागला. एक दिवस काय झालं कोणास ठाऊक एकतर दारू जास्त झाली असणार, नाहीतर चिकू कमी पडला असणार – दारूच्या वासानं शेवंताक्काचं डोकं भणभणलं. सात्यासरा अंगात घुसल्यासारखी ती तिरपाटली. हणम्याला लाथाबुक्क्यांनी तुडवू लागली. कोपऱ्यातलं जातं उचलून त्याच्या डोक्यात घालावं म्हणून धावली, तशी शेजारच्या झोपडीतली आयेशाबी धावत आली. "गप ए. शेवे. अगे क्या करती? जीव लेती क्या छोकरे का?” "तू गप बस भाभी, ह्येचा मुडदा बशीवती भाड्याचा, " "पागल हो गयी क्या शेवे तू? ह्यत ले पीछे नहीं तो मेरे डोस्के में डाल. रोज पचास- सौ कमाके लाताय, किंमत नहीं क्या तेरेकू?” "काय बोडक्यावर वाटायचं माझ्या ते शंभर रूपडं व्हय गं भाभी? कसलं इदरकल्याणी पोरगं बघ की गं बाई माझे ?" बोलता बोलता झाड पडल्यासारखी शेवंताक्का खाली पडली. वादळानं थरथरणाऱ्या फांद्यांसारखी लटलटू लागली. दोघींनी गळ्यात गळा घातलेला बघून हणम्या हळूच बाहेर सटकला. "दारू पितंय न्हवं गं. ह्येला पटकीचा फोड आला त्यो भाड्याला दारू पिवून पिवून आतड्याच्या चिंध्या झाल्या. सोताच्या हातानं तिरडी उचलली न्हवं गं ह्येच्या बानं? आनी हे बी इदरकल्याणी कार्ट, बापाच्याच पायावर पाय ठेवाय लागलंय. कसं जगावं आणि कसं मरावं काय कळंना व्हय गं खज्जाळीच्याला?” ऊन अजून बेसुमार झालेलं. एकाही श्रावणसरीचा पत्ता नाही. अंगातला घामाचा ढग बाहेर यायचा तेवढ्यापुरताच श्रावण, उनाचा तापटपणा वाढायला लागला, तशी शेवंताक्काच्या डोळ्यांसमोर अंधारी यायला लागली. "नाग को क्यूं दूध देनेका?" "म्हंजे? द्याचं आसल तर दे, नाहीतर गप जा की बाबा.” "फिर भी क्यूं दूध देने का ? वो कबसे पिने लगा ?” "लेकरा काय करायचंय तुला? कोन हाईस तू?” "आम्ही वन्यप्राणी संरक्षणवाले आहोत. कशाला नागाला त्रास देता मावशी ?" "मग घेऊन जा तुझ्या घरला. न्हे जा. तुझ्या आई-बाच्या पायावर ठेवून दे. आशीर्वाद द्या म्हणावं ह्या नागास्नी, कुत्री, मांजरं पाळत्यात तसं पाळ जा ह्या नागास्नी. हे घे जा घिवून.” कार्यकर्ती पोरं बावचळून पळाली इसाकशेठचा माणूस लगबगीनं आला आणि वडापाव बांधलेली कागदाची पुडी शेवंताक्काच्या तिसऱ्या टोपलीत ठेवून गेला. शेवंताक्कानं अधाशासारखा वडापावचा मोठा तुकडा घशात ढकलला, तसा जोराचा ठसका आला. दुप्पट वेगानं वडापाव बाहेर येऊन आदळला. सगळ्या पोरींनी दहीभात नाइलाजाने संपवला. खाण्याची वासना नव्हती. पण प्रसादाचा दहीभात टाकायचा नाही. गौरी - गणपतीचं विसर्जन झालं. पुरुष माणसं, पोरंटोर नदीवर परतायला लागली होती. बाया आणि पोरी टोरी आवराआवरीला लागल्या, शेवंतानं आवाज लावला तशा बाकी पोरीसुद्धा एकसुरी झाल्या. गेली गवरा गवरा ग बाई मला गमंना गमंना ग बाई मला जेवसं वाटंना वाटंना ग बाई पानी पिवूस वाटंना वाटंना ग बाई पोरी खिन्नपणे मागे परतू लागल्या. पाय जडावलेले... "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.” खरंच की. आता पुढच्या वर्षी गणपती येणार, मगच पोराच्या पाठोपाठ गौराई येणार, एक वर्ष ग बाई, लगेच जायला पाहिजे ते. सारखे गौरी-गणपती असले पायजे घरात, मग काय मजा येईल! शेवंता मोहोरून गेली. इतर पोरींमध्ये परत मिसळली, परतीची वाट अर्धी झाली, गल्लीमधलं एक शेंबडं पोरगं गळणारं नाक आणि लोंबणारी चड्डी सावरत धावत आलं. "शेवंताक्का, तात्यानं बलिवलंय तुला लवकर, सरवड्यास्नं तुझा मामा आलाय. सोळंबीची माणसं तुला बघाय येणार हाईत.” निवडक अंतर्नाद १२५