पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भिंतीवर कॅलेंडर लटकत होते. त्यावर शेतकऱ्याचं चित्र होतं. खाली कुठल्यातरी खताची जाहिरात होती. अन् वरच्या चित्रात हायब्रीडचं पीक दाखवलं होतं. मोठमोठी हातभर लांबीची कणसं चित्रातल्या धांड्यावर दिसत होती. अन् त्याच्या अलीकडे मासाळलेला शेतकरी मस्त नजरेने मिशीवर पीळ मारत बसला होता. .... मायमी, आसा शेतकरी दिवसा कंदील लावूनबी सापडायचा नाई कुठी! एवढं बदबद पीक घेणारा मासाळल्या अंगाचा... सुखावल्या तोंडाचा! शेतकरी तं सम्दे हैराण हैराण होयेल आस्तात... कर्जापायी... खताच्या... अन् बियाणाच्या महागाईपाई पैसा लावून बी पीकं व्हत नाईत, तवा कर्जाचे डोंगर छाताडावर उभे राह्यतात. डोक्स्यावर केसं मोजले तरी ते कर्जाच्या रकमेच्या इतले भरत नाईत, टाळक्यावर केसं कमी पण कर्ज जास्ती अशी गत आस्ती... अन् हे व्यापारी लेकाचे मोठे चित्र छापतात... शेतकऱ्याचे. त्याह्यच्या सकवार बायकायचे... मायमी; शेतकऱ्याची बायको कुठी सकवार, रुपवान राह्यती का? दिवसच्या दिवस उनाताणाचे काम करून सम्द्या काळ्याभंगार दिसतात बिचाया... झकपक राह्यले कुठी टैम आस्ते त्याह्यले? आंगुळ करतात बिचाया, तरीबी त्याह्यच्या अंगावर सारवणाचं शेण तसंच चिकटपेलं राह्यते ऐरवाळी चिरवाळी तरण्यापणातच म्हताऱ्या दिसाय लागतात. चिमून जातात. आपाडी आंबा पिकवल्यासारख्या. तो असा विचार करीत होता. अन् भिंतीवर दुसरं एक कॅलेंडर फडफडताना दिसलंच. शेतकरी अन् त्याची बायको विहिरीसमोर उभे! त्यांच्या मागच्या बाजूने पाइपातून पाण्याची धार पडत होती. मागच्या बाजूने घनघोर ऊसाचं पीक होतं. अन् दोघं नवराबायको हसत होते... हे वावर अस्सल शेती कसणाऱ्या कास्तकराचं आसूच शकणार नाई... एकत हे वावर खोटं हाये... नाईत हे शेतकरी खोटे हायेत.... ह्या देशातला शेतकरी आसा आसूच शकत नाई... मागं कधीच नवता. आताबी नाई... अन् याच्या पुढीबी कधी राहू शकणार नाई. त्याला रागच आला. त्याच्या नकळतच तो उठला, अन् भिंतीवरची कॅलेंडरं फाडून फेकाय लागला, सगळे कॅलेंडर फाडून चिंधीचोळा केले. कागदाचे बोळे कोपऱ्यात फेकून दिले. तेव्हा त्याचं समाधान झालं. पलीकडून दार उघडल्याचा आवाज आला. सुभाष झोरे नोटांची बंडलं घेऊन दुकानात आला. येताना त्याने आतल्या घराचं दार लावून घेतलं. आता आतले टीव्हीवरचे गाणे बंद झाले होते. अन् आतलं घर एकदम सामसुम होतं. "बरोबर दहा हजार हायेत बापा... पण दुसऱ्या कोणाले सांगू नको... नाईत ज्याह्यानं ज्याह्यानं मोड केली ते सम्देच येतान नुकसान भरपाई मागाय अन् मले मरावं लागल बी. पी. वाढून...' असं म्हणून सुभाष झोरेने त्याच्या हाती पैसे दिले. विठोबा " १०६ निवडक अंतर्नाद गवारे समाधान पावला... आज त काई झालं... वारेवाऽऽ खळेदळे न करता... दणके दुणके न घेता जवारीचे पैसे हाती आले... बायकोस दाखोले त किती हरखून जाईल ती ! सुभाष झोरे हताश झाल्यासारखा खुर्चीत बसला होता. बिटीबिटी डोळ्यांनी विठोबा गवारेला पाहत होता. ते लक्षात आलं तसा नोटा कुरवाळणारा विठोबा संकोचला. पण पुन्हांदा सावध झाला. नोटा खिशात ठेवल्या त्याच खिशातून चुनाळू बाहेर काढलं. तंबाखूची चिमूट तोंडात फेकली. मग पिक सावरत त्याने विचारलं, "कसा काय राह्यला यावर्षीचा सिझन ? कितीक कमाई केली?" विठोबा गवारेच्या या प्रश्नाने सुभाष झोरे आश्चर्यचकित झाला. त्याच्या तोंडाकडे टकाटका पहायला लागला. काय बोलावं? त्याला काही सुचेनासं झालं. पण बळेबळेच म्हणाला, "काय दीड लाखाची कमाई झाली या सिझनवर ! " "बाप रे!” विठोबा गवारे हबकला तसा सुभाष झोरेला पश्चात्ताप झाला. सालं, उगीच सांगितलं, अशानं त आखीन मागायचा ह्य पैसे. "तुले हाब्रेटाचं वावर मोडायचं आसंल त चिंता नको करू बाजऱ्याचं बियाणं हाये आपल्याकडी. ऑगस्ट मह्यण्याच्या शेवटच्या हप्त्यातबी चालते पेरायले. " "आरे हूऽऽत कोण पेरील तुमच्या जवळचं भेसळीचं बियाणं आता! आता खामगावहून आणतो मी बियाणं एवढे पैसे खिशात आसल्यावर कोण घेईल सडकं बी?" असं आपल्या खिशाकडे खुणावत विठोबा गवारे उठला. अन् पायऱ्या उतरून रस्त्याला लागला. त्याला दिसलं; बाहेर लख्ख ऊन सांडलं होतं. आभाळ निवळलं होतं. पावसाची भुरभुर थांबून गेली होती. रस्त्याने चालत बाजार भरायचा त्या मैदानात आला. पटांगणात वडाचं मोठंच्या मोठं झाड... हजारो फांद्यांचं दाट सावलीचं. चारी अंगानी पारंब्याच्या जय लोंबलेलं. झाड नाहीच... महावृक्ष म्हणायचं, महावृक्षाखाली गायी गवारं उभं होतं. पन्नास साठ गायी, वासरं रवंथ करत, रानात जायची वाट पाहत उभे होते... बारकाली पोरं पारंब्याला झोके घेत होती. आपूनबी लहाणपणी इथं गवाऱ्यात गायी आणून घालायचो... पारंब्याले झोके घ्यायचो... विठोबा गवारे कितीतरी वेळ त्या वडाच्या दाटवनात हरवून गेला. "रामराम गवारेबुवा!" भगवान कुसळकर जवळ उभा होता. "रामराम!" "काय पाहून राह्यले बापा वडाच्या झाडात एवढं एकचित होवून?" "मी मलेच पाहून राह्यलो! जाऊ द्या ते! तुमी कुठी चाल्ले?" त्याने भगवान कुसळकरला विचारलं. "तेच आपलं भणकं... मोड मागं लागली न बाप्पा आवंदाच्या साली... सम्दं खराब, भेसळीचं बियाणं भेटलं.