पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झकमारी झाली, चाल्लो पुन्हांदा सुभाष झोऱ्याच्या दुकानावर ! आणतो बाजऱ्याचं बी!” त्याचं बोलणं ऐकलं. अन् विठोबा गवारे पुन्हा गंभीर झाला... सालं आपून केला आपला खाडानिवाडा पण या बाकीच्या कास्तकरायचं काय? "काय त्याच्या दुकानावर जाता एकदा फसल्यावर पुन्हा?" "काय करता मंग? कुठी जाता? आपली तं उपाधारीची अन् व्याजाबट्ट्याची कुणबीक हाये सम्दी ! कोऱ्या कागदावर, तेबी स्टॅम्प पेपरवर सह्या देल हायेत त्याले! त्याच्या कर्जाखालून आपला जलम काई सुटत नाई..." "आसं कसं म्हन्ता! सरकं व्हा त्याच्यावर नुकसानभरपाई मांगा त्याले!” "काय मांगता? कोऱ्या स्टँप पेपरवर आपल्या सह्या हायेत. कमी जास्ती बोलाय जावावं तं घ्यायचा इस्टेट लिहून. अन् या लागायचं सडकीवर त्याच्यापेक्षा बरं हाये जे चालू हाये ते!” असं म्हणून कुसळकर चालाय लागला. विठोबा गवारेही गलबलून आला. ....आपून आपला खाडानिवाडा करून घेतला. पण आता ह्या बाकीच्यायचं काय? हे बिचारे आसेच मरणार हातपाय खोरू खोरू... याह्यच्या जल्माचं कर्ज काई फिटणार नई या विचाराने आतल्या आत खोलखोल झाला. अन् पुन्हा एकाएकी उदास उदास वाटाय लागलं... उदास मनाने तसाच पुढे चालत राहिला. मेनरोडवरची दुकानं नव्या नजरेने पहायला लागला. सुरज जनरल स्टोअर्सपुढे आला, तर डोळे दुकानातल्या टेबलावर खिळून बसल्यासारखे झाले. तिथं पंखे ठेवलेले होते. वेगवेगळ्या रंगाचे, चकाकणारे पंखे... .... सालं किती दिवसाचा इचार करून राह्यलो, पंखा घ्यायले पाह्यजे. रातभर मच्छर फोडून खातात, सम्दं रगत पिवून घेतात. नकळतच हात खिशावर गेले. खिसा गरम होताच घेऊनच टाकू पंखा झपाझप दुकानाच्या पायऱ्या चढून वर गेला. "पंखा केवढ्याचा हाये जनक भाऊ?” पंख्याला चारी अंगाने निरखून पाहत, कुरवाळत त्याने विचारलं. "कावून बव्हणीच्या ययमाले रिकाम्या चवकशा करता गवारेबुवा? घेणं ना देणं... अन् फुकट तोंड वाजवणं... तुमी कुठी पंखा घेणार हाये आता ? या दिवसात कुठोलचे पैसा असणार हायेत तुमच्याजवळ... हॉऽहॉऽऽ जा बापाऽऽ नाट नका लावू पाह्यटी पाह्यटी!” त्याचं बोलणं ऐकलं अन् विठोबा गवारे तिळपापड झाला. "तुमी व्यापारी लोकं कावून एवढं हलकट समजता पण आमा वावरावाल्यायले? त्याच्या माथं सम्दे जगतात... त्यो पिकवते म्हणूनसन्या समद्यायची खाय- पियाची चंगळ व्हती, अन् त्यालेच हलकट समजता? हे पहा पैसे! पैसे पैसे काय वसणावता? हे पहा पैसे... किती पैसे व्हतात बोला पंख्याचे?” असं म्हणून विठोबा गवारेने त्याच्यापुढे नोटांचं बंडल नाचवलं, तसा दुकानदार एकदम पुढे झाला. त्याच्या खांद्यावर ठेवून म्हणाला, "आहो मी मज्जाक करत व्हतो मालक तुमची... तुमाले त लगी लय राग आला... तुमची बरोबरी का आमाले येणार हाये ? एवढ्या मोठ्या जमीनजुमल्याचे मालक तुमी... आमी काय झिजोल्डे दुकानदार..." असं म्हणून तो पंख्याकडे वळला. कपड्याने पंखा साफ करत मग म्हणाला, "पद्म पहा! कोणता पंखा देऊ? हा हजार रुपयाचा... ह्य बाराशे पन्नास रुपयाचा... ह्य सव्वा तेराशे रुपयाचा... बोला कोणत्या कंपनीचा देऊ?” "ती कंपनी गिंपनी काय समजत नाई आपल्याले... चांगला भारीत भारी द्या मजबूत... गरगर हवा फेकणारा. मच्छरं कुचलून मारणारा.... "तं मंग हा तेराशे पंचवीस वालाच घेऊन जा तुम्ही... थांबा, मी लावून दाखवतो." असं म्हणून दुकानदार पुढे झाला. बोर्डवर पीन लावली. पंखा सुरू केला. चांगली हवा फेकाय लागला. हवेची गती कमी जास्त करून दाखवली. " ही कमी हवा... ही जास्त हवा... तुमाले पाह्यजे तेवी हवा खा! लय जोरदार मॉडेल हाये... टीव्हीवर तं हमेशा जाहिरात येती याची. आवाज तं आजेबात देत नाई..." "ते जावू द्या... यानं मच्छरं झोंबणार नाईत नं?” "आजेबात नाई... याच्यापुढी मच्छरं आलं की बातच्या सात पाणी होवून जाईल त्याचं!” "बस न मंग! द्या हाच!” असं म्हणून विठोबा गवारेनं पैसे मोजून दिले. अन् पंखा खांद्यावर घेवून ऐटीत घराकडे निघाला. त्याच्या खांद्यावर पंखा पाहून लोक आश्चर्यचकित झाले. "नवा आणला का काय ?" "हाव मंग?" "या दिवसात?" "हाव मंग?" रस्त्यावरचे लोक रोवल्यासारखे त्याच्याकडे पाहत रहायचे. काही काही विचारायला पाहायचे. पण विठोबा गवारेजवळ बोलायला, थांबायला वेळ नव्हता. कधी घरी जातो, कधी पंखा लावतो अन् घरातले मच्छर पळवून लावतो असं त्याला झालं होतं. डोळ्यापुढं पंखा गरगरत होता. त्याच्यापुढे मच्छर हेलपाटून इकडं तिकडं गोळामोळा होत होते. त्यातच सुभाष झोरे दिसत होते. मच्छर झाला होता अन् इतर मच्छरासोबत इकडचा तिकडे हेलपाटत होता. (फेब्रुवारी १९९७) निवडक अंतर्नाद १०७