पान:निर्माणपर्व.pdf/229

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एक कामगारांचे राज्य पृथ्वीवर आणू इच्छितो; दुसऱ्याला हवा आहे बलसागर भारत. समाजवाद्यांजवळ असे काय आहे की, ज्यासाठी वर्षानुवर्षे झुरत राहावे, पिढ्यानुपिढ्या झगडत राहावे ? उपेक्षा झाली, अवमान आणि पराभव झाले तरी न खचता, न विकले जाता, कंटकाकीर्ण मार्गाने ध्वज खांद्यावर घेऊन पुढे पुढे जातच रहावे ? एखादा सखोल आत्मप्रत्यय असला, तरच असे सामर्थ्य, हे निश्चयाचे बळ निर्माण होत असते-जे आज या दुभंगलेल्या स्थितीतही पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांजवळ दिसते आहे. हिंदुत्ववादातून निघालेली ही राष्ट्रीय पुननिर्माणाची जबरदस्त प्रेरणा आणि समाजवाद्यांची समतादृष्टी यांचा जनता पक्षात संगम होऊ शकला असता, पण ती संधी हुकली. आताही, वेगळा झालेला जो गट असे दोन्ही पंख विस्तारून झेप घेईल, त्यालाच भवितव्य आहे, हे नीट ओळखूनच पुढची वाटचाल केलेला बरी. केवळ हिंदुत्ववाद, केवळ समाजवाद घेऊन हे गट पूर्वीप्रमाणेच अलग अलग चालत राहिले तर लवकरच दोघेही थकतील, गिळंकृतही होतील. विकेंद्रित अर्थरचना असलेला भारतच बलशाली भारत असू शकतो, हे सत्य हिंदुत्ववाद्यांनी ध्यानात घ्यायला हवे व इतर नव्या-जुन्या जनतापक्षीयांनी, समाजवाद्यांनाही गांधीजींचा मुस्लिम अनुनयाचा, अहिंसा परमोधर्मवादाचा पुनर्विचार करून हिंदुत्ववाद्यांची या क्षेत्रातली ऐतिहासिक कामगिरी मोकळेपणाने मान्य करायला हवी. अशा समन्वयातून जो ध्येयवाद, जी विचारसरणी जो कार्यक्रम तयार होईल त्यात जयप्रकाश-गांधीजी असतील, शिवाजी - राणाप्रतापही असतील; नाही तर काहीच उभे राहू शकणार नाही. गांधीवादी समाजवाद असे या समाज विचारसरणीचे नामकरण करण्यात आलेले आहे; पण एखाद्या व्यक्तिनामापेक्षा सरळ भारतीय समाजवाद असेच का म्हणू नये ? प्रत्येक देशाने आपापल्या परंपरेप्रमाणे, लोकरिवाजाप्रमाणे, नाही तरी, समाजवादाची वेगवेगळी रूपे उत्क्रांत केलेली आहेतच. भारतीय किंवा दंडवते-जनता पक्षीयांनी खेड्यांच्या आधुनिक करणावर आधारलेला, समाजवादाचा नवा विकेंद्रित भारतीय नमुना उत्क्रांत करण्याची मनीषा का बाळगू नये ? नेहरूंनी शहरे वाढवली. जनतावाल्यांनी खेडी मोठी करण्याची, आधुनिक करण्याची आकांक्षा बाळगावी, एवढेच शक्य आहे, आवश्यक आहे. यावर जोर दिला तर देश खूप पुढे जाणार आहे. गांधीजींचा सत्तानिरपेक्ष मानवपरिवर्तनाचा प्रयोग ही फार लांबची गोष्ट आहे. सत्तेचा वापर करून, तिचा उपभोग घेऊन, विकेंद्रित समाजवादाचा पर्याय जरी भारतीय जनता पक्ष म्हणा, नुसता जनता पक्ष म्हणा, सिद्ध दाखवू शकला, तरी उद्याचा भारत त्यांचा ऋणी राहील.

एप्रिल १९८०निर्माणपर्व । २२८