पान:निर्माणपर्व.pdf/228

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ज्याअर्थी पक्ष स्थापन करून निवडणुका लढविणार, सत्ता हस्तगत करू पाहणार, त्या अर्थी गांधी-जयप्रकाशांचा सत्तानिरपेक्ष समाजपरिर्वतनाचा अव्वल व मुख्य वारसा कुठल्याच जनताघटकाला अभिप्रेत नाही हे उघड आहे. जयप्रकाशांनी आपल्या कारागृहातील रोजनिशीत लिहिले आहे-

‘इतिहासाला विचारा की काही वर्षांपूर्वी / बनू शकलो नसतो का पंतप्रधान ? पण मला क्रांतिशोधकाला दुसरेच मार्ग / मान्य होते-हवे होते. मार्ग त्यागाचे, सेवेचे, निर्माणाचे / मार्ग संघर्षाचे, संपूर्ण क्रांतीचे ......'

 आहे का तयारी या मार्गावरून जाण्याची अटलजींची किंवा मधू दंडवत्यांचीही? आज तरी या दोघांनी व त्यांच्या अनुयायांनी या वारशावर आपला दावा सांगू नये. जयप्रकाशांना जो नंबर दोनचा मार्ग वाटत होता तो या मंडळींना नंबर एकच वाटतो आहे. या नंबर दोनच्या मार्गाने जाणारेही समाजाला हवेच असतात, हा भाग वेगळा ! लोकांना चांगले राज्यकर्ते नको आहेत का ? जसे चांगले कारखानदार हवे असतात, चांगले शिक्षक हवे असतात, तसे चांगले राज्यकर्ते, हीही समाजाची एक गरज आहे व ती जनता पक्षाकडून पूर्ण झाली नाही, ही खरी लोकांची तक्रार आहे. फक्त गांधीजी-जयप्रकाशजी, चांगले राज्यकर्ते, राजकारण करणारा कुशल वर्ग, एवढीच समाजाची गरज आहे. यामुळेच समाज परिवर्तित आणि विकसित होणार आहे, असे मानत नव्हते. राज्यकर्त्यांवरही अंकुश ठेवणारी लोकशक्ती, समाजाची आत्मशक्ती जागृत करण्यावर त्यांचा मुख्य भर होता, त्यासाठी त्यांचा जीवनयज्ञ सुरू होता. 'संतो तपसा भूमीं धारयन्ति' हे वेदवचनच जणू त्यांच्या रूपाने समूर्त झाले होते. आयुष्यभर राजकारणात राहूनही 'नाहं कामये राज्यम्' अशी दैनंदिन प्रार्थना त्याशिवाय कशी होऊ शकली असती ? अटलजी, दंडवतेजी यांना तर राज्य हवे आहे, त्यांनी २८ महिने राज्य उपभोगलेही आहे. मग जयप्रकाशांचा, गांधीजींचा दुसरा कोणता वारसा त्यांच्या डोळ्यासमोर आहे असे समजायचे ? विकेंद्रित अर्थ व समाजरचना एवढाच सध्या तरी हा वारसा दिसतो आहे व वेगवेगळे राहून का होईना, तो जरी अटलजी-दंडवतेजी यांनी पुढे नेला तरी इंदिरा काँग्रेसला व कम्युनिस्टांना तो एक चांगला पर्याय ठरू शकेल. एकत्र राहून हे कार्य अर्थातच अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकले असते. एकाजवळ राष्ट्रवादाची स्वयंभू शक्ती व आत्मनिर्भर संघटना होती, दुसऱ्याजवळ समतेची दृष्टी होती. आर्थिक प्रश्नांकडे आजवर तरी हिंदुत्ववाद्यांनी दुर्लक्षच केलेले आहे.दीनदयाळ उपाध्याय हाच काय तो एक सन्माननीय अपवाद. याउलट समाजवाद्यांजवळ नाही आत्मनिर्भरता-जी एखाद्या दृढ श्रद्धेवाचून कधीही निर्माण होत नाही. कम्युनिस्टांजवळ श्रध्दा आहे, तशीच राष्ट्रवाद्यांजवळही आहे.

भारतीय समाजवादाकडे । २२७