पान:निर्माणपर्व.pdf/227

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा गांधी-विनोबा-जयप्रकाशांचा अव्वल वारसा आहे व त्यावर हक्क सांगण्याचा, तो आम्ही पुढे चालवत आहोत हे म्हणण्याचा, आज थोडा फार अधिकार कुणाला पोचत असेलच तर तो फक्त रा. स्व. संघाला आहे. संघ ही सांस्कृतिक संघटना आहे याचा अर्थ ती सत्तेचे राजकारण करीत नाही, एवढाच घ्यायचा आहे. संस्कृती म्हणजे केवळ नाचगाण्यांचे कार्यक्रम नाहीत. राजकीय क्षेत्र हेही संस्कृतीचा एक भाग आहेच. संघाला राजकीय परिवर्तनाची मुळीच आकांक्षा नसती तर पंचवीस साली हेडगेवारांनी काँग्रेस सोडून या संस्थेला जन्म दिलाच नसता व निर्भेळ मानवसेवेचे आपले रामकृष्ण मिशनमधील कार्य सोडून गोळवलगुरुजींनी संघाची सूत्रे आपल्या हाती घेतलीच नसती ! दोन बाबतीत हेडगेवार व सावरकर यांचे गांधीजींच्या काँग्रेसशी त्या काळी मतभेद झाले व मुख्यतः या दोन मुद्द्यांवरूनच हिंदू आणि हिंदी राष्ट्रवाद यांची प्रथम फारकत झाली. पहिला मुद्दा होता गांधीजींनी अहिंसामार्गाला दिलेले सार्वभौम महत्त्व, हा. हेडगेवार-सावरकर यांची सशस्त्र क्रांतिमार्गाची परंपरा होती. स्वातंत्र्यासाठी शक्य आणि योग्य वाटले तर हिंसा सशस्त्र उठाव हे मार्ग हेडगेवारांनी वर्ज्य मानले नव्हते व सावरकर तर पूर्वायुष्यात अग्निगोलकांशी खेळणारे क्रांतिकारकच होते. गांधीजींनी मात्र अगदी भगतसिंगालाही कधी क्षमा केली नाही. दुसरा या दोन राष्ट्रवादांमध्ये मतभेदाचा मुद्दा होता, तो मुस्लिम अनुनयाबाबतचा. अनुनयाने गांधीजी मुस्लिमांना, डोक्यावर बसवत आहेत, हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मार्ग नाही, असे सावरकर- हेडगेवारांचे व त्यांनी प्रतिपादन केलेल्या हिंदुत्ववादाचे म्हणणे होते. या दोन्ही मुद्द्यांबाबत गांधीजी चूक ठरले व हिंदुत्ववाद खरा ठरला असा इतिहासाचा दाखला आहे. ४२ मध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणावर झाले. चळवळीला भूमिगत स्वरूप प्राप्त झाले व या सगळ्याचा निषेध न करण्याइतपत गांधीजींचाही अहिंसाग्रह सैलसर झालेला होता. आपले स्वातंत्र्ययुद्ध सशस्त्र आणि निःशस्त्र, हिंसा व अहिंसा, या दोन्ही मार्गांनी पुढे सरकले व शेवटी जागतिक परिस्थिती अनुकूल झाल्यावर भारत स्वतंत्र झाला. मुस्लिम अनुनयाचे फलित म्हणजे पाकिस्तान. हिंदुत्ववाद नसता तर झालेल्यापेक्षा दुप्पट मोठे पाकिस्तान जीनांनी हिसकले असते. गांधीजींनी तर कोरा चेकच द्यायची तयारी दाखवली होती. या दोन्ही मुद्दयाबाबत पुनर्विचार करावा असे गेल्या तीस चाळीस वर्षांत काय घडले आहे ? उलट अपरिहार्य म्हणून गांधीपरंपरेचा वारसा सांगणाऱ्या जयप्रकाशांनीच नक्षलवादी हिंसाचाराला मान्यता देऊन ठेवलेली आहे. पाकिस्तान झाले तरी मुस्लिम प्रश्न आहे तेथेच आहे. तेव्हा जनता पक्षाच्या वेगळ्या झालेल्या घटकांनी, विशेषत: पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी, आपण जयप्रकाशांचा-गांधीजींचा वारसा चालविणार म्हणजे नेमके काय करणार, याचाही तात्विक ऊहापोह नीट करून लोकांसमोर ठेवला पाहिजे.

निर्माणपर्व । २२६