पान:निर्माणपर्व.pdf/224

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनमुराद उपभोगता कामा नये. अटलबिहारी वाजपेयींसारख्या मोजक्या नेत्यांना याची जाणीव आहे. तुरुंगाची तयारी आणि तळापासून पक्ष बांधणीची निकड या दोन्ही गोष्टींचा त्यांनी निवडणुकीवरील आपल्या प्रतिक्रियेत उल्लेख केला आहे तो सूचक आहे. वावदूकगिरी टाळून, लोकसभेत विरोधी पक्षाची भूमिकाही बजवायची व समर्थ पक्ष बांधणीकडेही लक्ष पुरवायचे, अशी दुहेरी कामगिरी त्यांनी आपल्या डोळ्यांसमोर ठेवलेली दिसते. याचाच अर्थ प्रतियोगी सहकारितेचे टिळकतत्त्व अंमलात आणायचे. इंदिरा गांधी देशहितची जी पावले टाकतील त्यांना जरूर तेव्हा, जरूर त्या प्रमाणात साथ द्यायची. पण आपले स्वतंत्र अस्तित्वही अधिकाधिक बळकट व पायाशुद्ध करण्याची दक्षताही बाळगायची. असहकारही नाही आणि लोटांगणही नाही. जेवढ्यास तेवढे, जशास तसे. डांग्यांचे विश्लेषण बरोबर होते पण आपले स्वतंत्र अस्तित्व जपण्याची व अधिकाधिक प्रभावी करण्याची दुसरी जबाबदारी त्यांनी टाळली. त्यामुळे त्यांची व त्यांच्या पक्षाची पुढे फरपट झाली व ललित नारायण मिश्रांना ‘हुतात्मा' ठरवण्यापर्यंत त्यांना इंदिराचरणी लोळण घ्यावे लागले. इंदिरा म्हणजे फॅसिझम, इंदिरा म्हणजे हिटलर-मुसोलिनी, असा तारस्वर काढण्याचीही लगेच घाई नको आणि असे लोळणही नको. लोकसभेत आणि बाहेरही समर्थ विरोधी पक्षबांधणीला उघड असा पुष्कळ वाव अजूनही आहे. इंदिरा गांधीही मागील अनुभवांवरून काही तरी शिकल्या असतीलच की ! निदान तशी अपेक्षा तरी तूर्त करू या !

जानेवारी १९८०

प्रतियोगी सहकारिता । २२३