पान:निर्माणपर्व.pdf/225

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



भारतीय समाजवादाकडे....




 समाजवादी आणि जनसंघी शेवटी वेगळे झाले. जयप्रकाशांनी लावलेली बाग सध्या तशी पूर्ण उध्वस्त झाली. विचारांपेक्षा माणसे भावनावर, पूर्व ग्रहांवर जगत असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कार्यक्रमाबाबत, ध्येयधोरणांबाबत मतभेद झाले आणि हे दोन गट वेगळे झाले, जनता पक्ष फुटला, असे घडले नाही. समाजवाद्यांना भय वाटे की, जनसंघ गट संख्येच्या बळावर पक्षाचा आज नाही उद्या ताबा घेणार आणि जनसंघीयांना समाजवाद्यांचा बौद्धिक सासुरवास नकोसा वाटला. आपल्या पूर्वग्रहांवर, द्वेषमत्सरावर ही मंडळी मात करतील आणि काँग्रेसला एखादा समर्थ पर्याय दहापाच वर्षांत उभा राहील, अशी, हा जनता पक्षाची बाग लावताना जयप्रकाशांना आशा वाटत होती; ती आता पूर्ण मातीला मिळाली आणि गाडी आता पुन्हा मूळ ७१।७२ च्या सुमारास होता त्या मुक्कामावर आली. सर्वंकष इंदिरा शासन आणि तीन-चार विरोधी गट, असे ७१।७२ मध्ये होते, तसे राजकीय चित्र आता तयार झालेले आहे. सिंडिकेट काँग्रेसची जागा अरस काँग्रेसने घेतली. जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. समाजवाद्यांच्या हाती जनता पक्ष;आणि भालोदचे नवे नाव आहे लोकदल कम्युनिस्ट त्या वेळीही अलग होते, तसेच आजही आहेत. आणीबाणी आणि जयप्रकाशांसारखे सर्वमान्य नेतृत्व यामुळे ७१।७२ चे चित्र ७७ ला बदलले; तशीच समान सर्वव्यापी संकटाची स्थिती आणि एखादा सर्वमान्य नेता उदयास आल्याशिवाय आजचेही चित्र बदलेल असे दिसत नाही. राजकीय फुटीरपणा हा एकूण आपला स्थायीभाव दिसतो. क्वचित प्रसंगीच एखादा देशव्यापी राजकीय पर्याय उभा राहतो. काँग्रेस ५०।७५ वर्षे एक राहिली ती पारतंत्र्याच्या समान व सर्वव्यापी संकटामुळे व टिळक-गांधी-नेहरू यांच्या विभूतिसमान नेतृत्वामुळे व्यक्तिगत रागलोभ, द्वेषमत्सर, निरनिराळ्या गटांचे स्वार्थ, या दोन घटकाच्या मिश्रणामळे तयार झालेल्या रसायनात वितळून जातात व देशव्यापी एकत्व टिकून राहते. हे दोन्ही घटक जनता पक्षाजवळ उरले नाहीत. आणीबाणी संपली. जयप्रकाश लांब राहिले किंवा त्यांना लांब ठेवले गेले आणि मिळालेली सत्ता टिकवून धरण्यासाठीसुद्धा एकत्र राहिले पाहिजे, हा शहाणा व व्यवहारी स्वार्थ पाहण्याइतकीही ही मंडळी शुद्धीवर राहिली नाहीत.

निर्माणपर्व । २२४