पान:निर्माणपर्व.pdf/212

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'अमळथे येथे चार महिन्यांपूर्वी दलित, आदिवासी, कोळी यांच्या ५० एकरातील ४०० पोती दादर (ज्वारी) कापून लुटली गेली. हे दुष्टकृत्य आठ दिवस चालले होते व पोलीस फक्त साक्षीदाराची भूमिका बजावीत होते. याशिवाय रु. ८००० चा कडबाही लुटण्यात आला व ३०० गुरे उरलेल्या शेतात चारण्यात आली. या अत्याचाराची नुकसानभरपाई मिळावी असा करार महसूलमत्र्यांसमक्ष झाला होता; पण तीन वेळा तारखा ठरूनही त्या मोडण्यात आल्या व नुकसान भरपाई देणार नाही, अशी भाषा सुरू झाली. वर गावात आदिवासी, दलितांवर खोट्या केसेस करणे, त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू झाले. म्हणून (१) नुकसान भरपाई मिळावी. (२) दलितांना संरक्षण मिळावे यासाठी हा मोर्चा आयोजिला होता.'

 अमळथा व सिंदखेडा अंतर पाच मैलांचे आहे. अमळथ्याहून दलितमंडळी सकाळी ८-८।। च्या सुमारास पायी सिंदखेड्याला जायला निघणार होती. सुरुवातीसच सिंदखेडा मोर्चातील या प्रमुख अमळथा तुकडीला प्रतिबंध करावा, मोर्चातील हवाच काढून घ्यावी, असा काही तरी कट शिजला असावा. कारण अमळथ्याला सकाळी सकाळीच बंदोबस्तासाठी पन्नासएक जणांची खास पोलिसपार्टी एरवी दाखल व्हायचे काही कारण नव्हते. पूर्वतयारीसाठी ग्राम स्वराज्य समितीचे प्रभाकर बिरारी व उल्हास राजज्ञ हे दोघेजण आदल्या रात्रीपासून अमळथ्यालाच मुक्काम टाकून होते. त्यांना पोलीसपार्टी घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांनी सकाळी उठता-उठताच शाळेसमोरच्या पटांगणात बोलावून घेतले. मोर्चाबाबत काही सूचना अटी वगैरे सांगण्यासाठी हे बोलावणे असेल असे वाटल्यावरून हे दोघेजण आणखी कुणाला बरोबर न घेता तसेच पोलीसअधिकाऱ्यांसमोर दाखल झाले. एकाचे तर तोंडधुणेही झालेले नव्हते. अधिकाऱ्यांपैकी बनकर यांनी एकदम दमदाटीची भाषा सुरु केली व शांतताभंग होतो म्हणून या दोघांना अटक करण्यापर्यंत मजल गाठली. 'आम्हाला मंत्र्यांचे आदेश आहेत' वगैरे मुक्ताफळेही उधळली जात होती. अटक केल्यावर या दोघांना शाळेच्या एका खोलीकडे नेण्यात आले. नेताना पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धक्के मारले. उल्हास राजज्ञ याने धक्के मारण्याच्या या कृतीला हरकत घेतली व ' हे थांबले नाही तर मी येथेच उपोषण सुरू करीन!' सक्रीय निषेधही नोंदवला. त्यांना खोलीत डांबून अधिकारी जेमतेम बाहेर येतात, तो पटांगणात दलित आदिवासींचा जमाव ! उल्हास व प्रभाकर यांना अटक झाल्याची बातमी दलितवस्तीत पोचली होती आणि सन्याभाऊ भिल याने सगळ्यांना एकत्र करून शाळेवर त्यांच्या सुटकेसाठी मोर्चाच आणून उभा केला होता. अधिकारी गडबडले. मोर्चाने घोषणा देण्यास सुरुवात केली. अधिकारी बुचकळ्यात पडले. मोर्चा उल्हास-प्रभाकरला ठेवले होते त्या खोलीच्या दारावर गर्दी करू लागला. 'आम्हाला अटक करा नाही तर या दोघांची सुटका

अमळथे । २११