पान:निर्माणपर्व.pdf/211

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दलितांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ती ज्यांनी त्यांच्या शेतात गुरे घालून, पिके कापून लुटून नेली, त्यांच्याकडूनच दिली गेली पाहिजे, अशी न्याय्य भूमिका त्यांनी घेतली व शेवटी पाटीलमंडळींना ती मान्य करावी लागली.

 लेखी करार झाला तो असा -

 १. गुरचरण जमिनीत शेती करणाऱ्या लोकांना नियमाप्रमाणे जमीन मिळावी.
 २. नुकसान भरपाईची मोजणी करून जेवढे नुकसान झाले असेल तेवढी नुकसान भरपाई मिळावी. कडब्याची भरपाई रोख रकमेत द्यावी.
 ३. नुकसान भरपाई मोजणी सोमवारी होईल.
 ४. महिन्याच्या आत नुकसान भरपाई द्यावी.

 उत्तमरावांसोबत धुळे जिल्ह्याचे जनता पक्षाचे अध्यक्ष श्री. दशरथ पाटील होते. सिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री. ठाणसिंग पाटील होते. या दोघांच्या व जयसिंग पाटील यांच्या करारावर सह्या आहेत. समितीतर्फे उल्हास राजज्ञ व प्रभाकर बिरारी यांनी सह्या केल्या.

 १० फेब्रुवारी ते १० मार्च या कराराच्या मुदतीत जयसिंगरावांच्या मंडळींनी कसलीच हालचाल केली नाही. म्हणून १० मार्चनंतर समितीचे कार्यकर्ते पुन्हा कामाला लागले. कलेक्टरांना भेटले. उत्तमरावांशी संपर्क साधण्यात आला. पण काहीही उपयोग झाला नाही. यातूनच प्रकरण चिरडीला गेले आणि दलित मंडळी सिंदखेड्याला-तालुक्याच्या ठिकाणी मोठा मोर्चा नेण्याची तयारी करू लागली. मोर्चाची तारीख ठरली २१ मार्च.

 त्या दिवशी सकाळीच अमळथ्याला पोलीस व दलित यांच्यात एक जोरदार चकमक उडाली. कार्यकर्त्यांना अटक, उपोषण, सुटका, मारहाण, धाकदपटशा, दलितांनी संघटित होऊन केलेला प्रतिकार, एका सबइन्स्पेक्टरला बायांनी दिलेला चपलेचा प्रसाद ... सर्व प्रकार यथास्थित झाले ....

 मोर्चा २१ तारखेला निघाला. अमळथ्याप्रमाणेच आसपासच्या गावातून दलित-आदिवासी मंडळी मोठ्या संख्येने सिंदखेड्याला सकाळपासूनच जमू लागला होती. मोर्चा प्रथम गावातून फिरला व शेवटी तहसीलदार कचेरीवर सभा होऊन विसर्जित झाला. मोर्चा मोठा तसा बंदोबस्तही मोठा होता. सुमारे दोन हजार लोक मोर्चात सहभागी झालेले होते. समितीने आपल्या निवेदनात म्हटल आहे-

निर्माणपर्व । २१०