पान:निर्माणपर्व.pdf/213

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करा !' अशी मोर्चाने मागणी केली. दारावर रेटारेटी झाली. काही लोक आत घुसले व त्यांनी उल्हास व प्रभाकरभोवती कडे केले. पोलीस दारावर लोकांना अडवीत होते. लोक आत अधिकाधिक संख्येने घुसतच होते. मारामारीपर्यंत पाळी आली. मोर्चेवाल्यांना पोलिसांचा मार खावा लागला. उलट मोर्चातील बायकांनी पोलिसांनाही-अगदी त्यांच्या वरिष्ठांनाही चपलेचे पाणी दाखवले. या सर्व १००-१२५ प्रक्षुब्ध लोकांना अटक करून प्रकरण अधिक चिघळवायचे, की उल्हास व प्रभाकर यांना सोडून देऊन माघार घ्यायची, असा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. शेवटी माघार घेणे शहाणपणाचे आहे असा निर्णय घेऊन त्यांनी प्रभाकर व उल्हासची सुटका करून टाकली. थोडी दमदाटी करून, कार्यकर्त्यांना २-४ तास अटकेत ठेवून मोर्चाचा बेत मुळातच उखडून टाकता येईल, ही कल्पना साफ धुळीला मिळाली. उल्हास, प्रभाकर व समितीचे अन्य कार्यकर्ते यांनी अमळथ्याला दलितवस्तीत गेल्या १-२महिन्यात जे पेरले होते ते व्यवस्थित वेळेवर उगवले होते. त्यांना अटक झाली हे कळताच उत्स्फूर्तपणे अवघी दलितवस्ती त्यांची सुटका करण्यासाठी शाळेवर चालून जाते, पोलिसांशी झटापटी करण्याइतका धीटपणा दाखवू शकते, त्यांची सुटका न झाल्यास त्यांच्यासोबत स्वतःलाही अटक करवून घेण्यासाठी पुढे सरसावते व अखेरीस त्यांची सुटका करण्यास पोलीस अधिकाऱ्यांना भाग पाडू शकते, हे यश शेवटी या कार्यकर्त्यांच्या श्रमाचेच म्हटले पाहिजे. अमळथ्याच्या दलितांनी असे यश पूर्वी कधीही अनुभवले नव्हते. अमळथा गावानेही पूर्वी कधी अशी चकमक पाहिलेली नव्हती.

 कार्यकर्त्यांची सुटका झाल्यावर दलितमंडळी वस्तीकडे परत न फिरता शाळेच्या पटांगणातून तशीच परस्पर सिंदखेड्याकडे मोर्चाने निघाली. १-२ जण भाकऱ्या आणण्यासाठी परतले. ते वस्तीत जाऊन, भाकऱ्या गोळा करून मोर्चाला नंतर थोड्या वेळाने मिळणार होते; पण इथेच घोटाळा झाला. ते एकटे सापडले आहेत असे पाहून त्यांच्यापैकी एकावर, झिपा गणा कोळी याच्यावर, 'घे नुकसान भरपाई !' म्हणून दिवसाढवळ्या, पोलीसपार्टीच्या देखतच काठ्यांनी हल्ला चढविण्यात आला. एका लहान मुलाने धावत जाऊन मोर्चातील लोकांना ही बातमी सांगितली. मोर्चा तोवर गावाबाहेर पडून दोन-एक फर्लाग पुढे गेलेला होता. बातमी कळल्यावर सर्व मोर्चाने तोंड फिरवून गावाकडे धाव घेतली. पुढची हकीकत समितीने तयार केलेल्या व शासनाकडे पाठवलेल्या निवेदनावरूनच समजून घेणे चांगले. निवेदन सांगते-

 'मोर्चेकरी गावात आल्याबरोबर त्यांनाही काठ्यांचे तडाखे बसण्यास सुरुवात झाली. आदिवासी गोंधळून गेले व मार खात राहिले. ही धुमश्चक्री व काठ्यांचे हल्ले थांबावे म्हणून कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.बिरारी यांनी

निर्माणपर्व । २१२