पान:निर्माणपर्व.pdf/208

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मग हा संघर्षाचा प्रसंग अचानक कसा उद्भवला ? वीस वर्षांच्या वहिवाटीला यंदाच एकदम आव्हान का दिले गेले ? गुलाबराव पाटील ( पवार ) गेले. त्यांचे चिरंजीव जयसिंगराव पाटील व गावातले त्यांचे सधन सहकारी, सरपंच दिलीप गबाजी पाटील वगैरे मंडळींनी यंदाच एकदम आक्रमक धोरण स्वीकारण्याचे कारण काय ?

 गावात दोन पार्ट्या आहेत. यापैकी एका पार्टीचे नेतृत्व जयसिंग पाटील(पवार) करतात. हे धुळ्याला राहतात, पण गावातली राजकारणेही चालवतात. दिलीप गबाजी हे त्यांचे सहकारी जमीनदार गावचे सरपंच आहेत. म्हणून या पार्टीला सरपंच पार्टी म्हटले जाते. चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. तारीख २५ डिसेंबर १९७८ या दिवशी संध्याकाळी शाळेसमोरच्या मैदानावर एक बैठक झाली. या बैठकीला सरपंच पार्टीचे १५०-२०० लोक हजर होते. जमीनवाले १०-१२ दलितही बोलावले म्हणून आले होते. अतिक्रमणांबद्दल समज देणे हा बैठकीचा उद्देश होता. गुरेचरणाला जमीन कमी पडू लागली होती. दलितांचे म्हणणे होते, ही चर्चा पुढच्या वर्षी सुरुवातीला करू. त्यावेळी नियमाप्रमाणे, सरकारी परवानगी मिळेल तेवढ्या जमिनीच नांगरू. यंदा पिके उभी आहेत. ती आम्हाला मिळू द्या. आम्ही कष्ट-मशागती केलेल्या आहेत. वाटल्यास थोडीफार रक्कमही यासाठी आम्ही भरायला तयार आहोत. दलितांनी तीन हजार रुपये भरण्याची तयारी दाखविली. सरपंच पार्टीने पाच हजारांची मागणी केली. झोपडू दगा सोनावणे दलितांची बाजू मांडीत होता. गावचे पोलीसपाटीलही त्याला साथ देत होते. पण सरपंच पार्टी आकडा कमी करायला किवा मुदत वाढवून द्यायलाही तयार नव्हती. मुदत. फक्त बारा तास. दुसऱ्या दिवशी, सूर्योदयापूर्वी पाच हजार रुपये दलितमंडळीकडून अपेक्षित होते. बारा तासात १०-१२ दलित एवढी रक्कम कशी उभी करू शकणार ? बैठक मोडली.

 दुसऱ्या दिवशी सकाळीच दलितांच्या जमिनीत गावची ३००।४०० गुरे घुसवण्यात आली. कणसाला आलेले उभे भरघोस पीक उद्ध्वस्त करण्यास सुरुवात झाली.

 दलितांनी अडथळा केला. विनवण्या केल्या. वर्षभर खाण्यापिण्याचे हाल होतील म्हणून मनधरणी करून पाहिली. पण काही परिणाम झाला नाही. नासाडीचा सामुदायिक कार्यक्रम चालूच राहिला.

 बळीराम तानका कोळी व आणखी १-२ दलित तालुक्याच्या गावी सिंदखेड्याला तक्रार नोंदवण्यासाठी धावले. तेथे पोलीसठाण्यावर नेहमीचा अनुभव. कुणी दाद घेतली नाही. धुळ्याचे एक वकील तेथे कामानिमित्त आले होते. त्यांनी लक्ष घातले म्हणून तक्रार नोंदली तरी गेली. नंतर पुढची हालचाल. दोन पोलीस रवाना झाले. ते अमळथ्याला पोचेपर्यंत संध्याकाळ झालेली होती.

अमळथे । २०७