पान:निर्माणपर्व.pdf/207

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पौर्णिमा नुकतीच उलटलेली होती...चंद्रमाधवी प्रसन्न होती. सकाळी जाग आली ती गाईवासरांच्या, बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाजाने. प्रत्येक घरासमोर एखाददुसरे जनावर तरी बांधलेले होते. एकूण वसती १५-२० घरांची. दोन समांतर रांगा. मधे रुंद वाट. नदी जवळच-सुमारे अर्ध्या मैलावर. नदीच्या काठावर या दलितमंडळींच्या जमिनी आहेत. जमिनी चांगल्या. वर्षातून दोन पिके देणाऱ्या. शिवाय तापीकाठ असल्याने कलिंगडे, खरबुजे यांच्या जोडउत्पन्नाचीही अधूनमधून सोय. घरेही मातीची असली तरी बऱ्यापैकी धड होती. खूपच स्वच्छ. आमचा ज्या १-२ घरात आदल्या दिवशी वावर होता ती तर शेणाने चांगली सारवलेलीही. ओटीवर २-३ फोटो. एक आंबेडकरांचा हमखास. आणखी एखादा देवीचा, शंकर-विष्णूचा वगैरे. मंडळी आंबेडकरांना मानणारी, पण बौद्ध न झालेली. दीक्षा अद्याप कुणी घेतलेली नाही. वसती गावापासून वेगळी असली तरी तुटलेली नाही, फार लांबही नाही. मध्यभागी असलेल्या विहिरीवर पूर्वी प्रत्येक जातीसाठी वेगवेगळी कुंडे होती. धोबी, आदिवासी, मांग, महार यांची चार व पाटील मंडळींचे पाचवे. पण वीस-पंचवीस वर्षांपूर्वीच ही वेगवेगळी कुंडे समारंभपूर्वक फोडण्यात आली. पाटीलमंडळींनी त्या वेळी त्याला विरोध केलेला नव्हता. मांगाचे एकच घर गावात आहे. तो अजून वेगळे पाणी भरतो असे कळले.गुलाबराव पाटलांचे नाव खूप ऐकू आले. आता ते हयात नाहीत, पण ते होते तोवर गावावर त्यांचाच दरारा-अंमल होता. ते प्रसंगी मारझोडही करीत, पण गावात त्यांनी कुणालाही उपाशीही राह दिले नाही. हरिजनांनाही त्यांचा खूप आधार वाटे. अडीअडचणीला, लग्नकार्याला गुलाबराव पाटील त्यांच्या पाठीशी उभे असत. सुरक्षितता आणि त्याबरोबर अपरिहार्यपणे येणारी गुलामी ! नेहमीचे द्वंद्व! गावगाडा चालू होता.

 या गुलाबराव पाटलांनीच ५८-५९ च्या सुमारास नदीकाठची, सरकार मालकीची, गुरांना चरण्यासाठी असलेली राखीव-मोकळी जमीन हरिजनांना लिलावाने दिली. भाड्याने औते वगैरे घेऊन हरिजनांनी ती पिकवली. पुढे हाच क्रम सुरू राहिला. गेली जवळजवळ वीस वर्षे या जमिनी हरिजन-दलित यांच्याकडेच आहेत. मुळात हे सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण. पण आता ते रुळल्यासारखे झाले आहे. काहींची नावेही मालक म्हणून नोंदली गेलेली आहेत. एकूण ७०-८० एकर अशी अतिक्रमित जमीन आहे. त्यांपैकी सुमारे १५ एकर जमिनीवरचे अतिक्रमण आतापावेतो कायदेशीर झालेले आहे, बाकीचेही नवीन सरकारी आदेशाप्रमाणे होण्याच्या मार्गावर आहे.

निर्माणपर्व । २०६