उल्हास घरच्यातलाच एक असावा असा येथे मिसळलेला दिसला. जो तो ‘उल्हासभाऊ',' उल्हासभाऊ' करीत त्याला काही तरी सांगू पाहत होता. पंधरा-वीस मिनिटात सारी वसतीच ओसरीवर जमली. दोन-चार बायाही आल्या. आम्ही पाणी वगैरे पिऊन थोडे ताजेतवाने होतो न होतो, तोच दोन एल.आय.बी. वालेही हजर झाले.
दोन-तीन आठवड्यांपूर्वी दलितवस्तीत संतोषीमातेचा उत्सव साजरा झालेला होता. त्यावेळीही ३७ वे कलम जारी होते; पण दलितांचा आग्रह पाहून उत्सव साजरा करण्याची त्यांना खास परवानगी देण्यात आली होती. बंदोबस्तात मात्र दुप्पट वाढ झाली होती. शेवटी संतोषीमातेच्या मिरवणुकीत दलितांपेक्षा पोलिसांचीच संख्या अधिक उठून दिसली.
आजचा रागरंगही तसाच असावा. दलितांनी आदल्या दिवशी सिंदखेड्याला जाऊन आंबेडकर-जयंतीच्या मिरवणूक-सभेची खास परवानगी मिळवली होती. तो परवानगीचा कागद गोविंदरावांनी मागवला व वाचून खात्री करून घेतली.
एल.आय.बी.वाले असल्याने फार काही बोलणे होऊ शकले नाही. त्यांनाही सामील होता येईल अशा गप्पाटप्पा-ओळखी झाल्या. मिरवणूक केव्हा कशी काढणार याची माहिती घ्यायला आले असावेत. ऊन कमी झाल्यावर सर्व कार्यक्रम सुरू होणार म्हटल्यावर ते परत गेले. आम्हीही जेवायचा निरोप आला म्हणून बैठक आटोपती घेतली.
तो संबंध दिवस मग गडबडीतच गेला. मिरवणूक-सभा वगैरे सर्व कार्यक्रम शांततेने पार पडले. रात्री झोप केव्हा लागली ते कळलेदेखील नाही. बरीचशी माहिती ऐकली होती, काही पाहिले होते. सलग चित्र मात्र तयार झालेले नव्हते. निखळलेले संदर्भ, दुवे बरेच होते.
गोविंदरावांनी निघण्यापूर्वी सांगितले होते, या दलितमंडळींवर गावातील जमीनदारांचा बहिष्कार आहे. त्यांना गेले दोन महिने काम नाकारण्यात आले आहे. तरी पण मंडळींच्या चेहऱ्यांवर हलाखीची चिन्हे उमटलेली दिसत नव्हती. उलट उत्साह होता; पण त्यातही कुठे अतिरेक, आरडाओरड नव्हती. रडारड तर मुळीच नाही. साधी, छान, सरळ माणसे आपली दु:खे, आपल्यावरचा अन्याय,अगदी आपल्याला झालेली शारीरिक मारहाणसुद्धा सहजतेने सांगून मोकळी होणारी. यांपैकी कशाचेही त्यांना भांडवल करता आले असते; पण तेवढी त्यांची 'प्रगती' झालेली दिसली नाही किंवा त्यांना लाभलेल्या नेतृत्वाचाही हा परिणाम असावा. काही का असेना. दुपारी ही भेटल्यावर उन्हाचा त्रास एकदम कमी झाला. रात्री झोप छान लागली. चांदण्यानेही मजा आणली.