पान:निर्माणपर्व.pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लागते. त्यांनी प्रार्थना वगैरे काही केली नाही किंवा करा म्हणूनही कुणाला सांगितले नाही. प्रार्थना म्हणजे काही तरी ‘मागणे' आलेच. 'अपेक्षा' प्रार्थनेत असतेच. विनोबांनी याउलट 'रामकृष्णहरी'चे स्मरण करा एवढेच फक्त कळविले. मरण अटळच असेल तर ते योगियाचे असावे, हा यातला भावार्थ. श्रेष्ठ भारतीयाचे याहून कुठले थोर भाग्य असू शकते? तो हे जग सोडून जातो, जसे तुकाराममहाराज गेले तसा. कार्यभाग आटोपला. निघाले ‘आपुल्या गावा, आमुचा रामराम घ्यावा' म्हणत. असेच रामदास आणि एकनाथ गेले, ज्ञानेश्वर-शंकराचार्य गेले. 'वीर पहावा रणी । महात्मा मरणी ।' असे म्हणतात ते यासाठी. जे. पी. केवळ ‘लोकनायक' असते, ‘नेते' असते तर कदाचित विनोबांनी त्यांना या श्रेष्ठ भारतीय आदर्शाची आठवण करून दिलीही नसती; पण जे. पी. नि:संशय त्याहून अधिक आहेत. म्हणून विनोबांची अपेक्षाही अधिक. मरण येणारच असेल तर त्याचे योग्याच्या महानिर्वाणात रूपांतर होऊ द्या. करायचे ते सर्व करून झाले. सांगायचे ते अनेकदा सांगून झाले. आता फक्त रामकृष्णहरी...काया सारी ईश्वराधीन. ‘औषधं जान्हवीतोयं । वैद्यो नारायणो हरिः' अशी शांत-निवांत अवस्था. खरोखर अशी अवस्था यायला भाग्यच लागते. जेव्हा केव्हा वेळ आणि काळ येईल तेव्हा जे. पीं.ना हे भाग्य लाभो !...

३१ मार्च १९७९

जसलोक-जत्रा । २०३