पान:निर्माणपर्व.pdf/205

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अमळथे
 दोन-चार दिवसांपूर्वीच ' लोककथा ७८' पाहिले होते. हा नाट्यानुभव, सादर करणाऱ्या रत्नाकर मतकरींशी त्याबाबत थोडीफार चर्चाही झालेली होती ..

 शहाद्याहून गोविंदराव शिंदे आले. त्यांनी अमळथ्याची हकीकत प्रत्यक्षच सांगितली.

 पण ऐकणे आणि पाहणे यात फरक असतो. म्हणून निघालो.


 १४ एप्रिल. अमळथ्याला दुपारी पोचलो. असह्य ऊन. कशीबशी वसती गाठली. गावातून वसतीची वाट होती; पण एखादे माणूसही बाहेर वावरताना दिसले नाही. पाचपन्नास गुरांचा घोळका विहिरीजवळ विसावला होता. उन्हाळ्यामुळे सगळीकडे अगदी सामसूम. ३०-३५ जणांची पोलीसपार्टी गावात बंदोबस्तासाठी आहे, असे गोविंदरावांनी सांगितले होते; पण उन्हानेच त्यांच्यावर अंमल बसवलेला असावा. कुठेतरी गप्पगार पहुडलेले असतील बहुधा. आंबेडकर जयंतीचा दिवस. कुठेतरी, कसलीतरी हालचाल दिसायला हवी होती. ३७ वे कलम जारी असूनही दलितमंडळींनी गावात मिरवणूक वगैरे काढायचे ठरवलेले होते, हे आम्हाला धुळ्याला असतानाच कळले होते; पण गावात-वसतीत पोचताना तरी हालचाल, जमवाजमव काही दिसली नाही. बाहेर ऊन, माणसे घरोघर निपचित-निवांत. दलितवस्तीतही कसलीच धावपळ नाही. जिकडे-तिकडे सामसूम.

 उल्हास बरोबर होता. त्याला पाहिल्यावर मात्र वातावरण एकदम बदलले. कुणी बॅगा-पिशव्या आमच्या हातातून घेण्यासाठी पुढे आले, कुणी इतरांना हाका मारल्या. पटापट माणसे, तरुण मुले गोळा होऊ लागली. एका ओसरीवर बसायचे ठरले. लगेच खाटली आली. सतरंज्या-गोधड्या अंथरल्या गेल्या.

निर्माणपर्व । २०४