पान:निर्माणपर्व.pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केवळ 'प्रतीक्षा करीत राहिली असतील, तर गलथानपणाचा हा एक नवा पुरावाच मानायला हवा. बहिष्कार टाकण्यात निदान तेजस्वीपणाची झाक तरी आहे. सहा जनता नेते इंडियन ऑईल कंपनीच्या गेस्ट हाउसमध्ये ‘प्रतीक्षा' करीत बसलेले आहेत, यात एका प्रांताचे मुख्यमंत्री असलेले कर्पूरी ठाकूरही आहेत, हे दृश्य मात्र फारच केविलवाणे आहे. पवारांचा खुलासा म्हणूनच स्वीकारावासा वाटत नाही. मधु लिमयांनी तरी निदान' हो, आम्हाला बहिष्कारच अभिप्रेत होता' असे ठणकावून का जाहीर करू नये? ते खूप स्पष्टवक्ते नाही तरी आहेतच.


 जयप्रकाशांना जसलोकमध्ये आणल्यावर नेत्यांची तिथे जी भाऊगर्दी उसळली, काहींनी तिथे 'ठिय्या' मांडून जी अडचण केली, त्याबद्दल नाराजी व टीका, महाराष्ट्र टाइम्ससारख्या प्रमुख वृत्तपत्रातून आलेली आहे. पण अशी गर्दी कमी करण्याचा उपाय या टाइम्ससारख्या वजनदार वृत्तपत्रांच्या हातीच असतो, हे कसे ध्यानात घेतले जात नाही ? पहिल्या दिवसापासून वृत्तपत्रांनी प्रचंड मथळे देऊन, छायाचित्र टाकून, या विषयाला भरपूर व सविस्तर प्रसिद्धी दिली. जसलोक हे त्यामुळे प्रसिद्धीचे ठिकाण साहजिकच बनले. मग नेतेमंडळी तेथे गर्दी करणार नाही हे शक्य तरी आहे काय ? कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर नेऊन हास्यास्पद करून सोडण्यात भारतीयांचा हातखंडा आहे. वृत्तपत्रांनी जे. पींं. च्या जसलोक मुक्कामाला प्रमाणाबाहेर प्रसिद्धी दिली, त्यामुळे नेत्यांची आवकही वाढली. सगळ्यांनी यायची खरोखरच गरज होती का ? हा आला म्हणून तो आला आणि प्रसिध्दी मिळते,नाव फोटो येतो, म्हणून आणखीही येत राहिले. दिल्लीतले १/२ प्रमुख नेते, जवळचे एस्. एम् , चंद्रशेखरांसारखे अनुयायी, नातेवाईक एवढ्यावर काम भागू शकले असते; पण हरियानाचे मुख्यमंत्री कशाला? नको तेवढे नेते येऊन पायधूळ झाडून गेले. नेते येत राहिले, म्हणून बाहेरची गर्दीही वाढली. फरक एवढाच की गर्दी स्वखर्चाने आली. नेत्यांचा येण्याजाण्याचा, राहण्याचा मात्र सरकारी तिजोरीतून झाला ! जे. पींना सरकारी खर्चाने भेटण्याची सोय व संधी उपलब्ध नसती, तर यापैकी कितीजण पदरमोड करून आले असते हा एक न विचारता येण्यासारखाच प्रश्न आहे. हा नेत्यांचा गोंधळ कमी होता म्हणून की काय, अनुयायांनी 'प्रार्थने'चा कार्यक्रम रेटला. हे भावनाप्रदर्शन रुग्णालयातच करणे आवश्यक होते का ? अशा प्रार्थनांनी जे. पीं.ना बरे वाटेल ही समजूत तरी एक अंधश्रद्धाच नाही का ? जे धार्मिक आहेत त्याचा प्रश्नच नाही; पण जे निधार्मिक, सेक्युलर वगैरे आहेत, त्यांनीही या प्रार्थना-कार्यक्रमात सहभागी व्हायचे काय कारण होते ? परिपूर्ण धार्मिक आणि सखोल अध्यात्मिक असलेले विनोबाच मग या सगळ्यांपेक्षा वेगळे आणि श्रेष्ठ ठरले असे म्हणावे

निर्माणपर्व । २०२