बहिष्कार टाकला हे वृत्त खरे नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, ही सर्व मंडळी इंडियन ऑइलच्या गेस्ट हाउसवर भोजनासाठी एकत्र जमली होती. पंतप्रधानांना विमानतळावरून घेऊन आम्ही हेलिकॉप्टरने जाणार आहोत आणि हे हेलिकॉप्टर या गेस्ट हाउसवरून जाणार असल्याने, त्याचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. 'तो आवाज ऐकला की, तुम्ही जसलोककडे निघा' असे आपण या नेतेमंडळींना सांगून ठेवले होते. तथापि, ऐन वेळी आम्ही हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने ‘जसलोक' कडे आलो. त्यामुळे हेलिकॉप्टरचा आवाज येण्याचा प्रश्नच उद्भवला नाही! ही सर्व नेतेमंडळी गेस्ट हाउसवर हेलिकॉप्टरच्या आवाजाची प्रतिक्षा करीत बसली. दरम्यान पंतप्रधान व मी (पवार) जसलोकमध्ये आलो. अर्थात तेव्हा ही नेतेमंडळी रुग्णालयात हजर नव्हती. त्यामुळे त्यांनी 'बहिष्कार टाकला, हे म्हणणे योग्य नाही.' (लोकसत्ता दि. २५ मार्च)
या नेतेमंडळींनी पंतप्रधानांच्या जसलोक भेटीवर उघडउघड ‘बहिष्कार' असता तर त्यात वावगे, आक्षेपार्ह काहीच नव्हते. पण हेलिकॉप्टरची घरघर ऐकू न आल्याने घोटाळा झाला, हा या जनता नेत्यांच्या गबाळेपणाचा एक रोकडा पुरावाच म्हटला पाहिजे. पवारांचा हा वरील खुलासा खरा मानला तर काही अगदी प्राथमिक शंका उपस्थित होतात. (१) खुलासा पवारांनी का करावा? चंद्रशेखर, एस्. एम्. यांनी करायला हरकत नव्हती. (२) चंद्रशेखरांनी अगोदर केलेला एक खुलासा वेगळाच आहे. ते मोरारजी यायच्या वेळेला म्हणे भोजन व विश्रांतीसाठी गेलेले होते. जयप्रकाशांसाठी ते मुख्यतः आलेले असल्याने पंतप्रधानांसाठी आपल्या कार्यक्रमात बदल करण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. यात उघडउघड ‘बहिष्कार' नसला, तरी राग-निषेध जरूर डोकावतो व तो स्वाभाविक व स्वागतार्हही ठरायला हरकत नाही. पण मग जसलोकमधून राजकीय विषयावर मुलाखती-मतप्रदर्शन करण्याचेही या मुक्कामात तरी त्यांनी टाळायला हवे होते. शिवाय पवारांचा हेलिकॉप्टर-खुलासा, या चंद्रशेखरांच्या भोजनकार्यक्रमाशी जुळत नाही, ते वेगळेच. (३) विमानतळावरून हेलिकॉप्टरऐवजी मोटारीने यायचे ऐनवेळी ठरले असे पवार म्हणतात. मग हा कार्यक्रमातील बदल कुणाच्यातरी मार्फत विमानतळावरून फोन करून इंडियन ऑईल गेस्ट हाऊसमध्ये, हेलिकॉप्टरच्या घरघरीची प्रतीक्षा करीत बसलेल्या नेतेमंडळींना कळवणे पवारांना आवश्यक वाटले नाही का ? (४) पवारांनी समजा नाही कळवले तरी ही नेतेमंडळी घरघरीची वेळ टळून गेल्यावर स्वस्थ कशी काय बसून राहिली? त्यांनी विमानतळाशी फोनवरून संपर्क साधून चौकशी करायला काय हरकत होती ? त्यांना सुचलेच नाही की जायचे मनातच नव्हते? सूचलेच नसेल,पवार म्हणतात त्याप्रमाणे ही नेतेमंडळी गेस्टहाउसमध्ये हेलिकॉप्टरच्या घरघरीची