पान:निर्माणपर्व.pdf/186

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 म्हणून संपूर्ण क्रांती थंडावली आणि दुसऱ्या टप्प्याचे त्यांनी आवाहन केल्यावर 'पहिला टप्पा कुठे आहे?' असे कुत्सित प्रश्नही विचारले जाऊ लागले. जनता पक्षाने हा तुटवडा भरून काढण्यासाठी जारीने प्रयत्न केले नाहीत तर एक निवडणूकयंत्र म्हणूनसुद्धा पक्ष निकामी होईल. मग संपूर्ण क्रांती, वचनपूर्ती वगैरे तर फार लांबच्या बाता आहेत ! वर्षभर लोकांनी या बाता ऐकून तरी घेतल्या. लवकरच लोक टवाळ्या करू लागतील. कंटाळून दुसरीकडे वळतील. हे घडायला नको असेल तर ठराव आणि भाषणबाजी यातून बाहेर पडून कृतीचा रोकडा प्रत्यय आणून द्यावा लागेल. निम्मा हिंदुस्थान ज्या पक्षाच्या ताब्यात आहे आणि महाराष्ट्रात जो सत्तास्थानाच्या अगदी जवळ उभा आहे, त्या पक्षाच्या राजकीय परिषदेला असा प्रत्यय आणून देणे, वास्तविक अवघड जायला नको; परंतु सर्वांनी उधारउसनवारीची भाषणे केली,लांबलचक ठराव संमत झाले आणि कोणताही विशेष ठसा न उमटविता, कार्यभाग न साधता परिषद आली तशी गेली. नसती झाली तरी चालू शकले असते. शोभा तरी वाचली असती !


 वैयक्तिक पातळीवर जनता पक्षाजवळ कार्यकर्त्यांचे बळ तसे पाहता फार कमी नाही. पन्नालाल सुराणा, भागवत, वैद्य, लेले, नाईक वगैरे कार्यकर्ते; एस् एम जोशी, म्हाळगी, मृणाल गोरे वगैरे नेते त्यागात, कर्तृत्वात उणे नाहीत;परंतु या सर्वांची तोंडे एकाच दिशेला आहेत असे दिसत नाही. या सर्वांच्या शक्ती पक्षबांधणीकडे वळायला हव्यात; परंतु दिसते असे की, आपापले पूर्वीचे गट मजबूत करण्यात या शक्ती खर्च होत आहेत. परस्पर संशयामुळे एकमेकांना शह देण्यात या शक्तींचा अपव्यय होत आहे. हे गट धोरणात्मक मतभेदामुळे टिकून आहेत असेही नाही. पुरोगामी–प्रतिगामी असाही हा तणाव नाही. गटांच्या जुन्या अस्मिता अद्याप कुणी सोडायला तयार नाहीत व त्यामुळे पक्षाची पायाभरणीच होत नाही, उत्क्रांतीला अडथळे येत आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर तीन गटांची ओढाताण सुरू आहे. जुने समाजवादी, जनसंघी आणि नव्याने आलेले फुटीर. फुटिरांना पूर्वीचा कुठलाच ‘रंग' नसल्याने किंवा 'पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलावो वैसा' अशी त्यांची स्थिती असल्याने इतर गटांचे रंग पुसून टाकण्याची त्यांना घाई झालेली आहे; पण प्रश्न रंग पुसण्याचा नाही. नवीन रंग चढविण्याचा आहे. हा रंग ध्येयवादाच्या व तत्त्वज्ञानाच्या मुशीत तयार झालेले नवीन कार्यकर्तेच चढवू शकतील. तेव्हा अशा कार्यकर्त्यांची संख्या एकीकडे वाढली पाहिजे व जुन्या अनुभवी व तपस्वी कार्यकर्त्यांची-नेत्यांची या नवागतांशी नीट सांगड घातली गेली पाहिजे. अशी जोड जमली नाही तर वैयक्तिक पातळीवर पाच-दहा कार्यकर्ते-नेते कितीही प्रामाणिक व तत्त्वनिष्ठ असले तरी

प्रकल्प समिती । १८५