पान:निर्माणपर्व.pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरळ दोन भाग कल्पिले जावेत. जसे ते कलेच्या किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात कल्पिले जातात. शुद्ध कला, शुद्ध विज्ञान आणि शुद्ध अध्यात्म यांची एक पातळी; दुसरी पातळी उपयोजनाची. उपयोजित ( applied ) कला असू शकते, विज्ञान असू शकते, मग अध्यात्म का नसावे ? एकनाथ-रामदासांपासून अशी उपयोजनाची परंपरा आपल्याकडे आहे. नाथांनी भागवतापाठोपाठ रामायणावर एरव्ही ग्रंथ कशाला लिहिला असता ? भारुडे कशाला रचली असती ? दासबोध हा तर उपयोजनावरील ग्रंथराज आहे. रामदासांचा महाराष्ट्र धर्म हा वारकरी संतांच्या भागवत धर्माचेच स्थलकालसापेक्ष असे उपयोजन ( application ) आहे. ही परंपरा अगदी आधुनिक काळातही दिसून येते. रामकृष्ण परमहंसांच्या शुद्ध अध्यात्माचे विवेकानंदांनी उपयोजन केले. गांधीजी याच परंपरेचे प्रतीक होते. भारताच्या स्वातंत्र्यलढयाला ही परंपरा अशी उपयोगी ठरली, तर नवभारताच्या उभारणीसाठी ती टाकावूच ठरेल असे समजण्याचे कारण नाही. शुद्ध विज्ञानात मौलिक संशोधन करणारे न्यूटन किंवा आइन्स्टाईन शतकातून एखाददुसरेच होत असतात. पण विज्ञानाच्या उपयोजनासाठी शेकडो प्रयोगशाळा अस्तित्वात असतात. यातून वैज्ञानिक संस्कृतीचे पाऊल पुढे पुढे पडत जाते. अध्यात्मक्षेत्रही याच क्रमाने विकसित होते. मानवजातीच्या आध्यात्मिक ज्ञानात-अनुभवात नवीन भर टाकणारा ख्रिस्त, बुद्ध, ज्ञानेश्वर किंवा परमहंस शतकाशतकांतून एखादाच उदयास येतो. पण या ज्ञानाचे-अनुभवाचे उपयोजन झाले नाही तर आध्यात्मिक 'मूल्ये' निर्माण होत नाहीत. फक्त विचार अस्तित्वात राहतात. वैज्ञानिक संस्कृती म्हणजे जसा बुद्धिवादाचा स्वीकार, तसे 'आध्यात्मिक मूल्य' म्हणजे मानवामानवामधील आणि मानव आणि निसर्ग यांमधील प्रेमभाव-एकात्मतेची जाणीव. या जाणिवेशिवाय मानवी जीवन कोरडे, भकास, आणि उध्वस्त होत आहे हे आज वैज्ञानिकदेखील सांगू लागले आहेत. मग शुद्ध प्रेमाचा शुद्ध भागवतधर्म आणि त्याचे स्थलकालसापेक्ष असे माचणूरसारखे उपयोजन या दोन्हींचे स्वागतच व्हायला हवे-असे अनेक उपयोजनप्रयोग ठिकठिकाणी उभे राहायला हवेत.


 माचणूर प्रयोगक्षेत्र उभारताना कोणती दृष्टी बाळगण्यात आली होती ? मूळ प्रेरणा बाबामहाराज आर्वीकर यांची. बाबामहाराज यांची काही भाषणे, प्रवचने उपलब्ध आहेत. त्यावरून या प्रयोगक्षेत्रामागील दृष्टिकोनाची थोडी कल्पना येऊ शकते. 'चुये' या एका गावातील गावकऱ्यांसमोर केलेल्या भाषणात बाबामहाराज म्हणाले होते--

 ‘गावाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर गावातले सर्व पक्ष, पंथ, जाती मोडून टाका. गाव हाच एक पक्ष ! पक्षोपक्षांच्या ज्वालेत गाव होरपळून

एक प्रयोग । १४३