पान:निर्माणपर्व.pdf/143

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रा. गं. बा. सरदार यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून संतवाड्.मयाची फलश्रुती उपस्थितांसमोर मांडली. 'ग्रामीण आणि शहरी संस्कृती' या विषयावरील परिसंवादात सोलापूरच्या 'संचार' या वृत्तपत्राचे संपादक श्री. रंगा वैद्य यांनी शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव बांधून दिल्याशिवाय ग्रामीण भागांचे उत्थान होणार नाही, असे आग्रहाने प्रतिपादन केले; श्री. बिंदुमाधव जोशी यांनी मधले दलाल वगळून ग्रामीण उत्पादकाशी थेट संपर्क साधण्यासाठी पुण्याची ग्राहक पंचायत कशी प्रयत्नशील आहे, याचा वस्तुपाठ श्रोत्यांसमोर ठेवला. पारमार्थिक भजनपूजने होतीच. पण त्यासोबत प्रपंचविज्ञानाचाही उपक्रम आवर्जून योजला गेला होता. यामुळे ओढाताण जाणवत होती हे खरे. सुमन ताडे यांच्या 'ठेविले अनंते' या अभंगावरच्या रसाळ परमार्थप्रवचनात श्रोते तल्लीन होतात न होतात तोच, पुढच्या ज्ञानसत्राची घंटा वाजे आणि लय विस्कटून जाई. प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही टोके एकदम पकडण्यासाठी चालकांनी चालवलेली ही धडपड स्पृहणीय; पण मधून वाटे असे, हे शक्य आहे का ? दुष्काळ पडल्यावर ही इष्टापत्ती मानून तुकारामाने संसार मोडला आणि भंडारा डोंगरावर तो निघून गेला. प्रपंचविज्ञान सांगते-त्याने असे करायला नको होते, लोकात जागृती निर्माण करायला हवी होती. दुष्काळाची कारणे हुडकून ती दूर करण्याचा प्रयत्न त्याने का करू नये ? शुद्ध भौतिकता किंवा शुद्ध अध्यात्म एकमार्गी असल्याने आचरण्यास सरळ आणि सुलभ, पण या दोहोंचा समन्वय फार कठीण. मग कोणी सांगितली आहे ही उरस्फोड ? तो केल्याशिवाय मात्र गत्यंतर नसते. माणसाचे शरीर ‘धर्मक्षेत्र' आहे, 'कुरूक्षेत्र 'ही आहे, तोवर ही उरस्फोड अटळ आहे. सृष्टीच्या उत्क्रांतीतील मानवाचे विशिष्ट स्थान त्याला या दोन्ही क्षेत्रात वावरण्यास भाग पाडत आहे. माणसाला नियतीने टाकलेला हा सनातन पेच आहे आणि सगळे श्रेष्ठ ज्ञानविज्ञान हा पेच कसा सोडवावा, याविषयीच्या चिंतनातून निर्माण झालेले आहे. प्रवृत्तीचा अतिरेक माणसाला पशु बनवतो आणि निवृत्तीवादानेही जडता येते. सत्वाधिष्ठित रजोगुणाचा आदर्श नेहमी समाजासमोर असावा असे टिळक म्हणत असत. माचणूरच्या उत्सवाची, विशेषत: यंदाच्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साजऱ्या झालेल्या साधनसप्ताहाची मांडणी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती आणि ती बरीच परिणामकारकही ठरत होती. ज्यांना प्रवृत्ती किंवा निवृत्ती यांपैकी एकाच मार्गाने पुढे-शेवटपर्यंत जायचे असते, अशांना ही मांडणी अर्थातच अपूर्ण व वरवरची वाटण्याचा संभव आहे. पण उत्सव, मेळावे अशा थोड्यांसाठी नसतातच. ते समुदायांसाठी असतात. या दष्टीने माचणूरचा यंदाचा उत्सव खूपच यशस्वी व मार्गदर्शक ठरला असे म्हणायला हरकत नाही. आपल्या धार्मिक संचिताचा असा नवा उपयोग जितक्या मोठ्या प्रमाणावर होईल तितका हवा आहे.

निर्माणपर्व । १४२