पान:निर्माणपर्व.pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मध्यबिंदू






 माओने मार्क्सवादाचे चिनीकरण केले असे म्हटले जाते. परंतु जनसमुदायांच्या सामर्थ्यावरील अनन्यनिष्ठा वगळता अव्वल मार्क्सवादाचा कुठलाच अंश माओच्या आचारविचारात शिल्लक उरलेला दिसत नाही. माओक्रांतीत मार्क्सचा कामगारवर्ग अभावानेच तळपला. त्याची जागा शेतकरी समुहांनी घेतली. सांस्कृतिक क्रांतीत तर हे शेतकरी समूहही मागे पडले. नवा विद्यार्थिवर्ग पुढे आला. मध्यम-भांडवलदारवर्ग, कारखानदार-व्यापारी यांचे शत्रुत्व माओने फारसे ओढवून घेतलेले दिसत नाही. उलट त्यांना क्रांतीत सामीलच करून घेतले. वर्गविग्रहाऐवजी एकूण भिन्नभिन्न जगाच्या एकजुटीवर माओने भर दिलेला दिसतो व संपूर्ण चीन विरुद्ध प्रगत भांडवलशाही देश अशी विग्रहाची व्याप्ती वाढवून, त्याने मार्क्सच्या आंतरराष्ट्रीयत्वाला वेगळीच राष्ट्रवादी कलाटणी दिली. नंतर नंतर प्रगत भांडवलशाही देशांची जागा रशियाने घेतली आणि आता तर रशियाविरोधही कमी होऊ लागलेला आहे. शांततापूर्ण सहअस्तित्वापर्यंत गाडी यायला आता फारसा वेळ राहिलेला आहे, असे इतर देशांच्या अनुभवावरून वाटत नाही. 'जगातील कामगारांनो, एक व्हा' ही घोषणा यापुढे निदान चीनमध्ये निश्चित ऐकू येणार नाही. आणि ही घोषणा नाही म्हणजे मार्क्सवादही नाही, हे उघड आहे. लेनिन होता तेव्हा क्रांतीनंतरही रशियात ही घोषणा ऐकू येत होती. थर्ड इंटरनॅशनल अस्तित्वात होती. माओने आपल्या हयातीतच या घोषणेला मूठमाती देऊन टाकली होती. त्यामुळे पुढचा विचारच करायचे खरे म्हणजे कारण नाही. जागतिक क्रांतीऐवजी माओने चिनी क्रांती प्रथम महत्त्वाची मानली व नंतर आंतरराष्ट्रीय क्रांतीऐवजी एकदम सांस्कृतिक क्रांतीची खास पौर्वात्य झेप घेतली. मार्क्सवादाला ही झेप संपूर्णतया अपरिचित होती. खाजगी मालकी संपुष्टात आली-समाजवाद अस्तित्वात आला तरी माणसाचा स्वार्थ संपत नाही, तो पुनःपुन्हा भ्रष्ट होतो, हा मार्क्सवादी श्रद्धेला तडा देणारा अनुभव होता. यातून माओची सांस्कृतिक क्रांतीची कल्पना निघाली. ती काही मार्क्सवादात माओने टाकलेली नवी भर नव्हे. मार्क्सवाद निखळ भौतिकतेवर उभा आहे. नैतिकता हा भौतिकतेचा परिणाम आहे असे मार्क्सवाद मानतो.

मध्यबिंदू । १३९