पान:निर्माणपर्व.pdf/139

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आंदोलनाच्या काळात नवनिर्माण प्रेरणेने भारलेले तरुण खेडोपाडी जाऊ पाहत होते. तेथील भ्रष्टाचार हटवू पाहत होते. शेतकऱ्यांचे काही प्रश्न तरी समजावून घेत होते. हे काम मजबूत व्हायला हवे होते, त्याला पुरेसा अवधी मिळायला हवा होता. पण मध्येच परिस्थितीने वेगळे वळण घेतले व हे ग्रामीण भागातील तळ बांधणीचे काम वाहून गेले, निकालात निघाले. पण जेव्हा केव्हा भविष्यात शक्य होईल तेव्हा याच कामापासून पुन्हा नवा आरंभ करावा लागेल हे रॉय-गांधींचे भाकित आहे आणि भारतात जरी नाही, तरी इतर आशियाई देशात हे आजवर खरे ठरत आलेले आहे. तळ कसे बांधायचे त्या पद्धतीत फार तर लोकस्थिती, परंपरा, परिस्थिती यामुळे फरक पडत राहील. इतर ठिकाणी सोव्हिएतस निघाली असतील. आपल्याकडे आश्रम कदाचित चालवावे लागतील, तर काही ठिकाणी आर्थिक विकासाचे कार्यक्रमही राबवावे लागतील. कुठे प्रथमपासूनच संघर्ष उभा करावा लागेल. टिळकांची प्रतियोगी सहकारिता हे आपल्याकडच्या परिस्थितीत नेहमी अचूक ठरत आलेले धोरण आहे. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकीकरणाचा ब्रिटिशांचा-प्रत्यक्ष परकीय शत्रूचा–कार्यक्रमही टिळकांनी राबवला. कारण त्यामुळे देशाचे हित होणार होते. तसेच अगदी वृक्षारोपणाचे, नाहीतर कुटुंबनियोजनाचे कार्यक्रमही राबवायची नवनिर्माणवाद्यांची तयारी हवी. शेवटी नवनिर्माण आंदोलनही कशासाठी होते ? 'नया देश बनायेंगे' ही त्या आंदोलनाची प्रेरणा होती. यासाठी जे कुणी, जिथे कुठे प्रयत्नशील असतील, त्यांचे त्यांचे, त्या त्या ठिकाणी सहकार्य घेतले गेले पाहिजे. अनुशासनवाद्याचेही. अर्थात त्यांनी घेतले तर,देऊ दिले तर. नाहीतर एकला चलो रे चीही तयारी हवी. तळ नाही तोवर बळ नाही, हे मात्र निश्चित. लोकशाहीचा वृक्ष असा तळात नीट रूजलेला असला तरच वर तो फळांनी डवरेल. खतपाणी या मुळाशी घातले पाहिजे. वर चार थेंब शिंपडून किंवा मंत्रपठन करून काय साधणार आहे ?

रॉय-गांधी आपल्याला या तळाकडे पुन्हा पुन्हा जायला सांगत आहेत.

१४ ऑगस्ट १९७६

निर्माणपर्व । १३८